धरणग्रस्तांची ‘आरपार’ची लढाई!

By Admin | Updated: May 6, 2015 00:15 IST2015-05-05T21:22:19+5:302015-05-06T00:15:51+5:30

जिल्हाधिकाऱ्यांबरोबर आज बैठक : प्रश्न न सुटल्यास वेणेखोल ग्रामस्थांचे उरमोडीत जलसमर्पण

The battle of the alliance of the dam! | धरणग्रस्तांची ‘आरपार’ची लढाई!

धरणग्रस्तांची ‘आरपार’ची लढाई!

परळी : सातारा तालुक्यातील परळी खोऱ्यातील वेणेखोल ग्रामस्थ व इतर २३ गावे उरमोडी जलाशयात बाधीत आहेत. संपूर्ण बाधीत आहेत, त्यांना पुनर्वसन मिळाले आहे; मात्र जी अशंत: बाधीत आहेत, त्यांना अजून शासनाने लोंबकळत ठेवले आहे. बुधवारी, दि. ६ रोजी दुपारी तीन वाजता धरणग्रस्तांची जिल्हाधिकारी अश्विन मुदगल यांच्याबरोबर बैठक आहे. या बैठकीत प्रश्न न सुटल्यास वेणेखोल ग्रामस्थ उरमोडी जलाशयात जलसमर्पण करणार आहेत. आता आरपारची लढाई सुरू करणार असल्याचे त्यांनी सांगितले.वेणेखोल ग्रामस्थांनी, दि. ३० रोजी उरमोडी धरणाच्या भिंतीवर उपोषण केले होते. हे उपोेषण सुमारे पाच तास सुरू होते. मात्र जिल्हा पुनर्वसन अधिकारी, उरमोडी धरण कार्यकारी अभियंता, तहसीलदार यांनी तुमचे पुनर्वसनाचे प्रश्न सोडविण्यासाठी जिल्हाधिकारी यांच्यासोबत बैठक लावून सर्व प्रश्न सोडवले जातील, असे आश्वासन दिले होते. ती बैठक आता बुधवारी दुपारी तीन वाजता होणार आहे. जर या बैठकीत पुनर्वसनाचा प्रश्न, ६५ टक्के रकमेचा प्रश्न मार्गी न लागल्यास सर्व वेणेखोल ग्रामस्थ तसेच सातारा तालुक्यातील पुनवडी, दहिवड, आगटडवाडी, वडगाव, पाटेघर, बनघर, कासारथळ, नित्रळ आदी गावांतील ग्रामस्थ उरमोडी जलाशात जलसमर्पण करणार आहेत.
बुधवारी होणाऱ्या बैठकीत जर प्रशासनाने पुढील बैठकीचे आश्वासन दिले तरी आम्ही ते मानणार नाही. बुधवारच्या बैठकीतच आमच्या मागण्यांचा निर्णय झाला पाहिजे, अशा पवित्र्यात धरणग्रस्त आहेत. (वार्ताहर)


प्रशासनाशी आजची शेवटची बैठक...
गेली १८ वर्षे २ महिने प्रशासन आम्हास आश्वासने देत आहेत. मात्र बुधवारी जिल्हाधिकारी व पुनर्वसन विभागाच्या अधिकाऱ्यांची वेणेखोल ग्रामस्थांची शेवटची निर्णायक बैठक असेल. यापुढे आम्ही आश्वासने स्वीकारणार नाही. आमचा पुनर्वसनाचा प्रश्न बैठकीत मार्गी लागलाच पाहिजे; अन्यथा उरमोडीत जलसमर्पण आणि जिल्हाधिकारी यांच्या घरासमोर आत्मदहन करणार असल्याचा इशाराही सुमारे चारशे ग्रामस्थांनी दिला आहे.
अनेक वर्षे आम्ही प्रशासनावर विश्वास ठेवला होता. मात्र, प्रशासन आम्हास फक्त आश्वासन देत आहे. त्यामुळे आम्ही बुधवारी जिल्हाधिकारी यांच्याशी बैठकीत चर्चा करणार असून, ती बैठक ही आमची त्यांच्याशी शेवटची असणार आहे. यापुढे आम्ही आमच्यापरीने प्रश्न सोडवू. बैठकीत निर्णय न झाल्यास उरमोडीत जलसमर्पण करणार असून, आम्ही ग्रामस्थांनी आरपारची भूमिका घेतली आहे.
-विठ्ठल सपकाळ,
सदस्य-वेणेखोल धरणग्रस्त समिती

Web Title: The battle of the alliance of the dam!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.