साताऱ्यात दुसऱ्या दिवशीही वळवाच्या पावसाची बॅटिंग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 16, 2021 04:38 IST2021-05-16T04:38:43+5:302021-05-16T04:38:43+5:30
सातारा : सातारा शहरासह परिसरात शनिवारी दुसऱ्या दिवशीही ढगांच्या गडगडाटात वळवाचा पाऊस झाला. यामुळे हवेत गारवा निर्माण झाल्याने उकाडा ...

साताऱ्यात दुसऱ्या दिवशीही वळवाच्या पावसाची बॅटिंग
सातारा : सातारा शहरासह परिसरात शनिवारी दुसऱ्या दिवशीही ढगांच्या गडगडाटात वळवाचा पाऊस झाला. यामुळे हवेत गारवा निर्माण झाल्याने उकाडा कमी झाला होता. दरम्यान, जिल्ह्यातही काही ठिकाणी पाऊस झाला. यामुळे शेतकऱ्यांत समाधानाचे वातावरण दिसून येऊ लागले आहे.
सातारा जिल्ह्यात यावर्षी जानेवारी महिन्यापासून दोन वेळा अवकाळी पाऊस झाला; तर त्यानंतर वळवाचे पाऊसही सतत होत आहेत. विशेष म्हणजे जिल्ह्यात सलग चार-पाच दिवस पाऊस पडत आहे. गेल्या काही दिवसांपासून जिल्ह्यात पुन्हा वळवाचा पाऊस पडू लागला आहे. दुपारपर्यंत उन्हाची तीव्रता असते; तर दुपारनंतर आकाश काळ्या ढगांनी भरून पावसाला सुरुवात होते. यावेळी वारेही वाहत असतात; तर ढगांचा गडगडाट आणि विजांच्या कडकडाटात पाऊस होत आहे.
सातारा शहर व परिसरात शुक्रवारी सायंकाळच्या सुमारास विजांच्या कडकडाटात वळवाच्या पावसाने हजेरी लावली होती. त्यामुळे वीजपुरवठा खंडित होण्याचा प्रकार घडला. त्यानंतर शनिवारीही सकाळपासून उकाडा होता. अंगातून घामाच्या धारा वाहत होत्या. सायंकाळी सातनंतर हलक्या पावसाला सुरुवात झाली. मात्र, त्यानंतर रात्री आठच्या सुमारास ढगांच्या गडगडाटात पावसाला जोरदार सुरुवात झाली. बघता-बघता रस्त्यांवरून पाणी वाहू लागले. तसेच थंडगार वारे सुरू झाले. जवळपास १० मिनिटे पाऊस पडत होता. या पावसामुळे उकाडा कमी होण्यास मदत झाली.
दरम्यान, शनिवारी सायंकाळच्या सुमारास माण तालुक्यात काही ठिकाणी हलका पाऊस झाला. सतत पाऊस होत राहिल्यास शेतीकामांना वेग येणार आहे. तसेच जिल्ह्यातील इतर ठिकाणीही पावसाने हजेरी लावली.
.............................................................