निराधारांच्या जगण्याला ‘बुडत्या’चा आधार
By Admin | Updated: January 10, 2015 00:12 IST2015-01-09T21:39:15+5:302015-01-10T00:12:44+5:30
तुटपुंजे अनुदान : अनुदान वाढविण्याची लाभार्थ्यांची मागणी

निराधारांच्या जगण्याला ‘बुडत्या’चा आधार
परळी : समाजातील निराधार, परितक्त्या, विधवा, अपंग तसेच दारिद्र्यरेषेखालील इतर घटकांना विविध सामाजिक अर्थसहाय्य योजनेच्या माध्यमातून दरमहा मिळणाऱ्या तुटपुंज्या अनुदानामुळे निराधारांचे जगणे मुश्किल झाले असून, त्यांच्या अनुदान रकमेत शासनाने वाढ करावी, अशी मागणी लाभार्थ्यांकडून केली जात आहे. संजय गांधी निराधार योजना, इंदिरा गांधी विधवा निवृत्ती वेतन योजना, श्रावणबाळ योजना राज्य निवृत्ती वेतन, राष्ट्रीय अपंग निवृत्ती योजना आदी विविध प्रकारच्या सामाजिक योजनांच्या माध्यमातून जिल्ह्यातील सुमारे एक लाख तीस हजार लाभार्थ्यांना अनुदान दिले जात. संजय गांधी निराधार योजनेचे ९८ हजार ६१५, इंदिरा गांधी राष्ट्रीय वृद्धापकाळ योजनेचे ९ हजार १४१, इंदिरा गांधी राष्ट्रीय विधवा योजनेचे ७८७ तर ६१ अपंग लाभार्थ्यांच्या यात समावेश आहे. अनुदानाची रक्कम ४०० ते ६०० रुपये असून महागाईच्या तुलनेत ही रक्कम अत्यंत तुटपुंजी असल्याने लाभार्थ्यांना जीवन जगणे मुश्किल झाले आहे. त्यामुळे अनुदानाची रक्कम वाढवून मिळावी, अशी मागणी लाभार्थ्यांकडून केली जात आहे. राज्य व केंद्र शासनाच्या सामाजिक अर्थसहाय्याच्या योजना गोरगरिबांना खराखुरा आधार देणाऱ्या असायला पाहिजेत. या योजनांबाबत तळागाळापर्यंत माहिती उपलब्ध करून देणाऱ्या प्रशासकीय यंत्रणेने परिश्रमपूर्वक काम केल्यास त्याचा फायदा होऊ शकेल. (वार्ताहर)
लाभासाठी अर्ज करण्याचे आवाहन
राष्ट्रीय योजनेतून दारिद्र्यरेषेखालील कुटुंबातील कमावत्या व्यक्तीचे निधन झाल्यास संबंधित कुटुंबाने वर्षाच्या आत तहसील कार्यालयात या योजनेसाठी अर्ज केल्यास संबंधित कुटुंबाला या योजनेचा लाभ मिळतो. या योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थी पुढे येत नसल्याने यासाठी आलेला निधी परत जात आहे. संबंधित लाभार्थ्यांनी विहित नमुन्यात अर्ज भरावेत, असे आवाहन जिल्हा प्रशासनाने केले आहे.