लोणंद शहरात रंगला ‘बोरीचा बार’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 12, 2016 00:40 IST2016-04-11T23:00:02+5:302016-04-12T00:40:24+5:30

रात्र न् दिवस एक झाला : अधिवेशन सोडून आमदार निवडणुकीत तळ ठोकून

'Barry Bar' in Lonand city | लोणंद शहरात रंगला ‘बोरीचा बार’

लोणंद शहरात रंगला ‘बोरीचा बार’

मुराद पटेल -- लोणंद -राजकीयदृष्ट्या अतिसंवेदनशील समजल्या जाणाऱ्या लोणंद पंचवार्षिक निवडणूक जसजशी जवळ येत आहे, तसतशा आरोप प्रत्यारोपाच्या फैरी झडायला लागल्या आहेत. कडक उन्हाने जिल्हा तापलेला असतानाच लोणंदमधील राजकीय वातावरणही ढवळून निघत आहे.लोणंद नगरपंचायतीच्या निर्मितीनंतर पहिलीच पंचवार्षिक निवडणुकीला लोणंदकर सामोरे जात आहे. काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस या पारंपरिक युद्धाबरोबर भाजपाने तिसरा पर्याय निर्माण करत लोणंद नगरपंचायतीची पंचवार्षिक निवडणूक प्रतिष्ठेची बनविली आहे. शिवसेनेने उमेदवार उभे केले असले तरीही त्यांची परिस्थिती अजूनही तळ्यात-मळ्यात असल्यासारखी झाली आहे.
लोणंद नगरपंचायतीच्या पंचवार्षिक निवडणुकीकरिता काँग्रेसकडून १७ उमेदवार, राष्ट्रवादीकडून १४ तर पुरस्कृत २, भाजपकडून १७ उमेदवार, राष्ट्रवादीकडून १४ तर पुरस्कृत २, भाजपकडून १३, शिवसेनेने ९ उमेदवार, रासप २ उमेदवार व अपक्ष १९ असे ७६ उमेदवार आपले नशीब लोणंद नगरपंचायतीमध्ये आजमावत आहे. दरम्यान, उमेदवारांकडून जोरदार शक्तिप्रदर्शन करण्यात येत आहे.
लोणंद नगरपंचायतीची लढत प्रामुख्याने काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये होत असून, भाजपाने जोरदार व आक्रमक व्यूहरचना आखत राजकीय वातावरण ढवळून काढल्याने काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसच्या गोटात चिंतेचे वातावरण दिसून येत आहे. शिवसेना फक्त आरोप-प्रत्यारोपावर भर देत असून, शिवसेनेकडे व्यूहरचना आखण्यात नेतेमंडळी मशगूल दिसून येत आहेत.
राष्ट्रवादीचे आमदार मकरंद पाटील हे अधिवेशन सोडून दिवस-रात्र लोणंद-खंडाळ्यामध्ये ठाण मांडून बंडोबांना थंड करीत लोणंदमध्ये राष्ट्रवादीविरोधात असलेले वातावरण कशाप्रकारे निवळून सत्ता पुन्हा राष्ट्रवादीच्या हाती येईल, याची चाचपणी करत राजकीय गणितांची जुळवाजुळव करण्याचा हातखंडा वापरत आहेत.
दुसरीकडे शिवसेनेमध्ये आलेली मरगळ दूर करत शिवसेनेचे उपनेते नितीन बानुगडे-पाटील यांनी शिरवळ येथे शिवसेनेमधील आजी-माजी नेत्यांना एकत्र करत लोणंद नगरपंचायतीच्या निवडणुकीकरिता जोरदार रणनीती आखली आहे.
लोणंदकरांना जोरदार राजकीय धुळवड पाहण्यास मिळत आहे. एकूणच निवडणूक लोणंद नगरंपचायतीची रणनीती मात्र शिरवळ-खंडाळ्यात अशी स्थिती राजकीय पक्षांची झाली आहे.

राजकीय रणनीती आखण्यात नेते मश्गुल
कोणत्या प्रभागात कोणता उमेदवार प्रबळ ठरणार आहे. कोणत्या उमेदवाराची ताकद कमी पडत आहे किंवा विरोधक कोठे कमकुवत आहे. याचा विचार करुन रणनिती आखली जात आहे. सर्वच नेते मंडळी रात्रंदिवस एक करुन प्रचार करत आहेत. त्याचबरोबर कार्यकर्त्यांना कामाला लावून विरोधकांना अडचणीत आणण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.

Web Title: 'Barry Bar' in Lonand city

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.