कठड्यांमुळे वन्यप्राण्यांच्या मुक्त संचारास अडथळा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 12, 2021 04:40 IST2021-05-12T04:40:00+5:302021-05-12T04:40:00+5:30

पेट्री : शहराच्या पश्चिमेस सातारा-कास रस्त्याच्या रुंदीकरणाचे काम अनेक दिवसांपासून सुरू आहे. या मार्गावर आटाळी गावच्या हद्दीत रस्त्याच्या दुतर्फा ...

Barriers hinder free movement of wildlife! | कठड्यांमुळे वन्यप्राण्यांच्या मुक्त संचारास अडथळा!

कठड्यांमुळे वन्यप्राण्यांच्या मुक्त संचारास अडथळा!

पेट्री : शहराच्या पश्चिमेस सातारा-कास रस्त्याच्या रुंदीकरणाचे काम अनेक दिवसांपासून सुरू आहे. या मार्गावर आटाळी गावच्या हद्दीत रस्त्याच्या दुतर्फा संरक्षक भिंतींचे बांधकाम करण्यात आले आहे. या भिंतींमुळे वन्यप्राण्यांच्या भ्रमणमार्गात अडथळे निर्माण होण्याची शक्यता असून, रस्ता अरुंद झाल्याने अपघातांचा धोका वाढला आहे.

जागतिक वारसास्थळ असलेल्या कास पठार व तलाव परिसरात पर्यटकांची नेहमीच वर्दळ असते. फुलांच्या हंगामात लाखोंच्या संख्येने येणाऱ्या पर्यटकांमुळे रस्त्यावर वारंवार वाहतुकीची कोंडी होत असते. सातारा-कास रस्त्याच्या रुंदीकरणाचे काम वर्षभरापासून सुरू आहे. अनेक ठिकाणी रस्ता खचण्याचे कारण देत, रस्त्याच्या दुतर्फा उंच व सलगपणे भिंती बांधल्या आहेत. आटाळी गावच्या हद्दीपासून कास पठारपर्यंत दोन्ही बाजूला विपूल जंगल आहे. या जंगलातील प्राण्यांची रस्त्याच्या दोन्ही बाजूला ये-जा सुरू असते. रस्त्याच्या वरील बाजूस काही गुहा तर रस्त्याच्या खालील बाजूस पाणवठे आहेत, परंतु या कठड्यांमुळे नैसर्गिक जंगल वाटा अडल्या जाऊन वन्यप्राण्यांच्या भ्रमणमार्गात अडथळे निर्माण होऊ लागले आहे.

(कोट)

आटाळी गावच्या हद्दीतील काही ठिकाणापासून ते घाटाई फाट्यापर्यंत रस्त्याच्या दुतर्फा कठडे वनविभागाच्या हद्दीतच बांधले आहेत. त्यामुळे वनविभागाच्या हद्दीतच रस्ता खचतो का? या कठड्यांबाबत बांधकाम व वनविभागाकडे चौकशी केली, परंतु समाधानकारक माहिती मिळाली नाही. वन्य जिवांना मुक्त वावर करण्यास अडचणी निर्माण होणार आहेत.

- सोमनाथ जाधव, माजी अध्यक्ष, कास पठार कार्यकारी समिती

(चौकट)

रस्त्याच्या दुतर्फा असलेल्या संरक्षक कठड्यांमुळे रस्ता अरुंद झाला आहे. चार दिवसांपूर्वी एका चारचाकीला या ठिकाणी अपघात झाला होता. अपघातात जीवितहानी झाली नाही, परंतु वाहनाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. हे संरक्षक कठडे अनेक अडचणी निमार्ण करू लागल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.

फोटो : 11 सागर चव्हाण

कास मार्गावर रस्त्याच्या दुतर्फा बांधण्यात आलेल्या संरक्षक भिंतींमुळे वन्यप्राण्यांच्या मुक्त संचारात अडथळे निर्माण होत आहेत. (छाया : सागर चव्हाण)

Web Title: Barriers hinder free movement of wildlife!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.