गर्दीतल्या दर्दींचा ‘ओपन’ बिअर बार!

By Admin | Updated: April 21, 2015 01:00 IST2015-04-21T00:40:10+5:302015-04-21T01:00:05+5:30

हवेशीर टेरेसवर रीत्या होतायत बाटल्या : कऱ्हाड बसस्थानकातील धक्कादायक प्रकार, छतावर दारूच्या बाटल्यांचा खच--आॅन दि स्पॉट

Barrage 'Open' beer bar! | गर्दीतल्या दर्दींचा ‘ओपन’ बिअर बार!

गर्दीतल्या दर्दींचा ‘ओपन’ बिअर बार!

संजय पाटील- कऱ्हाड -दारूचे शौकीन सहसा तोंड लपवतात. गर्दीपासून लांब राहतात; पण कऱ्हाडात सध्या धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय. ऐन गर्दीच्या ठिकाणी ‘ओपन’ बिअर बारच सुरू झालाय. जिथं शेकडोंची गर्दी आणि हजारो डोळे वावरतात अशा ठिकाणी दर्दींची मैफल जमताना दिसते. दर्दींच्या या बैठकीत दारूच्या बाटल्या आणि प्लास्टिकचे ग्लास असतात. हवेशीर वातावरणात त्या बाटल्या रीत्याही होतात; पण हा ‘ओपन’ बार एकाच्याही डोळ्यावर येत नाही, हे विशेष !
कऱ्हाडात अनेक बिअर बार आणि देशीदारूची दुकाने आहेत. या बार व दुकानांमध्ये दररोज हजारो बाटल्या रिकाम्या होतात. तळीराम आपली तल्लफ भागवून तेथून मार्गस्थ होतात. चारभिंतीआड तळीरामांची ही मैफल जमत असल्याने सामान्यांना त्याचा त्रास होत नाही; पण सध्या कऱ्हाड बसस्थानकातच दारूचा अड्डा पाहावयास मिळतोय. बसस्थानकाच्या इमारतीचे टेरेस तळीरामांनी ‘हायजॅक’ केल्याची परिस्थिती आहे. बसस्थानकाची इमारत विस्तीर्ण आहे. येथील अनेक फलाटांवर दररोज शेकडो गाड्यांची वर्दळ असते. तसेच मध्यवर्ती ठिकाण असल्याने येथे ये-जा करणाऱ्या प्रवाशांची संख्याही जास्त आहे. बसस्थानकात अनुचित प्रकार घडू नये, यासाठी येथे पोलीस चौकीही आहे. या चौकीत दररोज रोटेशनप्रमाणे पोलीस कर्मचारी ड्यूटीवर असतात. मात्र, गर्दीचे ठिकाण असल्यामुळे अनेकवेळा येथे चोरी व मारामारीसारख्या घटना घडतात. या घटनांमुळे बसस्थानक परिसर नेहमी चर्चेत असतो. अशातच बसस्थानक चर्चेत येण्यासारखे आणखी एक नवे कारण समोर आले आहे. बसस्थानकाच्या टेरेसचा तळीरामांकडून बिअर बारसारखा वापर केला जातोय. टेरेसवर जाण्यासाठी पोलीस चौकीपासून काही अंतरावरच जिना आहे. या जिन्याला शटर अथवा दरवाजा नाही. त्यामुळे टेरेसवर बिनदिक्कतपणे जाता येते. याचाच गैरफायदा सध्या तळीरामांकडून घेतला जातोय. वास्तविक, बसस्थानकाचे नूतनीकरण केले जाणार असल्याने येथील व्यवस्थापनाकडे पूर्णपणे दुर्लक्ष करण्यात आले आहे. येथील समस्यांचे कोणालाही देणे-घेणे नसल्याची परिस्थिती आहे. त्यातूनच येथे अनेक दुर्घटना घडत आहेत. काही दिवसांपूर्वी बसस्थानक इमारतीचा स्लॅब अचानक कोसळला. सुदैवाने त्यामध्ये जीवितहानी झाली नाही. बसस्थानकातील कारभाराविरोधात ‘मनसे’च्या वतीने आंदोलन छेडण्यात आले होते. तरीही येथील प्रशासनाला जाग आलेली नाही. ‘हम करे सो कायदा’ अशीच परिस्थिती आहे.


‘देशी’बरोबर ‘ब्रॅन्डेड’ बाटल्याही
बसस्थानकाच्या टेरेसवर शेकडो रिकाम्या बाटल्या विखुरलेल्या दिसतात. त्यामध्ये देशीदारूच्या बाटल्यांसह अनेक महागड्या बाटल्यांचाही समावेश आहे. रिकाम्या झालेल्या काही बाटल्या तेथेच फोडण्यातही आल्या आहेत. त्यामुळे टेरेसवर काचांचाही खच आहे. ज्याठिकाणी सातारा, पाटण, मुंबई, कोल्हापूर, मिरज, सांगलीला जाणाऱ्या बस थांबतात तेथेच टेरेसवर मद्यपींची ही मैफल जमते.


रात्रीच्या वेळी बसते बैठक
बसस्थानकाच्या टेरेसवरील स्पॉट अनेकांच्या पसंतीचा असल्याची चर्चा परिसरातील व्यावसायिकांमध्ये आहे. काहीजण रात्रीच्या वेळी दुचाकीवरून बसस्थानकात येतात. बसस्थानकाच्या आवारात पोलीस चौकीनजीकच ते आपली दुचाकी पार्क करतात व टेरेसवर जातात. संबंधितांच्या हातात ‘पार्सल’ असल्याचेही अनेकांनी पाहिले आहे. मात्र, त्यांना कोणीही हटकत नाही, असेही व्यावसायिकांचे म्हणणे आहे.

Web Title: Barrage 'Open' beer bar!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.