वरकुटे मलवडीत तीन ठिकाणी घरफोडी
By Admin | Updated: November 7, 2015 23:38 IST2015-11-07T22:49:07+5:302015-11-07T23:38:10+5:30
घबराटीचे वातावरण : सोन्या-चांदीच्या दागिन्यांसह रोख रक्कम लंपास

वरकुटे मलवडीत तीन ठिकाणी घरफोडी
वरकुटे मलवडी : माण तालुक्यातील वरकुटे मलवडी येथे शुक्रवारी रात्री तीन ठिकाणी घरफोडी झाली. यामध्ये सोन्या-चांदीच्या दागिन्यासह रोख रक्कम चोरीस गेली आहे. दरम्यान, या घरफोड्यांमुळे परिसरात घबराटीचे वातावरण निर्माण झाले आहे.
याबाबत घटनास्थळावरून मिळालेली माहिती अशी की, वरकुटे मलवडी येथील जगतापवस्तीवर मल्हारी जगताप यांच्या घरात चोरी झाली. दरवाजाचे कुलूप काढून सोन्याची बोरमाळ, अंगठ्या, झुबे, फुले, पैंजण तसेच दोन हजारांची रोकड असा हजारोंचा ऐवज चोरून नेण्यात आला आहे.
तसेच तेथे असणाऱ्या अंगणवाडीच्या इमारतीतही चोरीचा प्रयत्न करण्यात आला. कागदपत्रे विस्कटण्यात आली. त्यानंतर हायस्कूल परिसरातील शामराव अण्णा सरतापे यांच्या घराशेजारील बंद खोलीचे कुलूप कटावणीने तोडण्यात आले. चोरट्यांनी आतील पत्र्याच्या पेटीतील सोन्याची झुबे, फुले, बदाम, मनगट्या, पैंजण आणि सात हजारांची रोखड लंपास केली.
त्याचबरोबरच तेथून जवळ असणाऱ्या बजरंग आटपाडकर यांच्या घरातूनही एक मोबाइल व बॅटरी चोरून नेण्यात आली.
शनिवारी सकाळी म्हसवड पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक चव्हाण, हवालदार बबन पवार यांनी घटनास्थळी भेट दिली. शनिवारी रात्री उशिरापर्यंत पोलिसांत चोरीचा गुन्हा नोंद झाला नव्हता. (वार्ताहर)
दागिन्यांच्या पावत्यानंतर तक्रार...
पोलिसांनी चोरी झालेल्या ठिकाणची पाहणी केली. पण, याबद्दल रात्रीपर्यंत तक्रार देण्यात आलेली नव्हती. चोरीस गेलेल्या दागिन्यांच्या खरेदीची पावती घेऊन पोलीस ठाण्यात तक्रार द्यायला यावे लागेल. त्या पावत्या आम्हाला न्यायालयात दाखवाव्या लागतात, असे पोलिसांनी सांगितले होते. तसेच आता चोरी झाली आहेच. वरून पोलिसांच्या चौकशीचा त्रास नको म्हणून आम्ही तक्रार दिली नाही, असे चोरी झालेल्या मल्हारी जगताप, अप्पा सरतापे यांनी सांगितले.