सत्तेचा दुरुपयोग करून बारामतीला पाणी...
By Admin | Updated: May 18, 2015 00:57 IST2015-05-18T00:51:09+5:302015-05-18T00:57:17+5:30
विजय शिवतारे : पाणी वाटप बैठकीत योग्य निर्णय घेणार

सत्तेचा दुरुपयोग करून बारामतीला पाणी...
फलटण : नीरा-देवघरचे पाणी बारामतीला सत्तेचा दुरुपयोग करून पळविले गेले आहे, याचे पाणीवाटपही चुकीचे झाले आहे. पाणीवाटपाच्या बैठकीत यासंदर्भात योग्य तो व कोणावर अन्याय होणार नाही, असा निर्णय घेऊ. तसेच जिल्ह्यातील रखडलेले पाणीप्रकल्प पूर्ण करण्यासाठी अनुशेषाची अडचण येत असली तरी त्यातून मार्ग काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत,’ असे जलसंपदामंत्री व जिल्ह्याचे पालकमंत्री विजय शिवतारे यांनी सांगितले.
‘जलयुक्त शिवार’ या राज्य शासनाच्या महत्त्वाकांक्षी योजनेअंतर्गत फलटण तालुक्यातील गिरवी व मिरगाव गावांतील इनाम पाझर तलाव दुरुस्ती व माती नालाबांधाची पाहणी करण्यासाठी पालकमंत्री शिवतारे आले होते. त्यावेळी विश्रामगृहात ते पत्रकारांशी बोलत होते.
मतदारसंघात गेल्या पाच वर्षांत जलसंधारणासंदर्भात लोकसहभागातून मोठ्या प्रमाणात मी कामे केली आहेत. ही कामे सर्वत्र व्हावी, या हेतूने राज्य शासनाने ‘जलयुक्त शिवार’ योजना राबविली. या योजनेची सातारा जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात चांगल्या दर्जाची कामे व्हावीत. यासाठी प्रयत्न सुरू आहेत. ही योजना जिल्ह्यात यशस्वी करून महाराष्ट्रात हा जिल्हा सर्वप्रथम आणण्याचा आपला निर्धार आहे. गावाच्या विकासात लोकसहभाग वाढणे गरजेचा असून, गिरवी व मिरगाव येथील कामे चांगली दर्जाची झाली असल्याचे गौरवोद्गारही पालकमंत्री यांनी काढले. मिरगाव येथे धोम-बलकवडीच्या आलेल्या पाण्याची पूजनही आपण केल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
ही कामे दुष्काळी भागात कमी सुरू असल्याचा प्रश्न उपस्थित होताच जेथे जागा मिळेल तिथे कामे सुरू करण्याचा शासनाचा प्रयत्न आहे. दुष्काळी फलटण, माण, खटाव तालुक्यांत याची व्याप्ती वाढविण्यात येईल, असे स्पष्ट करतानाच फलटण तालुक्यातील धुमाळवाडी येथील तलावाचे काम सुरू करण्याचे आदेश आपण दिले आहेत. लोकसहभाग व सिद्धिविनायक ट्रस्टचा जो १ कोटीचा निधी जिल्ह्याला मिळाला आहे. त्यातील काही निधी वापरून काम पूर्ण करू, असे त्यांनी स्पष्ट केले.
नीरा-देवघरचे बारामतीला जाणारे पाणी थांबविण्याच्या सूचना दोन महिन्यांपूर्वी आपण पत्रकार परिषदेत देऊनही पाणी जात असल्याचे निदर्शनास आणून देत सत्तेचा दुरुपयोग करून हे पाणी बारामतीला गेले आहे. मुळातच बारामतीला ६० टक्के पाणी देण्याचा व इतर तालुक्यांना ४० टक्के पाणी देण्याचा निर्णय चुकीचा आहे. यासंदर्भात पाणी वाटपाची बैठक झालेली नाही.
त्यामुळे ठोस निर्णय घेता येत नसला तरी बैठक झाल्यावर दुष्काळी भागावर अन्याय होणार नाही. अशा पद्धतीने निर्णय घेऊ. कालव्यांची कामे होत नाहीत, तोपर्यंत बारामतीला पाणी देणे हा पूर्वी घेतलेला निर्णयही राजकीय हेतूने प्रेरित आहे. सर्व गोष्टींची सखोल चौकशी करू, असेही त्यांनी स्पष्ट केले.
जिल्ह्यातील रखडलेल्या पाणी प्रश्नासंदर्भात बोलताना ते म्हणाले, ‘अनुशेषामुळे निधीबाबत अडचणी येत आहेत. तरीसुद्धा त्यातून मार्ग काढण्याचे प्रयत्न सुरू आहे. जे प्रकल्प अंतिम टप्प्यात व तातडीने पूर्ण होणे गरजेचे आहे, त्यांना प्राधान्याने निधी देण्याचा निर्णय घेतला आहे. रखडलेले पाटबंधारे प्रकल्प आम्हीच पूर्ण करू, अशी ग्वाहीही शिवतारे यांनी दिली. (प्रतिनिधी)