बापूजी साळुंखे समाज हिताचा ध्यास घेणारे ज्ञान माउली : आर. के. भोसले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 22, 2021 04:24 IST2021-07-22T04:24:18+5:302021-07-22T04:24:18+5:30
कुसूर : ‘समाज हितासाठी संपूर्ण जीवन व्यतित करून समाज हिताचा अखंड ध्यास घेणारे ज्ञान माउली शिक्षण महर्षी ...

बापूजी साळुंखे समाज हिताचा ध्यास घेणारे ज्ञान माउली : आर. के. भोसले
कुसूर : ‘समाज हितासाठी संपूर्ण जीवन व्यतित करून समाज हिताचा अखंड ध्यास घेणारे ज्ञान माउली शिक्षण महर्षी बापूजी साळुंखे देवदूत होते,’ असे प्रतिपादन श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था कोल्हापूरचे माजी सहसचिव प्राचार्य आर. के. भोसले यांनी केले.
कऱ्हाड तालुक्यातील विंग येथील आदर्श विद्या मंदिरचे सहायक शिक्षक प्रकाश साठे यांचा सेवानिवृत्त सेवा गौरव करण्यात आला. याप्रसंगी ते प्रमुख अतिथी म्हणून बोलत होते. यावेळी संस्थेचे माजी सहसचिव एस. के. कुंभार, नीळकंठ खबाले यांची प्रमुख उपस्थिती होती.
प्राचार्य कुंभार म्हणाले, ‘ज्ञान हे पवित्र आहे, ते दिल्याने वाढते. श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेतील गुरुदेव कार्यकर्ता बापूजींनी घालून दिलेल्या ध्येय धोरणानुसार कार्य करीत असून, या कार्यामुळे आज आपली संस्था देशामधील गुणवत्तापूर्ण व आदर्श संस्था म्हणून गणली जाऊ लागली आहे. विद्यार्थी हेच आपले दैवत असून, त्यांच्यामध्ये भगवंत पाहून जो सेवेचे काम करतो, तोच खरा आदर्श सेवक असतो.’ विद्यालयाचे व्ही. बी. मोरे यांनी स्वागत व प्रास्ताविक केले. उत्तम गलांडे यांनी सूत्रसंचालन केले. एम. एन. पाटील यांनी आभार मानले.
(चौकट)
मान्यवरांकडून देणगीदारांचा सत्कार..
प्रकाश साठे यांनी संस्थेसाठी देणगी स्वरुपात काही रक्कम दिली. तर विद्यालयाचे माजी विद्यार्थी व संस्थेचे माजी मुख्याध्यापक भास्करराव थोरात यांनी विद्यालयातील बहुउद्देशीय हॉलसाठी बसविण्यात येणाऱ्या फरशीसाठी देणगी जाहीर केली. प्रदूषण विरहित संदेश देत सायकल वारी करणारे विद्यालयातील लिपिक शैलेश चव्हाण यांच्यासह सर्व देणगीदारांचा सत्कार करण्यात आला.