फुलांसह बाप्पांचा प्रसादही महागला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 13, 2021 04:38 IST2021-09-13T04:38:14+5:302021-09-13T04:38:14+5:30
कऱ्हाडचा गणेशोत्सव पाहण्यासारखाच असतो. घरोघरी, गल्लीबोळापासून ते मुख्य बाजारपेठ रस्त्यांवर आकर्षक विद्युत रोषणाईने रस्ते प्रकाशमय केले जातात. ठिकठिकाणी मंडळांकडून ...

फुलांसह बाप्पांचा प्रसादही महागला
कऱ्हाडचा गणेशोत्सव पाहण्यासारखाच असतो. घरोघरी, गल्लीबोळापासून ते मुख्य बाजारपेठ रस्त्यांवर आकर्षक विद्युत रोषणाईने रस्ते प्रकाशमय केले जातात. ठिकठिकाणी मंडळांकडून मोठ्या प्रमाणावर देखावे उभारले जातात. मात्र, गतवर्षीपासून हे चित्र बदलले आहे. कोरोनामुळे गणेशोत्सवावर मर्यादा आल्या आहेत. मात्र, उत्साह तसूभरही कमी झालेला नाही. या वर्षीही बाप्पाचे आगमण जल्लोषात झाले असून, घरोघरी आकर्षक सजावट करीत गणरायाच्या मूर्तींची प्रतिष्ठापना करण्यात आली आहे. विविधरंगी फुलांचा वापर करून आरास करण्यात आली आहे. मात्र, यंदा सजावटीच्या साहित्याच्या किमतीतही वाढ झाल्याचे दिसून येत आहे.
आकर्षक आरास, फुलांप्रमाणे बाप्पांना वाहण्यासाठी आकर्षक झेंडू, गुलाब, जास्वंद अशा फुलांनी तयार केलेले हारही बाजारपेठेत दाखल झाले आहेत. पाचशे रुपये ते हजार रुपयांपर्यंत या हारांची किंमत आहे, तर बाप्पाला आवडणारा प्रसाद म्हणून रेडीमेड मोदकही बाजारात मिळत आहेत. त्यामध्ये मावा, केसरी मोदक, पेंढ्यांचा मोदक मलईद्वारे तयार केलेला तयार केलेला मोदक, आंब्याच्या स्वादाचा मोदक उपलब्ध असून, भाविकांकडून त्याची खरेदीही केली जात आहे. रेडीमेड दुर्वांच्या जुड्याही काही जण विक्रीसाठी घेऊन येत आहेत. त्यालाही मागणी असल्याचे दिसून येत आहे.
- चौकट
उत्सवामुळे दरात आणखी वाढ
गणेशोत्सवात फुले आणि हाराला मोठी मागणी असते. ही वाढती मागणी लक्षात घेता, सध्या फुले आणि हारांचे दरही वाढल्याचे दिसून येत आहे. या वर्षी अतिवृष्टीमुळे फुलशेतीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले. त्यामुळे दर वाढले होते. त्यातच सध्या उत्सवामुळे दरात आणखी वाढ झाल्याचे दिसून येते.
- चौकट
इतर मिठाईची खरेदी
गणरायाला नैवेद्य दाखविण्यासाठी मोदकासह इतर मिठाईची खरेदीही केली जात आहे. यामध्ये प्रामुख्याने बुंदीचे लाडू, बेसन लाडू, रवा लाडू, मोतीचूर लाडू, पेढे, काजूकतली, विविध प्रकारांतील बर्फी यांचीही गणेशभक्तांकडून मागणी करण्यात येत असून, या मिठाईचे दरही दहा ते पंधरा टक्क्यांनी वाढले आहेत.
- चौकट
अगरबत्तींचा सुगंध...
कऱ्हाडच्या बाजारपेठेमध्ये सध्या सुवासिक अगरबत्तींचा सुगंध दरवळू लागला आहे. सर्वत्र आकर्षक सुवासित अगरबत्तींमुळे भक्तिमय वातावरण निर्माण झाले आहे.
फोटो : १२केआरडी०३, ०४
कॅप्शन : प्रतीकात्मक