बाप्पा शाडूचा... जास्तीत जास्त पाच फुटांचा!
By Admin | Updated: May 22, 2015 00:21 IST2015-05-21T22:01:22+5:302015-05-22T00:21:46+5:30
पालिकेत आज बैठक : गेल्या वर्षी अडीच हजार घरांत आली मातीची मूर्ती; यावर्षी वाढणार आकडा

बाप्पा शाडूचा... जास्तीत जास्त पाच फुटांचा!
सातारा : तळ्यांचे प्रदूषण, रासायनिक रंगांमुळे उद््भवणारे धोके, आरोग्यावरील दुष्परिणाम, डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या विचारांचा लाभलेला वारसा या पार्श्वभूमीवर गेल्या वर्षी ‘लोकमत’ने शाडूच्या गणेशमूर्तींसाठी सुरू केलेल्या मोहिमेस भरघोस प्रतिसाद लाभला. प्रबोधनाचा, समंजसपणाचा हाच कित्ता गिरविण्यास सातारकर यावर्षीही उत्सुक आहेत. पालिकेने तब्बल सव्वाशे दिवस आधीच मूर्तिकार, स्टॉलधारकांची बैठक शुक्रवारी बोलाविली असून, गणेश मंडळांमध्येही विवेकी विचार वाढत असल्याचे दिसत आहे.
गेल्या वर्षी मंगळवार तळ्याच्या प्रदूषणामुळे झालेल्या दुष्परिणामांपासून ‘लोकमत’ने मोहिमेचा श्रीगणेशा केला. ‘चला... बाप्पांचं पावित्र्य जपूया’ या शीर्षकाने जनमानसात रुजलेल्या या खऱ्याखुऱ्या चळवळीने खूपच सकारात्मक परिणाम नोंदविले. तब्बल अडीच हजार घरांमध्ये शाडूच्या मूर्ती आल्या. पालिकेने शाडूमूर्ती विकणाऱ्यांना खास सवलती देऊन प्रोत्साहित केले. कर्तव्य सोशल ग्रुप, मंगळवार तळे मित्र मंडळ आणि गणपती ट्रस्ट यांसारख्या सामाजिक संस्थाही हिरीरीने चळवळीत उतरल्या. घरच्या घरी विसर्जन करणाऱ्यांची संख्या शेकडोंमध्ये पोहोचली. यावर्षी साडेचार महिने आधीच मूर्तिकारांची बैठक बोलावून पालिकेने कर्तव्यदक्षता आणि प्रदूषणमुक्तीसाठीची तळमळ दाखवून दिली.
गेल्या वर्षीपासून बदलत असलेली लोकभावनाच याच्या मुळाशी आहे.
नागरिकांचे श्रद्धास्थान असलेल्या ‘महागणपती’ची मूर्ती कायमस्वरूपी ठेवण्याचा निर्णय गेल्या वर्षी सम्राट मंडळाने घेतला. अजिंक्य गणेश मंडळासारखी अनेक मंडळे पूर्वीपासूनच कायमस्वरूपी मूर्ती ठेवतात, तर काही मंडळे यावर्षीपासून हा पर्याय निवडणार आहेत. मुंबईत महाकाय मूर्तींच्या विसर्जनासाठी समुद्र उपलब्ध आहे. पुण्यासह अनेक शहरांत तशी व्यवस्था नसल्याने कायमस्वरूपी मूर्तींचाच पर्याय आहे.
या पार्श्वभूमीवर, साताऱ्याचे पर्यावरणीय वेगळेपण, पर्यटन व्यवसायाच्या दृष्टीने असलेले महत्त्व ओळखून उत्सवाची आखणी आवश्यक असल्याचे मत शेकडो सातारकरांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केले आहे. अनेक मंडळे पाच फुटांपेक्षा लहान गणेशमूर्तींचा पर्याय यंदा निवडणार आहेत. (प्रतिनिधी)
‘लोकमत’ यंदाही राहणार सक्रिय
प्रदूषणमुक्त, पर्यावरणपूरक गणेशोत्सवासाठी पालिका, सामाजिक संस्था, गणेशोत्सव मंडळे आणि नागरिकांशी समन्वय राखून यावर्षीही ‘लोकमत’ सक्रिय राहणार आहे. एकत्रित येऊन शाडूच्या मूर्तींची मागणी करणारे नागरिकांचे गट, कायमस्वरूपी गणेशमूर्ती ठेवण्याचा, पाच फुटांपेक्षा कमी उंचीची मूर्ती करण्याचा निर्णय घेणारी मंडळे, प्रबोधनासाठी रिंगणात उतरणाऱ्या सामाजिक संस्थांचे योगदान या सर्व प्रयत्नांच्या विस्तृत वार्तांकनाबरोबरच सक्रिय सामजिक हस्तक्षेपाद्वारे ही मोहीम अधिकाधिक रुजावी यासाठी ‘लोकमत’ प्रयत्न करणार आहे.
कुंभार व्यावसायिकांना आवाहन
शुक्रवारी (दि. २२) पालिकेत होणाऱ्या बैठकीत कुंभार व्यावसायिकांसाठी महत्त्वपूर्ण निर्णय घेतले जाणार असून, बैठकीस कुंभार व्यावसायिकांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहावे. त्याबाबत कुंभार व्यावसायिक आणि संबंधित घटकांना पालिकेने बैठकीचे पत्र दिले आहे. बैठकीत गणेशमूर्तीची उंची, विसर्जनासाठी तलाव व्यवस्था, निर्माल्य, प्रदूषण या महत्त्वाच्या बाबींवर विचारविनिमय होणार आहे. त्यामुळे संबंधित सर्वांनी या बैठकीस उपस्थित राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.