बाप्पा, साताऱ्यात जरा जपूनच!
By Admin | Updated: August 27, 2014 23:30 IST2014-08-27T21:58:23+5:302014-08-27T23:30:30+5:30
उपरस्त्यांवर खड्ड्यांचे जाळे : तात्पुरती ‘मुरुमपट्टी’ केलेल्या रस्त्यांवर पावसामुळे चिखलाचे ‘विघ्न’

बाप्पा, साताऱ्यात जरा जपूनच!
सातारा : विघ्नहर्त्याच्या उत्सवात यावर्षीही खड्ड्यांचे विघ्न ‘आ’ वासून उभे राहिले आहे. शहरातील काही रस्त्यांचे डांबरीकरण झाले असले, तरी अंतर्गत भागात अत्यंत वाईट स्थिती आहे. अशा भागातील अनेक मंडळांना मूर्ती आणतानाही बरीच कसरत करावी लागेल, अशी स्थिती आहे. त्यामुळे ‘बाप्पा, यंदा जरा जपूनच या’ असे म्हणण्याची वेळ आली आहे.
महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाचे नवीन जलवाहिन्या टाकण्याचे काम नेमके केव्हा संपणार, या प्रश्नाचे उत्तर शोधणे सातारकरांनी आता सोडून दिले आहे. दरवर्षी मे महिन्याची ‘डेडलाइन’, पालिका आणि प्राधिकरणात कलगी-तुरा, ठेकेदाराला दिले जाणारे इशारे हे सर्व ‘उपचार’ गेल्या तीन वर्षांपासून उन्हाळ्या-पावसाळ्याइतकेच ‘नियमित’ झाले आहेत. हा ‘नियमितपणा’ कायम राखून यावर्षीही ‘डेडलाइन’ पाळली गेली नाही, तेव्हा पावसाळ्यालाच सातारकरांची कीव येऊन तो थोडा ‘अनियमित’ झाला आणि पालिकेला रस्ते करण्यासाठी अधिक वेळ मिळाला.
थोड्या काळात जास्त रस्ते करण्याचा विडा पालिकेने उचलला खरा; पण त्याच वेळी काही ठिकाणी काम उरकले जात असल्याचा आरोप करून कामे बंद पाडण्याचा ‘राजकीय ऋतू’ अवतरला. इशारे-प्रतिइशाऱ्यांचा ‘पाऊस’ पडला. ‘कामे रोखणाऱ्यांवर गुन्हे दाखल करू,’ असा दम संबंधितांना भरून पालिकेने ‘यादी’वरचे रस्ते पूर्ण केलेच. परंतु यादीबाहेर अजून बराच सातारा शिल्लक आहे आणि बाप्पांना तर प्रत्येक पेठेत जायचे आहे.
जीवन प्राधिकरणासोबत बाप्पांची वाट खडतर करणाऱ्यांमध्ये अनेक घटक आहेत. कधी भुयारी वीजवाहिन्यांसाठी, तर कधी टेलिफोनच्या केबलसाठी रस्ते वारंवार उकरले गेले. भरपावसात रस्ते ‘करता’ येत नसले तरी ‘उकरता’ येतात, हे वेगवेगळ्या कारणांनी सातारकरांसमोर सिद्ध करून दाखविण्यात आले. परवा-परवापर्यंत अनेक ठिकाणी खोदकाम सुरूच होते. त्यातच वीस आॅगस्टचा ढगफुटीसदृश पाऊस झाला आणि नव्याकोऱ्या रस्त्यावरही डोंगरावरून मुरूम, माती वाहून आली. बिकट उपरस्ते आणखी खडतर झाले. नव्याने खोदकाम केलेल्या ठिकाणी तर दाणादाण उडाली. थोडी उघडीप मिळताच तात्पुरत्या ‘मुरुमपट्टी’ला वेग आला. काही रस्त्यांवर मोठे डबर आणून ठेवण्यात आले आहे. हातफोडीची खडी वापरून रस्ते करण्याचे हे नियोजन असले, तरी सध्या या ढिगाऱ्यांचा अडथळाच होणार आहे. त्यातच पाऊस आला तर कार्यकर्त्यांची तारांबळ उडू शकते. निसर्गाचा नुकताच पाहिलेला प्रकोप आणि रस्त्यांची अवस्था विचारात घेऊनच मंडळांना नियोजन करावे लागणार आहे. (प्रतिनिधी)
रस्त्यांवरचे खड्डे, कर्णकर्कश वाद्ये आणि डॉल्बी, किळसवाणी बीभत्स नृत्ये अशा वातावरणात ‘मी पृथ्वीवर राहायला कसा येऊ,’ असा सवाल गणपतीबाप्पा करीत आहेत... ही संकल्पना गुरुजींनी कवितेत उतरविली. त्यांच्या शाळेतल्याच एका मॅडमनी त्यावर आधारित एक छानसं चित्रही काढलं. संकल्पना सगळ्यांनाच आवडली आणि पाहता-पाहता तिचा विस्तार झाला. या संकल्पनेतून तब्बल सहा हजार पत्रकं तयार झाली आणि प्रबोधनाच्या हेतूनं शाळांमध्ये पोहोचली. गुरुकुल स्कूलमधील पर्यवेक्षक मोहन बेदरकर यांच्या या कवितेवर सोनाली काटकर या कलाशिक्षिकेने चित्र काढलं आहे. त्याचंच रूपांतर पत्रकात झालं आणि बालाजी ट्रस्टच्या माध्यमातून सहा हजार प्रती काढण्यात आल्या. ही पत्रकं अनंत इंग्लिश स्कूल, न्यू इंग्लिश स्कूल, कन्या शाळा, गुरुकुल स्कूल याबरोबरच कोरेगावच्या शाळेतही वितरित झाली आहेत. मुलांच्या माध्यमातून ती घरोघर पोहोचावीत आणि बाप्पाचं पावित्र्य राखण्याचा, पर्यावरणपूरक उत्सव साजरा करण्याचा संकल्प घरोघरी करण्यात यावा, यासाठी ही मोहीम राबविण्यात आली.