पुसेगाव : गेले दीड-दोन वर्षे झाली, शाळा, महाविद्यालयांत अध्ययन-अध्यापनाचे कामकाज पूर्णपणे ठप्प आहे. ‘शाळा बंद; पण शिक्षण चालू’ या शासनाच्या धोरणाने विद्यार्थ्यांचे शैक्षणिक हित किती जोपासले जात आहे. याचा मात्र आढावा कुठेही होत नाही. आज बुद्धीची देवता असलेल्या गणरायाचे सर्वत्र उत्साहात आगमन झाले. मात्र शाळेचा श्री गणेशा कधी होणार याकडे पालकांसह विद्यार्थ्यांचे लक्ष लागून राहिले आहे.
कोरोनाचे कारण पुढे करत गेल्या दीड-दोन वर्षांपासून शाळा बंद आहेत. दोन वर्षांपूर्वी अंगणवाडीतून गेलेल्या पहिलीच्या विद्यार्थ्याने शाळा, बाई, गुरुजी न पाहताच आता तिसरीच्या वर्गाला गेला. दहावी, बारावीचे विद्यार्थी बोर्डाची परीक्षा म्हणजे काय असते?, याचा अनुभव न घेताच आणि विशेष म्हणजे कुणीही नापास न होता वरच्या वर्गात दाखलही झाले. तर इतर वर्गातील विद्यार्थी परीक्षेविनाच पुढच्या वर्गात शिक्षण घेण्यासाठी समर्थ ठरले. प्रश्न असा निर्माण होतो की, जर शासन कोरोनासंदर्भात गर्दीचे निकष शिथिल करत असेल तर शाळा का सुरू नाहीत?, प्रत्येक सण समारंभ साजरा होत आहे.
काही ठिकाणी रेंज नाही तर एखाद्या घरात एकच मोबाईल आहे की, जो पालक कामावर जाताना घेऊन गेल्यावर पोरांच्या ऑनलाईन अभ्यासाचे काय होत असेल?, ‘शाळा बंद; पण शिक्षण चालू’ असा डंका जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या शिक्षण विभागाच्या वतीने स्वतःची पाठ थोपटून पिटला जात आहे. मात्र, वस्तुस्थिती फार वेगळी आहे. आजच बुद्धीची देवता असलेल्या गणरायाचे आगमन घरोघरी झाले आहे तसेच उद्याच्या भावी पिढीला सक्षम बनविण्यासाठी प्रत्यक्ष अध्ययन-अध्यापन प्रक्रिया वर्गातच सुरू होणे आवश्यक आहे. म्हणजेच शाळा, महाविद्यालये ही ज्ञान मंदिराची दालने खुली करावीत, अशी अपेक्षा शिक्षक, पालक व विद्यार्थी करत आहेत.
चौकट..
मुले कंटाळली ऑनलाईन शिक्षणाला !
मैदानावर, उद्यानात जाण्याला परवानगी आहे. शालेय मुलं-मुली ही मोठ्या संख्येने सर्वत्र समाजात फिरताना दिसत आहेत. मग, शाळेत, कॉलेजमध्ये गेल्यावरच कोरोना होणार आहे का?, ऑनलाईन शिक्षणाला मुले कंटाळली आहेत. काही पालकांची तर नवीन मोबाईल विकत घेण्याची आर्थिक परिस्थितीही नाही, तर काही कुटुंबात दोन-तीन भावंडांत मिळून एकाच मोबाईलवर शिक्षण प्रक्रिया सुरू आहे.