भांडीकुंडी वाटून बाळासाहेबांनी बाजार मांडला !
By Admin | Updated: April 8, 2016 23:58 IST2016-04-08T21:26:44+5:302016-04-08T23:58:09+5:30
आनंदराव शेळकेंचा पलटवार : बागवानांना मोठे कुणी केले ?.. रामराजेंनीच ना..

भांडीकुंडी वाटून बाळासाहेबांनी बाजार मांडला !
आनंदराव शेळकेंचा पलटवार : बागवानांना मोठे कुणी केले ?.. रामराजेंनीच ना.. तरीही त्यांच्यावरच टीका करताय ! - सडेतोड लोणंद : ‘काँग्रेसचे नेते बाळासाहेब बागवान आज ज्यांच्यावर टीका करीत आहेत, त्या रामराजेंनीच बाळासाहेबांना मोठे केले आहे. आता त्यांना या गोष्टीचा विसर पडला आहे का? बागवान यांनीे पंधरा टक्के लोकवर्गणीच्या योजनेतून भांडी वाटण्याचा बाजार मांडण्याशिवाय दुसरं काय केलंय?’ असा खणखणीत सवाल राष्ट्रवादी काँग्रेसच्या पॅनेलचे प्रमुख आनंदराव शेळके यांनी केला. सर्वच विरोधकांनी राष्ट्रवादीला ‘टार्गेट’ केले असताना, आनंदराव पाटील यांनी मात्र ‘विरोधकांनी पुराव्यासह आरोप करावेत,’ असे प्रतिआव्हान दिले. लोणंद नगरपंचायतीची निवडणूक जसजशी जवळ येत आहे, तसतसे वातावरण तापत आहे. ग्रामपंचायतीत राष्ट्रवादीची सत्ता असून, आता ही निवडणूक पंचरंगी होत आहे. त्यामुळे अर्थातच सर्व विरोधकांचे प्रमुख लक्ष्य राष्ट्रवादीच आहे. ‘लोकमत टीम’ने पॅनेलप्रमुखांच्या भेटीगाठी घेतल्या, तेव्हा हेच दिसून आले. सर्वांनीच राष्ट्रवादी आणि आनंदराव शेळके यांच्यावर प्रचंड टीका केली. या टीकेविषयी बोलताना आनंदराव शेळके यांनी विरोधकांना पुराव्यानिशी बोलण्याचे प्रतिआव्हान विरोधकांना दिले. ‘काँग्रेसचे लोक बिनबुडाचे आरोप करतात. त्यांनी पंधरा वर्षे काम केलेले नसल्याने त्यांच्याकडे दाखविण्यासारखे काही नाही,’ असा टोमणा त्यांनी मारला. काँग्रेसप्रणीत पॅनेलचे नेते बाळासाहेब बागवान यांनी पंधरा टक्के लोकवर्गणीच्या योजनेतून दोनदा भांडीवाटप केले आहे. ‘त्यांना दुसरे काही करता आले नाही. ते फक्त पंधरा टक्क्यांमधून भांडी वाटत बसले,’ अशी खिल्ली आनंदराव शेळके यांनी उडविली. ते म्हणाले, ‘लोणंद ग्रामपंचायतीची सत्ता पंधरा वर्षे काँग्रेसच्या ताब्यात होती.त्यांच्या काळात रस्त्यांवरून नीट चालता येत नव्हते. लोणंदच्या बकालपणाला काँग्रेसच कारणीभूत आहे. त्यामुळेच गेल्या निवडणुकीत काँग्रेसचा पाडाव झाला. दाखवायला कामे नसल्याने त्यांनी टीका करण्याचे धोरण स्वीकारले आहे.’ मिळकती नियमित करण्यासाठी पैसे घेतले जातात, असा आरोप भाजपने केला आहे. हा आरोप बिनबुडाचा असल्याचे सांगून पुरावे देण्याचे आव्हान त्यांनी दिले. भाजपचा दुसरा आरोप फेरीवाले, खोकीधारक व्यावसायिकांविषयी आहे. व्यापाऱ्यांकडून ऐंशी रुपयांची पावती फाडली जाते, या आरोपाला उत्तर देताना ‘ऐंशी नव्हे शंभर रुपये,’ असे आनंदराव शेळकेंनी सांगितले. ‘ग्रामपंचायतीचे उत्पन्न वाढले पाहिजे. सार्वजनिक जागेत व्यापार करून व्यावसायिक मोठा नफा कमावितात. त्यांच्याकडून वसूल केली जाणारी रक्कमही मोठी असावी, असा निर्णय व्यावसायिकांच्या बैठकीतच झाला होता. त्यावेळी आमदारही उपस्थित होते. त्यांच्यासमोर कुणीही जादा वसुलीला विरोध केला नाही. एकालाही रक्कम जादा वाटली नाही. आता मात्र या निर्णयाचे राजकीय भांडवल केले जात आहे,’ असे ते म्हणाले. नगरपंचायत कर्मचारी अवांतर वेळेत घरची कामे करतात ग्रामपंचायतीचे कर्मचारी आनंदराव शेळके यांच्या घरात, शेतात कामे करतात, असा आरोप विरोधकांनी केला होता. त्यांची गाडी ग्रामपंचायत कर्मचारी धूत असल्याचा फोटोही सध्या लोणंदमध्ये गाजतो आहे. त्याविषयी विचारले असता, ‘आमच्या शेतावर आमचे गडी आहेत. ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांचा वापर आम्ही करत नाही,’ असे उत्तर त्यांनी दिले. ‘कर्मचारी ग्रामपंचायतीचे काम करून उरलेल्या वेळात अवांतर कामे करतात. व्यक्तिगत मानधनासाठी ते ही कामे करतात,’ असे उत्तर त्यांनी दिले. ‘ते’ नंतर नीट वागले नाहीत अपक्ष उमेदवार शिवाजीराव शेळके यांच्यावर आनंदराव शेळके यांनी खरपूस टीका केली. ‘संपूर्ण तालुक्याचा विरोध पत्करून मी त्यांना पॅनेलमध्ये घेतले. बाजार समितीचे अध्यक्ष केले. परंतु नंतर ते नीट वागले नाहीत,’ असे आनंदराव म्हणाले. संधी आणि पदे इतर कार्यकर्त्यांनाही मिळायला हवीत, याचे भान ठेवायला हवे, असे त्यांनी नमूद केले. आमदारांना पिन मारली गेली.. लोणंदमधील खोकीधारकांच्या प्रश्नावर राजकारण झाल्याचा आरोप शेळके यांनी विरोधकांवर केला. विक्रेत्यांकडून वसूल होणाऱ्या रकमेत वाढ केली गेल्याचे त्यांनी मान्य केले; मात्र ‘विकासासाठी ग्रामपंचायतीचे उत्पन्न वाढणे आवश्यक आहे. कुणीतरी आमदारांना पिन मारली आणि सर्व फिसकटले,’ असे ते म्हणाले