आज बँकिंग केवळ नेटवर!
By Admin | Updated: November 11, 2014 23:17 IST2014-11-11T22:25:57+5:302014-11-11T23:17:26+5:30
कर्मचारी संपावर : राष्ट्रीयीकृत बँका बंद; पण ‘टेक्नोसॅव्ही’ सुरक्षित

आज बँकिंग केवळ नेटवर!
सातारा : देशभरातील सुमारे दहा लाख बँक कर्मचारी वेतनवाढीच्या मागणीसाठी बुधवारी (दि. १२) संपावर जात असले, तरी ‘टेक्नोसॅव्ही’ ग्राहक सुरक्षित राहणार आहेत. शाखा बंद राहणार असल्या, तरी नेट बँकिंग सुरूच राहणार आहे. एटीएममध्येही पूर्ण क्षमतेने रकमेचा भरणा करण्याची काळजी बँकांनी घेतली आहे.
२३ टक्के वेतनवाढीची मागणी अमान्य झाल्याने ‘युनायटेड फोरम आॅफ बँक युनियन्स’ (यूएफबीयू) या नऊ संघटनांच्या संघाने हा संप पुकारला असून, कनिष्ठ अधिकारीही संपात सहभागी होणार आहेत. या संघात राष्ट्रीयीकृत बँक कर्मचाऱ्यांबरोबरच काही व्यापारी बँकांच्या कर्मचारी संघटनाही सहभागी आहेत. परंतु उर्वरित व्यापारी बँका आणि सहकारी बँका बुधवारी सुरूच राहणार आहेत.
पैसे काढण्याचे व्यवहार बँक ग्राहकांच्या दृष्टीने सर्वांत महत्त्वाचे असतात. एटीएमधारकांना हे व्यवहार संपकाळातही शक्य असल्याने एटीएम कार्ड नसलेल्या तसेच ग्रामीण ग्राहकांची गैरसोय होणार आहे. तसेच भरणा करण्याची मोजकीच यंत्रे शहरात असल्याने अनेकांचा भरणा रखडण्याची शक्यता आहे. मनी ट्रान्स्फरचे व्यवहार इंटरनेटवर शक्य असल्याने व्यावसायिकांची गैरसोय होणार नाही. नेट बँकिंगचा वापर करणारे ग्राहकही सुरक्षित राहणार आहेत. प्रवेश परीक्षा, स्पर्धा परीक्षांसाठी धनाकर्ष पाठवू इच्छिणाऱ्या उमेदवारांची अडचण होणार आहे. (प्रतिनिधी)
अशा आहेत मागण्या
‘इंडियन बँक्स असोसिएशन’बरोबर विविध मागण्यांसाठी सुरू असलेल्या वाटाघाटींची चौदावी फेरी फिसकटल्यानंतर संघटनांनी संपाचे हत्यार उपसले. पगारवाढीबरोबरच राष्ट्रीयीकृत बँकांमधील निर्गुंतवणुकीचे धोरण मागे घ्यावे, एनपीए वसूल करावेत, जनधन योजनेस सहकार्य करणाऱ्या राष्ट्रीयीकृत बँकांमधील कर्मचाऱ्यांच्या समस्या सोडवाव्यात, अशा संघटनेच्या मागण्या आहेत.