बँक अधिकारी असल्याचे भासवून ११ हजारांचा गंडा
By Admin | Updated: July 20, 2015 00:05 IST2015-07-19T21:59:22+5:302015-07-20T00:05:43+5:30
नारळवाडीतील प्रकार : ग्रामस्थांमध्ये खळबळ

बँक अधिकारी असल्याचे भासवून ११ हजारांचा गंडा
मल्हारपेठ : बॅँक अधिकारी असल्याचे सांगून एका वृत्तपत्र विक्रेत्याच्या खात्यातून ११ हजार रुपये लंपास केल्याची घटना रविवारी उघडकीस आली. या घटनेमुळे सर्वत्र खळबळ उडाली आहे.
नारळवाडी, ता. पाटण येथील अनिल रघुनाथ वायदंडे वृत्तपत्र विक्रीचा व्यवसाय करतात. रविवारी दुपारी १२ वाजता वायदंडे यांच्या मोबाइलवर एका व्यक्तीचा फोन आला. संबंधित व्यक्तीने आपण बॅँकेतून बोलत असल्याचे सांगून तसेच एटीमए कार्ड पुढे सुरू ठेवण्यासाठी वायदंडे यांना स्वत:चा आधारकार्ड व एटीएम कार्डचा क्रमांक देण्यात सांगितले. संबंधित व्यक्तीवर विश्वास ठेवून वायदंडे यांनी त्याला आपला एटीएम व आधारकार्ड क्रमांक दिला.
काही वेळातच बॅँक खात्यातून ११ हजार २२४ रुपये काढण्यात आल्याची माहिती वायदंडे यांना आपल्या मोबाइलवर आलेल्या एसएमएसच्या माध्यमातून कळाली. आपल्यासोबत झालेली फसवणूक लक्षात येताच वायदंडे यांनी पोलीस ठाण्यात धाव घेऊन फिर्याद दाखल केली. (वार्ताहर)