थकबाकी वसुलीसाठी बॅँडपथक दारात
By Admin | Updated: March 8, 2016 00:54 IST2016-03-07T22:11:07+5:302016-03-08T00:54:36+5:30
कऱ्हाड पालिका : गाणे, रेकॉर्डिंगसह थकबाकीधारकांचे फलकही तयार; दहा तारखेपासून मोहिमेस प्रारंभ

थकबाकी वसुलीसाठी बॅँडपथक दारात
कऱ्हाड : शहरातील संकलित कराची रक्कम न भरणाऱ्या थकबाकीधारकांच्या दारात पालिकेच्या वतीने दहा तारखेपासून बॅन्डपथक तसेच रिक्षातून गाणे वाजवून थकबाकीची रक्कम भरावे, असे आवाहन केले जाणार आहे. यासाठी विशेष गाणेही तयार करण्यात आले आहे. तसेच ठराविक सूचनांचे रेकॉर्डिंगही तयार करून ते वाजविले जाणार आहे.
फलकांवरील नावांच्या प्रकारामुळे थकबाकीधारकांनी पालिकेच्या वसुलीमोहिमेची धास्ती घेतली असून, त्यांच्याकडे जानेवारी अखेरपासून आजपर्यंत सुमारे दोन कोटींहून अधिक कराची रक्कम पालिकेत जमा करण्यात आली आहे. तसेच प्रत्येक दिवसाला सुमारे दहा लाखांहून अधिक रक्कम जमा होत आहे.
९० टक्के थकबाकी वसुली झाल्याखेरीज वसुलीच्या प्रमाणात मिळणारे अनुदान कऱ्हाड पालिकेला मिळणार नसल्याने तरीही पालिकेकडून शहरात मार्चअखेर मोठ्या प्रमाणात कर वसूल करण्यासाठी शर्तीचे प्रयत्न केले जात आहे. अशात पालिकेने लावलेल्या वसुलीच्या धडाक्यामुळे पालिकेत महिन्याभरात कोटींची वसुली झाली आहे. मात्र, सर्वात जास्त वसुली ही आठवडाभरात झाली असल्याचे निदर्शनास आले आहे. २८ फेबु्रवारी रोजी पालिकेने शहरात लावलेल्या थकबाकीधारकांच्या फलकामुळे कराची रक्कम भरण्यास गती मिळाली. तेव्हापासून ते आजपर्यंत आठवडाभरात सुमारे १ कोटी ३५ लाख रुपयांहून अधिक रक्कम पालिकेत जमा झाली.
कऱ्हाड शहरात फेब्रुवारी अखेरपासून पालिकेने करवसुलीचा थकबाकीधारकांच्या पाठीमागे तगादा लावला आहे. फेब्रुवारी अखेरपासून आजपर्यंत पालिकेत दोन कोटींहून अधिक कराची रक्कम जमा झाली आहे. विशेष म्हणजे सकाळी दहा वाजल्यापासून ते रात्री आठ वाजेपर्यंत पालिकेच्या वसुलीविभागातील कर्मचारी ही रविवारी सुट्टीच्या दिवशीही हजर राहून कराची रक्कम भरून घेत आहेत.
मार्च महिना आल्याने शासकीय कामांची पूर्तता तसेच कर्जदारांकडून वसुली अशाप्रकारची कामे शासकीय व खासगी संस्थांकडून हाती घेतली जातात. अशात शहरातील नागरिंकांना देण्यात येणाऱ्या सुविधांतून पालिका कर वसूल करत असते. त्यामध्ये पाणीपट्टी, घरपट्टी, वीजकर, अग्निशमक, आरोग्यकर, सफाईकर अशा प्रकारच्या सात करांचा समावेश आहे. पालिकेस प्रत्येकवर्षी शंभरटक्के करवसुली करणे गरजेची असते. त्यात वर्षभर कमी प्रमाणात तर फेबु्रवारी-मार्च महिन्यांत वसुलीची मोहीम युद्धपातळीवर राबविली जात आहे. सध्या ही मोहीम मोठ्या प्रमाणात राबविली जात आहे.
वर्षभर पालिकेच्या सुविधा उपभोगणाऱ्या नागरिकांकडून कर भरण्यास विलंब लावला जात असल्याने त्यांच्यावर कडक स्वरूपात कारवाई करण्याचा निर्णय मुख्याधिकारी विनायक औंधकर यांनी घेतला आहे. त्यासाठी परिणामी थकबाकीधारकांची नावे ही प्रत्यक्ष फलकांवर टाकून त्यांच्या घरापुढे बॅन्डपथकही वाजविण्यात येणार आहे. त्यामुळे थकबाकीधारकांचे चांगलेच धाबे दणाणले आहे.
पालिकेकडून करण्यात आलेल्या वसुलीमध्ये सर्वाधिक वसुलीचा दिवस म्हणजे सोमवार, दि. २९ फेबु्रवारी रोजी ६५ लाख, मंगळवारी १ मार्च रोजी दहा लाख, बुधवारी २ मार्च रोजी साडेअकरा लाख, गुरुवारी ३ मार्च रोजी नऊ लाख, शनिवारी ४ मार्च रोजी अकरा लाख, रविवारी, ५ रोजी सायंकाळी सात वाजेपर्यंत सुमारे दहा लाख रुपये असे एकूण १ कोटी १७ लाख ५० हजार रुपये रोख रक्कम तसेच याहूनही अधिक रक्कम पालिकेत आत्तापर्यंत जमा झाली आहे. गेल्या वर्षी ३१ मार्च या शेवटच्या दिवशी ५४ लाख रुपये कराची रक्कम जमा झाली होती. (प्रतिनिधी)
६ हजार फलक तयार...
कऱ्हाड शहरात एकूण सात प्रभाग आहेत. त्यामध्ये प्रत्येक प्रभाग व वाढीव हद्द धरून सुमारे ६ हजार ११६ हून अधिक थकबाकीधारक आहेत. त्यांच्या नावांचे फलक तयार करण्यात आले आहे. ते शहरातील प्रत्येक प्रभागात कोणत्याही क्षणी लावण्याची शक्यता आहे. त्यामुळे जास्तीत जास्त थकबाकीधारकांनी आपली रक्कम पालिकेच्या करवसुली विभागात भरावी, असे आवाहन करवसुली विभागप्रमुख राजेश काळे यांनी केले आहे.
असा आहे फलक!
थकबाकीधारकांच्या नावांचा तयार करण्यात आलेल्या फलकावर जाहीर स्वरूपात कऱ्हाड पालिका सन २०१५-१६ मधील थकबाकीदारांची यादी असे ठळक अक्षरात नाव टाकण्यात आले आहे. तसेच त्यापुढे पेठेचेही नाव टाकण्यात आले आहे. फलकावर अनुक्रमणिक, घरनंबर, थकबाकीधारकाचे नाव, थकित असलेली रक्कम या गोष्टी ठळक अक्षरात टाकण्यात आलेल्या आहेत. आठ फूट रुंद व सहा फूट लांबी असलेल्या एका फ्लेक्सवर ९० ते १०० थकबाकीधारकांची नावे टाकण्यात आली आहेत.