बंदी उठली.. गर्दी लोटली!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 9, 2021 04:47 IST2021-06-09T04:47:20+5:302021-06-09T04:47:20+5:30
सातारा : संचारबंदीमुळे होणारी नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी प्रशासनाने सोमवारपासून संचारबंदीचे निर्बंध थोडे शिथिल केले. मात्र पहिल्याच दिवशी या सवलतीचा ...

बंदी उठली.. गर्दी लोटली!
सातारा : संचारबंदीमुळे होणारी नागरिकांची गैरसोय टाळण्यासाठी प्रशासनाने सोमवारपासून संचारबंदीचे निर्बंध थोडे शिथिल केले. मात्र पहिल्याच दिवशी या सवलतीचा सातारकरांनी गैरफायदा घेतल्याचे दिसून आले. शहरात सकाळपासूनच नागरिकांची खरेदीसाठी झुंबड उडाली. सोशल डिस्टन्स तर लांबच, पण बहुतांश नागरिकांनी मास्क वापरण्याची तसदी घेतली नाही. कोरोनाचा धोका अजून टळला नाही; परंतु नागरिकांमध्ये याचे थोडेही गांभीर्य दिसून आले नाही.
सातारा जिल्ह्यात एप्रिल व मे महिन्यात कोरोनाचा अक्षरश: विस्फोट झाला. त्यामुळे कोरोनाचे संक्रमण रोखण्यासाठी जिल्हा प्रशासनाकडून संचारबंदी लागू करण्यात आली. टप्प्याटप्प्याने संचारबंदीचे निर्बंध अधिक कठोर करण्यात आले. जिल्हाधिकाऱ्यांकडून प्रतिबंधित क्षेत्रासह सर्वच ठिकाणच्या अत्यावश्यक सेवा बंद ठेवण्यात आल्या. या कडक संचारबंदीचे परिणाम आता कुठे समोर येऊ लागले आहेत. दररोज दोन ते अडीच हजार कोरोनाबाधित रुग्ण जिल्ह्यात आढळून येत होते. हे प्रमाण आता अकराशे ते बाराशे यादरम्यान आले आहे. कोरोना रुग्णसंख्या कमी झाल्याने जिल्हाधिकाऱ्यांकडून सोमवारपासून संचारबंदीचे निर्बंध शिथिल करण्यात आले. भाजीपाला, किराणा यांसह अत्यावश्यक सेवा वेळेचे बंधन घालून सुरू करण्यास मुभा देण्यात आली. जवळपास महिनाभरानंतर साताऱ्यातील दुकाने सोमवारी सुरू झाली. त्यामुळे व्यापारी, विक्रेते व नागरिकांना मोठा दिलासा मिळाला.
सोमवारी सकाळपासूनच नागरिक मोठ्या संख्येने खरेदीसाठी घराबाहेर पडले. त्यामुळे गेल्या अनेक दिवसांपासून शांत असलेल्या चांदणी चौक, खण आळी, मोती चौक, जुना मोटर स्टँड, ५०१ पाटी हा संपूर्ण परिसर नागरिकांनी गजबजून गेला होता. काही ठिकाणी सोशल डिस्टन्स ठेवून खरेदी करण्यात आली, तर काही ठिकाणी सोशल डिस्टन्सचा पूर्णपणे फज्जा उडाला. नागरिकांनी तोंडाला मास्कही लावले नव्हते. पोलीस प्रशासनाकडून नागरिकांना सुरक्षिततेच्या वारंवार सूचना करण्यात आल्या. परंतु प्रशासनाच्या सूचनांकडे दुर्लक्ष करण्यात आले. जे काही खरेदी करायचे ते आजच, अशी गाठ मनाला बांधूनच सातारकरांनी बाजारपेठेत प्रचंड गर्दी केली. ही परिस्थिती अशीच राहिली तर सातारकरांसाठी ती पुन्हा धोक्याची घंटा ठरू शकते.
(चौकट)
अंतर्गत रस्ते बंदच
विनाकारण फिरणारे नागरिक व वाहनधारकांवर अंकुश लावण्यासाठी पालिका व पोलीस प्रशासनाकडून शहरातील मुख्य तसेच अंतर्गत रस्ते वाहतुकीसाठी बंद करण्यात आले आहेत. त्यामुळे खरेदीसाठी घराबाहेर पडणाऱ्या नागरिकांना मोठा वळसा घालून बाजारपेठेत खरेदी करावी लागली. अंतर्गत रस्ते बंद असल्याने अनेकांना त्याचा नाहक त्रास सहन करावा लागला.
(चौकट)
खरेदीच्या नावाखाली फेरफटका
अत्यावश्यक सेवेची दुकाने सकाळी ९ ते दुपारी २ या वेळेत सुरू ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांनी निर्गमित केले आहेत. त्यामुळे किराणा व भाजीपाला खरेदीसाठी नागरिक मोठ्या संख्येने घराबाहेर पडले. यामध्ये केवळ भटकंतीसाठी घराबाहेर आलेल्या नागरिकांची व तरुणांची संख्याही सर्वाधिक होती. दुपारी दोननंतर बाजारपेठेतील गर्दी ओसरली, मात्र सायंकाळी सहानंतर अजिंक्यतारा, यवतेश्वर तसेच कुरणेश्वर परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने फेरफटका मारताना दिसून आले.
(चौकट)
गर्दीची ठिकाणं
समर्थ मंदिर चौक
राजवाडा
तांदूळ आळी
मोती चौक
प्रतापगंज पेठ परिसर
जुना मोटर स्टँड
५०१ पाटी
पोवईनाका
फोटो मेल :
संचारबंदीचे निर्बंध शिथिल झाल्यानंतर साताऱ्यातील बाजारपेठेत सोमवारी नागरिकांनी खरेदीसाठी अशी गर्दी झाली होती. (छाया : जावेद खान)