ट्रॅक्टर भाडे वाढल्याने बळीराजाची कसरत !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 5, 2021 05:03 IST2021-05-05T05:03:38+5:302021-05-05T05:03:38+5:30
पळशी : माण तालुक्यातील पळशी, मार्डी, मोहीसह परिसरात शेतीच्या कामासाठी ट्रॅक्टरचा मोठ्या प्रमाणात वापर केला जात आहे. मात्र, सततच्या ...

ट्रॅक्टर भाडे वाढल्याने बळीराजाची कसरत !
पळशी : माण तालुक्यातील पळशी, मार्डी, मोहीसह परिसरात शेतीच्या कामासाठी ट्रॅक्टरचा मोठ्या प्रमाणात वापर केला जात आहे. मात्र, सततच्या इंधन दरवाढीमुळे ट्रॅक्टर व विविध उपकरणांवरील मशागतीच्या खर्चात वाढ झाल्याने बळीराजाचे शेती मशागतीचे गणित कोलमडले आहे. त्यामुळे आर्थिक ताळमेळ बसवताना शेतकऱ्यांना कसरत करावी लागत आहे.
सर्वसामान्य नागरिकांबरोबरच आता इंधन वाढीचा फटका शेतकऱ्यांनाही बसत आहे. शेतीसाठी ट्रॅक्टरचा अधिक वापर होत असून, ट्रॅक्टरमुळे वेळेची व श्रमाची बचत होत असली तरी त्याला लागणाऱ्या डिझेल व ऑइलचे दर दिवसेंदिवस वाढत आहेत. त्यामुळे मशागतीच्या दरातही कमालीची वाढ होत आहे. सध्या ७०० रुपये प्रतितास ट्रॅक्टर भाडे घेतले जात आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना ट्रॅक्टरची मशागत डोईजड होऊ लागली आहे.
पूर्वी अल्पभूधारक शेतकऱ्यांच्या दारात बैलजोडी हमखास असे, पण यांत्रिकीकरणामुळे त्याच दारात आता ट्रॅक्टर दिसत आहेत. मशागतीपासून ते पेरणीपर्यंतची कामे काही तासांत होत असल्याने शेतकरी ट्रॅक्टरच्या साह्याने शेती करत आहे. त्यामुळे वेळेची व श्रमाची बचत होत आहे.
एकीकडे परिश्रम व वेळेची बचत होत असली तरी इंधन दरवाढीमुळे शेतीवर होणार खर्च दिवसेंदिवस वाढतच आहे. बरेच शेतकरी भाडेतत्त्वावर शेतीची मशागत करतात. त्यामुळे त्यांना जादा पैसे मोजावे लागत आहेत. एकरी दोन ते अडीच हजार नुसता नांगरणीचा खर्च होत आहे. तर शेणखताच्या ट्रॉलीचा दर चार हजारांवर गेला आहे. त्यामुळे उत्पन्न कमी आणि खर्च अधिक अशी अवस्था बळीराजाची झाली आहे.
लॉकडाऊनमध्ये कांदा दर पडल्याने अनेकांचा कांदा दारातच पडून आहे. त्यामुळे मशागतीच्या खर्चाचा मेळ बसवणे अवघड झाले आहे.
प्रतिक्रिया
दरवर्षी खते, बी-बियाण्यांच्या किमती वाढत आहेत, तर मोठ्या कष्टाने आणलेल्या पिकाला योग्य भाव मिळत नाही. आता डिझेल वाढीमुळे ट्रॅक्टरचे भाडेही वाढले आहे. त्यामळे शेतीत उत्पन्न कमी आणि खर्च अधिक होत आहे.
-आप्पासो गायकवाड, शेतकरी, मार्डी
०३पळशी
फोटो
: माण तालुक्यातील पळशी परिसरात ट्रॅक्टरच्या साह्याने नांगरणीची कामे सुरू आहेत. ( छाया : शरद देवकुळे)