अंगापुरात पावसाच्या हजेरीने बळीराजा सुखावला!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2021 04:48 IST2021-07-07T04:48:41+5:302021-07-07T04:48:41+5:30
अंगापूर : गेली पंधरा ते वीस दिवसांपासून दडी मारलेल्या पावसाने अचानकपणे अंगापूर परिसरात जोरदार हजेरी लावली. पावसाने सर्वत्र ...

अंगापुरात पावसाच्या हजेरीने बळीराजा सुखावला!
अंगापूर : गेली पंधरा ते वीस दिवसांपासून दडी मारलेल्या पावसाने अचानकपणे अंगापूर परिसरात जोरदार हजेरी लावली. पावसाने सर्वत्र पाणीच पाणी दिसून येत होते. त्यामुळे खरिपाच्या पिकांना मोठा दिलासा मिळाला असून, चिंताग्रस्त बळीराजा काही प्रमाणात सुखावला आहे.
गेल्या वीस दिवसांपूर्वी सर्वत्र चांगल्या स्वरूपाचा पाऊस झाला होता. त्यामुळे शेतकऱ्यांनी सोयाबीन, भात, भुईमूग, कडधान्य यासारख्या आदी पिकांची पेरणी केली. त्यानंतर मात्र पावसाने गेली वीस दिवसांपासून दडी मारली होती. काही दिवस आभाळी तर काही दिवस कडक ऊन पडत होते. ऐन पावसाळ्यात कडक ऊन पडत असल्यामुळे पेरणी केलेल्या बहुतांशी कोवळ्या पिकांनी माना टाकल्या होत्या. निसर्गाच्या या लहरीपणामुळे शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट येतेय की काय? अशी शंका निर्माण होत होती. त्यामुळे शेतकरी पूर्णतः चिंताग्रस्त झाले होते. अशातच सोमवारी दुपारी अचानक वातावरणात बदल होऊन पाऊस सुरू झाला. दीड तास पडणाऱ्या पावसामुळे काही वेळातच सर्वत्र पाणीच पाणी दिसून येत होते. त्यामुळे शेतात गेलेल्या शेतकऱ्यांची एकच तारांबळ उडाली. या पावसामुळे खरीप हंगामातील कोवळ्या पिकांना काही दिलासा मिळणार असल्याने शेतकरी सुखावला आहे.
चौकटः
दहा दिवसांपासून उष्णतेत वाढ ..
गेल्या वीस दिवसांपासून पावसाने दडी मारली. सुरुवातीला काही दिवस आभाळ तर गेली दहा ते बारा दिवसांपासून उन्हाचा तडाखा बसत होता. त्यामुळे ऐन पावसाळ्यात उन्हाळा जाणवत होता. त्यामुळे वातावरणात बदल होऊन उष्णतेत वाढ झाल्याचे चित्र दिसून येत आहे.
०५अंगापूर
सातारा तालुक्यातील अंगापूर परिसरात अचानकपणे पाऊस झाल्याने रस्त्यावर मोठ्या प्रमाणात पाणी दिसून येत होते.
(छाया : संदीप कणसे)