बळीराजा बनतोय ‘गुंठे-पाटील’

By Admin | Updated: December 29, 2014 00:04 IST2014-12-28T21:59:07+5:302014-12-29T00:04:03+5:30

खंडाळा, शिरवळ पाठोपाठ सुरुरही : शेती करण्यापेक्षा जागा विकण्याच्या मानसिकतेत वाढ

Baliaraja bantoya 'Guntha-Patil' | बळीराजा बनतोय ‘गुंठे-पाटील’

बळीराजा बनतोय ‘गुंठे-पाटील’

कवठे : औद्योगिकीकरणामुळे जमिनीच्या किमतीत झपाट्याने वाढ होत आहे. त्यामुळे शेती करण्यापेक्षा जमिनी विकण्याची मानसिकता वाढीस लागली आहे. त्यामुळे बळीराजा आता ‘गुंठेपाटील’ बनायला लागला आहे. खंडाळा तालुका एकेकाळी ओसाड म्हणून ओळखला जायचा. नगदी पिकेही घेता येत नव्हती. यामुळेच खंडाळा तालुक्यातील शेतकरी शेती करायचा नाद सोडून विकण्याची भाषा करू लागला. औद्योगिकीकरणामुळे जमिनीच्या किमती झपाट्याने वाढू लागल्या, तर दुसरीकडे शेतीसाठी धोम धरण कालव्याचे पाणी शिवारातील ओढ्या-नाल्यातून खळखळण्याची चिन्हे दिसू लागली आहे. पैशांच्या लोभापायी खंडाळा तालुक्यातील शेतकरी जमीन विकू लागला. अठराविश्व दारिद्र्यातून बाहेर आल्याने इतका बक्कळ पैसा एकदम पहिला आणि त्याला श्रीमंती चोचले पुरवावी वाटू लागले. त्यातून अनेकांच्या घरासमोर चारचाकी वाहने दिसायला लागली आहेत. पैशांमुळे व्यसनाधीनतेकडे वळालेले जमिनी विकू लागले आहेत. जमिनी संपल्या की, ‘विक गुंठा’ अशी त्यांची अवस्था झाली आहे. त्यावरूनच त्यांना ‘गुंठेपाटील’ हे नाव रुढ झाले. याचाच दुष्परिणाम म्हणून काही शेतकऱ्यांना सर्वस्व गमावून आपल्याच विकलेल्या जमिनीच्या तुकड्यावर रखवालदारी करण्याची वेळ नियतीने आणली. धोम कालव्याच्या खंडाळा भागातील पाण्याने शेतकरी वर्गाला शेती करावीशी वाटतेय, तर काही भागांत विकायला शेती उपलब्धच नाही. त्यामुळे शेतजमीन खरेदीविक्री करण्याऱ्या एजंटांचे डोळे या भागावरून हटले आणि आता वाई तालुक्यातील सुरुर, कवठे परिसरातील शेतीवर स्थिरावू लागली आहे. या भागातील शेतकऱ्यांना खंडाळा परिसरातील बक्कळ पैसा दिसू लागलाय आणि या भागातील शेतकरीही खुशीने शेती विकायला लागला आहे. सुरुरपासून वाईपर्यंत रस्त्यालगतच्या बहुतांश जमिनीची मालकी शेतकऱ्यांची न राहता पुणेरी बिगर शेतकऱ्यांची झाली आहे. सुरूर-कवठे परिसरातील शेतकरी दुचाकी, चारचाकी वाहनांतून फिरत आहे. याला शेतकऱ्यांएवढेच श्रीमंतीचे स्वप्न दाखविणारे एजंटही जबाबदार आहेत. (वार्ताहर) कवठे परिसरातील डोंगरावर पवनचक्क्या बसवल्याने रानडुकरे व अन्य प्राणी खाली डोंगर सोडून डोंगरालगतच्या शेतीत वावरून पिकांची नासाडी करू लागलेत. त्यामुळे उत्पन्न सापडत नाही व मुबलक दर मिळत असल्याने येथील शेतकरीही शेताची विक्री करण्याकडे वळत आहे. तसेच वाई-सुरुर रस्त्यालगतची शेतीही मुरमाड असल्याने शेती पिकत नाही व ज्यादा दर मिळत असल्याने तीही विकली जात आहे. यात मात्र प्रत्येक गावातील जमिनीवर ‘शहरी मालक’ कुंपण घालून पडीक शेतजमीन राखताना दिसत आहेत.

Web Title: Baliaraja bantoya 'Guntha-Patil'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.