विजयी चौकाराने विरोधकांना बाळासाहेबांचे ‘उत्तर’!
By Admin | Updated: October 20, 2014 22:36 IST2014-10-20T21:49:53+5:302014-10-20T22:36:54+5:30
कऱ्हाड उत्तरेत शिट्टी वाजली नाही : हातावर मात करीत राष्ट्रवादी पुन्हा पुढे

विजयी चौकाराने विरोधकांना बाळासाहेबांचे ‘उत्तर’!
कऱ्हाड : कऱ्हाड उत्तर विधानसभेच्या मतमोजणीत सुरूवातीला काही फेऱ्यांत स्वाभिमानीच्या घोरपडेंनी आघाडी घेतली अन् अनेकांची ‘शिट्टी’ वाजली; पण त्यानंतर राष्ट्रवादीचे आमदार बाळासाहेब पाटील यांच्या ‘घड्याळा’तील मताधिक्क्याचे काटे पुढे सरकु लागले. ते काँग्रेसच्या धैर्यशिल कदमांच्या ‘हाता’ला लागले नाहीत़ सरते शेवटी २० हजार ५०७ चे मताधिक्य घेत बाळासाहेबांनी विजयाचा चौकार मारत विरांधकांना चोख ‘उत्तर’ दिलं़
पाच वर्षांपूर्वी मतदार संघ पुनर्रचनेत कऱ्हाड उत्तरमधुन कऱ्हाड शहरासह १४ गावे दक्षिणेत गेली. सातारा तालुक्यातून दोन आणी खटाव तालुक्यातील एक जिल्हा परिषद गट नव्याने उत्तरला जोडण्यात आला. त्यामुळे या मतदार संघाचं विजयाचं ‘उत्तर’ मिळविणं अवघड बनलं़ तरीही गत विधानसभा निवडणूकीत बाळासाहेबांनी ४२ हजारांचे मताधिक्य घेत विजयाची ‘हॅटट्रीक’ मारली़ सह्याद्री सहकारी साखर कारखान्याचे कार्यक्षेत्र त्यांच्या पथ्थ्यावर पडले़
यंदाच्या निवडणूकीत काँग्रेस आघाडीत झालेली बिघाडी आमदार पाटलांना अडचणीची ठरेल, असे वाटू लागले़ भरीस भर म्हणून घोरपडेंचा ‘स्वाभिमान’ जागा झाला़ ऐनवेळी धैर्यशिल कदमांच्या ‘हाता’ला काँग्रेसनंही बळ दिलं़ हे ‘मनो धैर्य’ प्रस्थापितांची डोकेदुखी वाढवु लागलं़ गेल्या पाच वर्षात पुलाखालून बरेच पाणी वाहून गेलेले़ माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण अन् आमदार आनंदराव पाटील यांच्या माध्यमातून धैर्यशिल कदमांनी कोट्यावधी रूपयांचा निधी या मतदार संघात आणला़ तर संवाद यात्रेच्या माध्यमातून गावागावात जावून त्याचा डंकाही वाजविला़ त्याचा फायदा कदमांना मिळाल्याचे मताच्या आकड्यावरून स्पष्ट होते़
गतवेळी बाळासाहेबांच्या ‘फ्रंटलाईन आॅफ अॅक्शन’ मध्ये असणाऱ्या मनोज घोरपडेंनी यंदा मतदार संघात ‘शिट्टी’ वाजविण्याचा निर्णय घेतला़ सदाभाऊ खोत, खासदार राजू शेट्टी, महादेव जानकर यांच्या प्रचार सभा घेऊन प्रचारात गती आणली़ त्यामुळे मुख्य लढत बाळासाहेब आणि घोरपडेंच्यात होईल, अशी अटकळ बांधली गेली़; पण गेली ३ वर्षे काँग्रेसच्या माध्यमातून तयारीत असणारे धैर्यशिल कदमच दुसऱ्या स्थानावर राहिले़ (प्रतिनिधी)
मतविभागणी पडली पथ्यावर
कऱ्हाड उत्तर मतदार संघात आमदार बाळासाहेब पाटील २० हजार ५०७ मतांनी विजयी झाले़ त्यांना एकूण ७८ हजार ३२४ मते मिळाली; पण त्यांचे नजिकचे प्रतिस्पर्धी काँग्रेसचे धैर्यशिल कदम यांना ५७ हजार ८१७ तर स्वाभिमानीच्या मनोज घोरपडेंना ४२ हजार ९०३ मते मिळाली़ त्या दोघांच्या मतांची बेरीज १ लाख ७२० एवढी होते़ ही मते बाळासाहेब पाटलांना नक्कीच विचार करायला लावणारी आहेत़ कदाचित यंदाच्या या निवडणूकीत ही मतविभागणीच बाळासाहेबांच्या पथ्यावर पडली, असे म्हटले तर वावगे ठरणार नाही़
मुख्यमंत्र्यांची सभा नाही
माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी राज्यभर काँग्रेसच्या उमेदवारांसाठी प्रचारासभा घेतल्या़ सातारा जिल्ह्यातही अनेक सभा झाल्या; पण चव्हाण कऱ्हाड दक्षिणेतून लढत असताना नजिकच्या कऱ्हाड उत्तर मतदारसंघात त्यांची एकही सभा झाली नाही़ याची कार्यकर्त्यांच्यात चर्चा आहे़
सप्तरंगी लढतीत राष्ट्रवादी पुढे
गतवेळी अपक्ष म्हणून निवडून आलेल्या आमदार बाळासाहेब पाटील यांच्या कऱ्हाड उत्तर मतदार संघात यंदा एकही अपक्ष उमेदवार नव्हता, हे विशेष ! राष्ट्रवादीसह काँग्रेस, स्वाभिमानी, मनसे, शिवसेना, बविपा, बसपा या सात पक्षांच्या उमेदवारांनी आपापले झेंडे फिरवले; पण राष्ट्रवादीने विजयाचा झेंडा फडकावला़
राजेंसह मावळ्यांची साथ
कऱ्हाड उत्तरमध्ये सातारा तालुक्यातील २ जिल्हा परिषद गटांचा समावेश आहे़ साहजिकच खासदार उदयनराजे आणि आमदार शिवेंद्रराजे भोसले यांचे तिथे गट सक्रिय आहेत़ या दोन्ही राजांनी बाळासाहेबांच्या पाठिशी ठाम राहण्याचा निर्णय घेतला़ तर राष्ट्रवादी अंतर्गत अजित पवारांना मानणाऱ्या सर्व दुसऱ्या फळीतील नेत्यांनीही बाळासाहेबांना मदत केली़ त्यामुळे विजयाचा मार्ग सुकर झाला़
सातारा तालुक्यातील मते राष्ट्रवादीकडेच होती. अजिंक्यतारा कारखान्यामुळे ती आधीच बांधली गेली आहेत. मात्र, शिवेंद्रसिंहराजेंचा मतदारसंघ या गावांत येत नसल्याने निष्ठावंतांची गोची झाली होती.