बाळासाहेबांचा वांदा; ‘राष्ट्रवादी’त पेच!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 23, 2015 00:29 IST2015-04-22T23:26:08+5:302015-04-23T00:29:55+5:30
निर्णय अजितदादांकडे : बारामतीमध्ये आमदारांच्या बैठकीत इतर नावांचा फैसला; उद्या घोषणा !

बाळासाहेबांचा वांदा; ‘राष्ट्रवादी’त पेच!
सातारा : जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीसाठी सत्ताधारी गटाच्या उमेदवारांची अंतिम यादी ठरविण्यासाठी राष्ट्रवादीची बुधवारी बारामतीत बैठक झाली. कृषी प्रक्रिया मतदारसंघातून आमदार बाळासाहेब पाटील व ज्येष्ठ संचालक दादाराजे खर्डेकर यांच्यापैकी कोणाला माघार घ्यायला लावायची, यावरून निर्माण झालेला पक्षांतर्गत पेच सोडविण्याची जबाबदारी उपस्थित आमदारांनी माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावरच सोपवली. इतर मतदारसंघांतील निर्णय स्थानिक पातळीवर घेण्याची सूचना अजित पवारांनी केल्याने बारामतीवरुन परतताना फलटणमध्ये रामराजेंच्या निवासस्थानी यावर चर्चा केली. दरम्यान, उद्या, शुक्रवारी राष्ट्रवादीची अंतिम यादी पुढे येईल, अशी माहिती रामराजे यांनी ‘लोकमत’शी बोलताना दिली.
बारामती येथील अजित पवार यांच्या निवासस्थानी बुधवारी सकाळी साडेदहा वाजता ही बैठक झाली. या बैठकीसाठी पक्षाचे ज्येष्ठ नेते लक्ष्मणराव पाटील, विधान परिषद सभापती रामराजे नाईक-निंबाळकर, आ. मकरंद पाटील, आ. प्रभाकर घार्गे, आ. शिवेंद्रसिंहराजे भोसले, आ. बाळासाहेब पाटील, माजी मंत्री विक्रमसिंह पाटणकर यांनी उपस्थिती लावली होती.
आ. शशिकांत शिंदे नवी मुंबई महानगरपालिकेच्या प्रचारात असल्याने त्यांनी बैठकीला उपस्थित राहू शकणार नसल्याची माहिती दूरध्वनीवरुन अजित पवार यांना दिली होती.
साताऱ्यातील राष्ट्रवादीच्या सर्व आमदारांच्या वतीने तयार करण्यात आलेल्या प्राथमिक यादीवर अजित पवारांनी नजर टाकली. ‘प्रस्थापित मतदार संघांव्यतिरिक्त राखीव मतदार संघाच्या नावाबाबत कोणती अडचण आहे का ?’, याची विचारणाही त्यांनी रामराजे व लक्ष्मणराव पाटील यांच्याकडे केली. कृषी प्रक्रिया मतदारसंघातच पक्षांतर्गत पेच असल्याचा विषय यावेळी उपस्थित करण्यात आला. याबाबत स्थानिक पातळीवर निर्णय घेणे शक्य झाले नसल्याने अजित पवारांनीच त्यावर निर्णय घेण्याबाबत बैठकीतील उपस्थितांनी सुचविले.
खासदार उदयनराजे भोसले हे या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पक्षाच्या नेत्यांवरच आरोप करत असल्याची बाब पवारांसमोर मांडण्यात आली. तसेच उदयनराजेंच्या या भूमिकेबाबत या बैठकीमध्ये नाराजीही व्यक्त करण्यात आली.
दरम्यान, बँक निवडणुकीत सातारा तालुक्याला दोन जागा देण्याबाबत अजित पवारांनी सूचना केल्याचे खात्रीलायक वृत्त आहे. त्यामुळे शिवेंद्रसिंहराजेंव्यतिरिक्त आणखी एकाच संचालकाला तालुक्यातून संधी मिळण्याची शक्यता दिसत आहे. हा निर्णय अंतिम ठरल्यास आमदार शिवेंद्रसिंहराजेंच्या गटाची एक जागा कमी होणार आहे. (प्रतिनिधी) /आणखी वृत्त ३
‘खटाव सोसायटी’तून
दोघांची माघार
खटाव तालुका सोसायटी मतदारसंघातून विद्यमान संचालक आ. प्रभाकर घार्गे यांच्या विरोधातील शिवसेनेचे सत्यवान कांबळे व राष्ट्रवादीचे नामदेव गोडसे यांनी आपले अर्ज मागे घेतले.
कांबळे हे माजी जिल्हा परिषद सदस्य रणजितसिंह देशमुख यांचे निकटवर्तीय आहेत. आता घार्गे यांच्यासमोर काँग्रेसचे संतोष पवार यांचे एकमेव आव्हान उरले आहे.
सर्व अर्ज मागे घेतले जातील : रामराजे
इतर मतदारसंघांतील उमेदवारांची यादी अंतिम करण्याबाबत अजित पवारांनी रामराजे व लक्ष्मणराव पाटील यांना संपूर्ण अधिकार दिले. बारामतीवरुन साताऱ्याकडे परतताना काही मंडळी रामराजेंच्या निवासस्थानी थोडा वेळ थांबले होते. याठिकाणी उर्वरित जागांबाबत निर्णय झाला. याबाबत रामराजेंशी संपर्क साधला असता ‘उद्या, शुक्रवारी विरोधातील सर्व अर्ज मागे घेतले जातील,’ असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
उदयनराजेंना सोबत घ्या : अजितदादा
उदयनराजे भोसले हे राष्ट्रवादीचे खासदार आहेत, त्यामुळे बँकेच्या निवडणुकीत त्यांना सोबत घेण्याचा सल्ला अजित पवारांनी यापूर्वीही दिला होता, त्याचाच पुनरुच्चार त्यांनी पुन्हा बुधवारी झालेल्या बैठकीतही केला.