लाचलुचपत विभागाची नववर्षारंभीच ‘बोहनी’!

By Admin | Updated: January 2, 2015 00:21 IST2015-01-01T23:29:46+5:302015-01-02T00:21:49+5:30

कोयना वसाहत : ग्रामसेवकावर गुन्हा

Bachani is the new year of bribery department! | लाचलुचपत विभागाची नववर्षारंभीच ‘बोहनी’!

लाचलुचपत विभागाची नववर्षारंभीच ‘बोहनी’!

कऱ्हाड : सरत्या वर्षात विक्रमी संख्येने कारवाई करणाऱ्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने नव्या वर्षाच्या पहिल्या दिवशीच कारवाईची ‘बोहनी’ केली आहे. मुलांच्या नावाची नोंद करून ‘८ अ’चा उतारा देण्यासाठी तीन हजारांची लाच मागितल्याप्रकरणी कोयना वसाहत ग्रामपंचायतीच्या ग्रामसेवकावर कऱ्हाड शहर पोलिसांत गुन्हा नोंद करण्यात आला. सातारच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने आज, गुरूवारी ही कारवाई केली.
बाळासाहेब निवृत्ती जाधव असे त्या ग्रामसेवकाचे नाव आहे. अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, कोयना वसाहत येथील मिळकतदाराला त्या घरास मुलांची नावे लावायची होती. तसेच त्याचा ‘८ अ’चा उतारा त्यांना हवा होता. ग्रामसेवक बाळासाहेब जाधव याने मुलांची नावे नोंद करून उतारा देण्यासाठी पाच हजार रूपयांची मागणी केली. संबंधित ग्रामस्थाने २० डिसेंबर रोजी सातारच्या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार केली. तक्रारीनुसार ‘लाचलुचपत’च्या अधिकाऱ्यांनी तक्रारीची पडताळणी केली. त्यावेळी ग्रामसेवक बाळासाहेब जाधवने उतारा देण्यासाठी संबंधित ग्रामस्थाकडे तडजोडीअंती ३ हजार रूपये मागितले. त्यानंतर ‘लाचलुचपत’ने सापळा रचला. मात्र, बाळासाहेब याने लाचेची रक्कम स्वीकारली नाही. दरम्यान, ‘लाचलुचपत’च्या अधिकाऱ्यांनी केलेली पडताळणी व कारवाईमध्ये जाधवने लाच मागितल्याचे निष्पन्न झाल्यामुळे गुरूवारी त्याच्यावर गुन्हा नोंद करण्यात आला.

Web Title: Bachani is the new year of bribery department!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.