बेबीतार्इंचं ‘जीणं आमुचं’ अमेरिकेच्या विद्यापीठात
By Admin | Updated: April 18, 2015 00:07 IST2015-04-17T23:07:27+5:302015-04-18T00:07:05+5:30
साहित्यिका : अनुवादित पुस्तक अभ्यासक्रमात

बेबीतार्इंचं ‘जीणं आमुचं’ अमेरिकेच्या विद्यापीठात
फलटण : फलटण येथील ज्येष्ठ दलित साहित्यिका दिवंगत बेबीताई कांबळे यांच्या ‘जीणं आमुचं’ या आत्मचरित्रपर मराठी पुस्तकाचे ‘दि प्रिझन्स वुई ब्रोक’ (आम्ही तोडलेले तुरुंग) नावाने इंग्रजी भाषेत अनुवादित झालेल्या पुस्तकाचा अमेरिकेच्या विद्यापीठ अभ्यासक्रमात समावेश झालेला आहे. बेबीतार्इंच्या दलित साहित्याचा गौरव आंतरराष्ट्रीय पातळीवरून होऊ लागला आहे. फलटणच्या अल्पशिक्षित, दलित महिलेचे आत्मचरित्र आता अमेरिका विद्यापीठात शिकवले जाणार असल्याने त्यांच्या साहित्याचा जागतिक पातळीवर गौरव होत असल्याचे मानले जात आहे.
जगातील अनेक विद्यापीठांनी दलित साहित्य अभ्यासक्रमात आणण्याचा प्रयत्न केला आहे. वॉशिंग्टन, टेक्सास, आॅटेगॉन या विद्यापीठांनी दलित आत्मचरित्र अभ्यासक्रमात आणले आहेत. सध्या न्यूयॉर्कने इस्थेटिक्स (सौंदर्यशास्त्र), पॉलिटिक्स (राज्यशास्त्र) कोर्स सुरू केला आहे. या कोर्समध्ये इंग्रजीत अनुवादित झालेली जुथान (ओमप्रकाश वाल्मिकी), अन्टचेबल्स (डॉ. नरेंद्र जाधव), दि प्रिझन्स वुई ब्रोक (बेबीताई कांबळे) आदी इंग्रजी अनुवादित आत्मचरित्रपर पुस्तके सर्वात लोकप्रिय झाली आहेत. कांबळे यांच्या पुस्तकांवर दोघांनी डॉक्टरेट केली आहे. (प्रतिनिधी)
विचार दूरवर...
सातवी शिक्षण झालेल्या महिलेने दुकानातील वर्तमानपत्रांची रद्दी वाचून लिखित पुस्तकांना आकार दिला. हीच पुस्तके (आत्मचरित्र) साता समुद्रापलीकडे आज गेली आहेत. अल्पशिक्षित महिलाचे सामाजिक विचार आंतरराष्ट्रीय पातळीवर गेल्याने त्यांच्या साहित्य व विचारांचा गौरव हीच खरी बेबीतार्इंना श्रद्धांजली ठरत असल्याचे साहित्यक्षेत्रात मानले जात आहे.