‘बाबा-दादां’च्या पायाला भिंगरी!
By Admin | Updated: August 27, 2015 23:00 IST2015-08-27T23:00:39+5:302015-08-27T23:00:39+5:30
कऱ्हाड बाजार समिती निवडणूक : अतुल भोसले, उदय पाटील उतरलेत प्रचारात

‘बाबा-दादां’च्या पायाला भिंगरी!
प्रमोद सुकरे - कऱ्हाड
शेती उत्पन्न बाजार समितीची सत्ता आघाडीच्याच ताब्यात ठेवण्यासाठी अध्यक्ष आमदार बाळासाहेब पाटील यांच्यासह सर्वच नेते कामाला लागले आहेत. मात्र, सत्ता काढून घेण्यासाठी महाआघाडीतून बाहेर पडलेले डॉ. अतुल भोसले व उंडाळकरांचे वारसदार अॅड. उदय पाटील यांनी पायाला जणू भिंगरीच लावली आहे. त्यांची सध्या तालुक्याच्या राजकारणात उलट-सुलट चर्चा आहे.
विधानसभा निवडणुकीची चव दोनदा चाखूनही ‘उत्तर’ न सापडलेल्या डॉ. अतुल भोसलेंनी दक्षिणेतील पराभवानंतर शत्रूचा शत्रू तो आपला मित्र म्हणत दक्षिणेत राजकीय ‘उदय’ करू पाहणाऱ्या उंडाळकर दादांशी नवे मैत्रिपर्व सुरू केले. त्यासाठी हे ‘बाबा’ स्वत: जयवंत शुगरची साखर घेऊन दूध संघावर गेले तेथे दादांनी बाबांनाही कोयनेचे पेढे भरविले अन् कऱ्हाडच्या राजकारणाचे जणू संदर्भच बदलले.
या नव्या मैत्रिपर्वाने पहिल्यांदा जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीतील माजी आमदार विलासराव पाटील-उंडाळकरांचा विजय अगदीच सुकर केला. त्यानंतर ‘कृष्णा’ साखर कारखान्याची निवडणूक झाली. उंडाळकरांच्या मदतीने भोसलेंच्या हातात तब्बल दहा वर्षांनंतर कृष्णेची सत्ता ताब्यात आली. त्यामुळे दोन्ही गटांच्या कार्यकर्त्यांचा उत्साह दुणावला आहे. आता या दोन्ही गटांनी बाजार समितीच्या निवडणुकीला टार्गेट केलंय.
गत निवडणुकीत बाजार समितीत ऐतिहासिक सत्तांतर झाले. उंडाळकरांकडे असणारी संस्था महाआघाडीने काढून घेतली. त्याचे नेतृत्व जरी आमदार बाळासाहेब पाटील यांच्याकडे असले तरी आनंदराव पाटील, मदनराव मोहिते, राजेश पाटील या साऱ्यांच्या बरोबरीने दिवंगत महाराष्ट्र केसरी संजय पाटील अन् डॉ. अतुल भोसले यांचेही श्रेय नाकारता येणार नाही; पण संजय पाटील आज हयात नाहीत अन् डॉ. अतुल भोसले महाआघाडीसोबत नाहीत. डॉ. भोसलेंनी उंडाळकरांना मदतीचा हात दिल्याने उंडाळकर गटाच्या अपेक्षा वाढल्या आहेत.
महाआघाडीच्या विरोधात उंडाळकर-भोसलेंचे पॅनेल रिंगणात आहे. विलासराव काका अन् सुरेश बाबा या निवडणुकीवर बारीक लक्ष ठेवून असले तरी त्यांचे राजकीय वारसदार अॅड. उदय पाटील व डॉ. अतुल भोसले यांनीच प्रचारात आघाडी घेतली आहे. हे दोन्ही युवा नेते पायात भिंगरी लावल्याप्रमाणे गावोगावी संपर्क दौरा करीत असून, दिवसभर मतदार अन् कार्यकर्त्यांना भेटण्यावर भर देत आहेत. या निवडणुकीत युवा नेत्यांच्या
प्रयत्नांचा कस लागत आहे.
त्याचे फलित निकालानंतरच समोर येईल.
जगदीशदादा
महाआघाडीत !
विधानसभेला डॉ. अतुल भोसले यांच्याबरोबर तर कृष्णेच्या निवडणुकीत भोसले-उंडाळकर मैत्रिपर्वाबरोबर असणारे वडगावचे नेते व कृष्णा कारखान्याचे विद्यमान संचालक जगदीश जगताप यांनी बुधवारी वडगावमध्ये झालेल्या आमदार बाळासाहेब पाटलांच्या प्रचार सभेला हजेरी लावली. प्रत्येक निवडणुकीची संदर्भ वेगळे असतात, असे सांगत महाआघाडीसोबत असल्याचे त्यांनी जाहीर केले. त्यामुळे त्यांचे मार्गदर्शक असणारे दुसरे
‘दादा’ आता काय करणार? अशी चर्चा आहे.
सह्याद्रीत ‘बाबां’चा सावध पवित्रा !
काही महिन्यांपूर्वीच झालेल्या सह्याद्री सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत उंडाळकर दादांनी उत्तरेतील दोन दादांना रसद पुरवित कार्यकर्त्यांचे ‘मनोधैर्य’ वाढविण्याचा प्रयत्न केला; पण डॉक्टर बाबांनी पुन्हा कोणती चूक नको, या भूमिकेतून सावध पवित्रा घेतला होता. आपले काही नगरसेवक बाळासाहेबांबरोबर स्टेजवर पाठवून दिले होते.
ही मशागत कशासाठी !
बाजार समिती निवडणुकीच्या निमित्ताने दोन्ही युवा नेते मतदार जरी मर्यादीत असले तरी गावोगावी जाऊन कार्यकर्त्यांना भेटत आहेत. कार्यकर्त्यांना भेटण्यासाठी त्यांना वेळ अपुरा पडत असल्यासारखी स्थिती आहे. ‘बाबा’ अन् ‘दादां’ची ही मशागत विधानसभेसाठी तर नाही ना ? अशीही चर्चा सुरू आहे.