सौंदर्य खुलविण्यासाठी आयुर्वेद हाच उत्तम पर्याय : पाटील
By Admin | Updated: November 5, 2015 23:54 IST2015-11-05T22:45:51+5:302015-11-05T23:54:24+5:30
सौंदर्य खुलविण्यासाठी आयुर्वेद हाच उत्तम पर्याय : पाटील

सौंदर्य खुलविण्यासाठी आयुर्वेद हाच उत्तम पर्याय : पाटील
कऱ्हाड : ‘सौंदर्य खुलविण्यासाठी बाहेरील घटकांबरोबरच आतूनच पोषक घटक देणे गरजेचे असते. या पोषक घटकांमुळे सौंदर्य फक्त खुलतच नाही तर ते भावतेही,’ असा मंत्र नाईस लेडीज ब्युटीपार्लरच्या संचालिका सुनीता पाटील यांनी उपस्थित सखींना दिला. ‘लोकमत सखी मंच’च्या वतीने दीपावलीचे औचित्य साधून सखी महोत्सव कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या महोत्सवाअंतर्गत दिवाळी फराळ, मेहंदी स्पर्धा व ब्युटी वर्कशॉप, असा तिहेरी संगम साधण्यात आला होता. ‘लोकमत’चे संस्थापक, संपादक ज्येष्ठ स्वातंत्र्यसेनानी दिवंगत जवाहरलालजी दर्डा यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून ब्युटी वर्कशॉप कार्यक्रमाचे उद्घाटन करण्यात आले. प्रारंभी सुनीता पाटील, अलका मोहिरे, कविता पवार, मानसी राजे व रूपाली गरूड यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. पुष्परचना स्पर्धेतील विजेत्यांना मान्यवरांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले.
यावेळी सुनीता पाटील यांनी आयुर्वेदिक फेशियलमुळे होणारे फायदे उपस्थित सखींना सांगितले. भारतीय इतिहासात आयुर्वेदाला अनन्यसाधारण असे महत्त्व आहे. आयुर्वेदातील फायदे हे दीर्घकाळ टिकणारे असतात.त्यामुळे महिलांनी आपल्या शरीराची काळजी घेण्यासाठी आयुर्वेदाला पहिली पसंती द्यावी. फक्त आर्थिक फायदा म्हणून ब्युटी तज्ज्ञांनी काम न करता स्त्रियांच्या त्वचेची काळजी घेऊन त्यांना योग्य मार्गदर्शन करावे,’ असा मोलाचा सल्लाही त्यांनी यावेळी दिला. तसेच सखींनी विचारलेल्या सर्व शंकांचे निरसन केले. (प्रतिनिधी)
ड्रायफ्रुट लाडू प्रथम
कार्यक्रमाच्या पहिल्या सत्रात दिवाळी फराळ स्पर्धा झाली. या स्पर्धेचे परीक्षण महिला महाविद्यालयाच्या प्रा. इला जोगी यांनी केले. स्पर्धेत प्रथम क्रमांक अरुणा खाबडे (ड्रायफ्रूट लाडू),द्वितीय क्रमांक अश्विनी शेळके (बेसन लाडू) व तृतीय क्रमांक अंजली रामदासी (पोह्याचे लाडू) यांनी मिळविला. उत्तेजनार्थमध्ये प्रथम क्रमांक निर्मला जांभळे (तांदळाचे लाडू) व द्वितीय क्रमांक योगिनी कुलकर्णी (बेसन लाडू) यांनी मिळविला.
राजश्री शिंदे प्रथम--दुसऱ्या सत्रातील मेहंदी स्पर्धेचे परीक्षण अलका मोहिरे यांनी केले. या स्पर्धेत प्रथम क्रमांक राजश्री शिंदे, व्दितीय क्रमांक शोभा पवार, तृतीय क्रमांक जयश्री भट्टड यांनी मिळविला. उत्तेजनार्थमध्ये प्रथम क्रमांक मुबीन तांबोळी व द्वितीय क्रमांक उर्वशी शहा यांनी मिळविला. स्पर्धकांना स्टार मेहंदीचे मालक मुदस्सर मोमीन यांनी मेहंदी कोन पुरविले.