अस्ताव्यस्त वाहने
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 3, 2021 04:33 IST2021-05-03T04:33:40+5:302021-05-03T04:33:40+5:30
सातारा : जिल्ह्यात लाॅकडाऊन जाहीर केला आहे. या स्थितीत काही जण खरेदीसाठी साताऱ्यातील बाजारपेठेत येतात. मात्र, बॅरेगेट लावून रस्ते ...

अस्ताव्यस्त वाहने
सातारा : जिल्ह्यात लाॅकडाऊन जाहीर केला आहे. या स्थितीत काही जण खरेदीसाठी साताऱ्यातील बाजारपेठेत येतात. मात्र, बॅरेगेट लावून रस्ते बंद केल्यामुळे अस्ताव्यस्त स्वरूपात वाहने उभी केली जातात. त्यामुळे इतर वाहने, तसेच अत्यावश्यक सेवेतील वाहनचालकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे.
साइडपट्टी खचल्याने अडचण
वरकुटे मलवडी : माण तालुक्यातील शिरताव ते वरकुटे मलवडी या रस्त्याची साईडपट्टी खचली आहे. त्यामुळे अपघाताची भीती निर्माण झाली आहे. सुमारे नऊ किलोमीटरच्या या अंतरात अनेक ठिकाणी रस्त्याची साइडपट्टी खचली आहे. त्यातच रस्ता अरुंद असल्याने समोरासमोर वाहन आल्यास खाली घ्यावे लागते. अशा वेळी वाहन घसरत आहे. अनेक वेळा दुचाकीस्वार पडण्याचीही घटना घडली आहे.
रस्त्यावर स्टंटबाजी
सातारा : लॉकडाऊननंतर सर्वच भागातील रस्त्यावर शुकशुकाट जाणवत आहे. त्यामुळे अनेक तरुण दुचाकीवरील दुचाकीवरील स्टंटबाजीचा सराव कऱण्यासाठी रात्री शहरालगतच्या भागात जात असतात. त्या ठिकाणी भरधाव वाहने चालविणे. चाक हवेत वर करणे आदी सराव करत असतात. संबंधितांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी केली जात आहे.
नागरिकांकडून अस्वच्छता
सातारा : सातारा शहरातील अनेक स्वच्छतागृहाशेजारी कचरा, घाण टाकण्यात येत आहे. त्यामुळे दुर्गंधी निर्माण होते. संबंधितांनी या ठिकाणची स्वच्छता वारंवार करावी, अशी मागणी होत आहे. या ठिकाणी परिसरातील काही नागरिक कचरा, घाण आणून टाकतात, तर भटकी कुत्री कचरा विखरून टाकत असतात. कधी-कधी हा कचरा रस्त्यावर येतो. त्यामुळे संबंधितांनी येथील स्वच्छता वारंवार करण्याची गरज आहे.
महामार्गाचे काम पूर्ण करा
सातारा : सातारा-पंढरपूर राष्ट्रीय महामार्गाचे काम मागील तीन वर्षांपासून सुरू आहे. हे काम लवकर पूर्ण करण्याची मागणी वाहनधारकांतून होऊ लागली आहे. सातारा-पंढरपूर या महामार्गाचे काम सुरू होऊन तीन वर्षे होत आली, पण अजूनही हे काम पूर्ण झालेले नाही. त्यामुळे वाहनधारकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे.
रस्ता खड्डेमय
सातारा : क्षेत्र माहुलीकडे जाणाऱ्या रस्त्यावर जागोजागी खड्डे पडले आहेत. त्यामुळे वाहन चालविणे अवघड झाले आहे. संबंधितांनी रस्त्याची दुरवस्था थांबवावी, अशी मागणी होत आहे. कृष्णानगर येथील कालव्यापासून कृष्णा नदीच्या पुढील काही अंतरापर्यंतच्या रस्त्यावर जागोजागी खड्डे पडलेले आहेत. रात्रीच्या वेळी तर वाहने या खड्ड्यात आदळत असतात. त्यामुळे अपघाताची भीती व्यक्त करण्यात येत आहे. संबंधितांनी डांबराने खड्डे बुजवावेत, अशी मागणी होत आहे.
००
वृक्षारोपणाची मागणी
सातारा : सातारा-पंढरपूर मार्ग जिल्ह्यातील कोरेगाव, पुसेगाव, निढळ, गोंदवले, म्हसवडवरून जातो. या मार्गाच्या बाजूला तीन वर्षांपूर्वी काही प्रमाणात झाडे होती, पण महामार्गाच्या कामाच्या वेळी अनेक झाडे पाडण्यात आली. त्यामुळे सध्या रस्त्याच्या बाजूला अपवादात्मकच झाडे दिसतात. पर्यावरण संतुलनासाठी या महामार्गाच्या बाजूला वृक्षारोपण करून संवर्धन करावे, अशी मागणी होत आहे.
खड्ड्यांमुळे वाहनांचे नुकसान
सातारा : सातारा-कास रस्त्यावर अनेक ठिकाणी खड्डे निर्माण झाले आहेत. यामुळे अपघाताची भीती व्यक्त होत आहे. सातारा शहराजवळील यवतेश्वर घाटातून कास मार्ग जातो. या मार्गावर घाटातही जागोजागी खड्डे पडलेले आहेत, तसेच साइडपट्टीही खचली आहे. तर कासकडे जातानाही अनेक ठिकाणी रस्ता उखडला आहे. चऱ्या पडल्या आहेत. त्यामुळे वाहनधारकांना कसरत करत जावे लागते. रात्रीच्या सुमारास तर नवीन वाहनधारकांना रस्ता व खड्ड्यांचा अंदाज येत नाही. त्यामुळे वाहने आदळतात. यामुळे वाहनांचे नुकसान होत आहे.
भटक्या कुत्र्यांचा उपद्रव
सातारा : सातारा शहरातील समर्थ मंदिर परिसरात भटक्या कुत्र्यांचा उपद्रव वाढला आहे. यामुळे नागरिकांत भीतीचे वातावरण आहे. समर्थ मंदिरापासून धस कॉलनीकडे जाणाऱ्या रस्त्याच्या बाजूला रात्रीच्या सुमारास भटकी कुत्री बसलेली असतात. अनेक वेळा ही कुत्री दुचाकीधारकांच्या अंगावर धावून जातात. यामुळे अपघाताची भीती व्यक्त होत आहे.