ट्रक चालक-मालकांमध्ये रस्ता सुरक्षेबाबत जागृती
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 8, 2021 04:34 IST2021-02-08T04:34:34+5:302021-02-08T04:34:34+5:30
कऱ्हाड : राष्ट्रीय रस्ता सुरक्षा अभियानांतर्गत रहेबर ए जरीया संस्थेकडून जनजागृतीचे काम सुरू आहे. गोटे, ता. कऱ्हाड येथे ट्रक ...

ट्रक चालक-मालकांमध्ये रस्ता सुरक्षेबाबत जागृती
कऱ्हाड : राष्ट्रीय रस्ता सुरक्षा अभियानांतर्गत रहेबर ए जरीया संस्थेकडून जनजागृतीचे काम सुरू आहे. गोटे, ता. कऱ्हाड येथे ट्रक चालक-मालक यांना संस्थेकडून रस्ता सुरक्षेबाबत माहिती देण्यात आली. यावेळी कऱ्हाडमधील ट्रान्सपोर्ट क्षेत्रात काम करणाऱ्या मालकांना संस्थेच्या वतीने सन्मानचिन्ह देण्यात आले. यावेळी मोटार वाहन अधिकारी संदीप देसाई, ऋषिकेश कोराणे, सहायक पोलीस निरीक्षक सरोजिनी पाटील, चालक-मालक संघटनेचे अध्यक्ष अल्ताफ सवार, नॅशनल ग्रुपचे इसाक मोमीन, रहेबर-ए-जरिया फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष वसीमअक्रम शेख उपस्थित होते.
उंडाळेच्या विद्या पाटील यांचा पुरस्काराने गौरव
कऱ्हाड : उंडाळे, ता. कऱ्हाड येथील विद्या पाटील यांना श्रीनिवास पाटील फाउंडेशनतर्फे प्रगतिशील महिला शेतकरी पुरस्काराने गौरविण्यात आले. कापिल येथे हा पुरस्कार वितरण सोहळा पार पडला. फाउंडेशनचे अध्यक्ष सारंग पाटील, उपाध्यक्ष रचना पाटील यांच्या हस्ते पुरस्कार वितरण झाले. पुरस्कारासाठी मानांकने ऑनलाईन पद्धतीने मागविण्यात आली होती. त्यामधून महिलांची निवड झाली. विद्या पाटील यांनी शेतीमध्ये यांत्रिकीकरणाचे नवनवीन प्रयोग राबविले आहेत. पाणी व्यवस्थापन, जैविक शेती याबरोबर बिजोत्पादनात त्यांचे उल्लेखनीय कार्य आहे. या कार्याची दखल घेऊन त्यांना या पुरस्काराने गौरविण्यात आले.
मल्हारपेठला पथनाट्य; कोरोनाची जनजागृती
मल्हारपेठ : येथील ग्रामपंचायत इमारतीसमोर कोरोनाबाबतच्या जागृतीचा कार्यक्रम पथनाट्याद्वारे पार पडला. जिल्हा माहिती कार्यालयाने कोरोना काळातील विविध उपाययोजनांबाबत जनजागृती केली आहे. पथनाट्य पाहण्यासाठी ग्रामस्थांची गर्दी झाली होती. कोरोना हटाव महाराष्ट्र बचाव, कोरोना हटाव भारत बचाव, माझे कुटुंब माझी जबाबदारी याबाबतही प्रबोधन करण्यात आले. मल्हारपेठसह तालुक्यातील पाटण, नवारस्ता, चाफळ, मारुल हवेली, कोयनानगर, ढेबेवाडी, तळमावले आदी मोठ्या बाजारपेठांमध्येही पथनाट्याद्वारे जनजागृती करण्यात येत आहे.
ढेबेवाडी येथे कोरोना प्रतिबंधक लसीकरण सुरू
ढेबेवाडी : येथील ग्रामीण रुग्णालयात कोरोना प्रतिबंधक लसीकरणास प्रारंभ करण्यात आला आहे. कोरोनाच्या काळात येथील ग्रामीण रुग्णालयात ३६ ऑक्सिजन बेडसह कोरोना केअर सेंटर सुरू करण्यात आले होते. अनेक रुग्णांवर तेथे यशस्वी उपचार करण्यात आले. कोरोनाचा फैलाव कमी झाल्याने आता केंद्र बंद करून तेथील नियमित रुग्णांवरील उपचार सुविधा पूर्ववत सुरू करण्यात आली आहे. सध्या रुग्णालयात कोरोना प्रतिबंधक लसीकरणास प्रारंभ करण्यात आला आहे. यावेळी वैद्यकीय अधीक्षक डॉ. डी. बी. डोंगरे, राजाराम जगताप, स्वप्निल सुतार यांची उपस्थिती होती
तारळेत सावता माळी रयत बाजारास सुरुवात
पाटण : तारळे, ता. पाटण ग्रामपंचायतीच्या मोकळ्या आवारात संत शिरोमणी सावता माळी रयत बाजार भरविण्यात आला होता. तालुका कृषी अधिकारी दत्तात्रय खरात यांच्या हस्ते या बाजाराचे उद्घाटन झाले. यावेळी ग्रामपंचायत सदस्य, कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती, माजी जिल्हा परिषद सदस्य, प्रशासक, गाव कामगार तलाठी, ग्रामविकास अधिकारी, मंडल कृषी अधिकारी उपस्थित होते. या बाजारामध्ये शेतकऱ्यांनी गटाच्या माध्यमातून उत्पादित केलेल्या शेतीमालाची आवक होत आहे. ग्राहकांना ताजी फळे व भाजीपाला वाजवी दरात उपलब्ध करून द्यावा. तसेच शेतकऱ्यांनी उत्पादक कंपनीची स्थापना करून स्वत:ची उन्नती साधावी, असे आवाहन यावेळी मान्यवरांनी केले.