सातारा जिल्हा पोलीस दलाला बेस्ट पोलिसिंगचा अवाॅर्ड
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 17, 2021 04:47 IST2021-09-17T04:47:04+5:302021-09-17T04:47:04+5:30
सातारा: पोलीस महासंचालकांकडून सातारा जिल्हा पोलीस दलाचा गौरव करण्यात आला असून बेस्ट युनिट इन कम्युनिटी पोलिसिंग सन्मानित करण्यात आले ...

सातारा जिल्हा पोलीस दलाला बेस्ट पोलिसिंगचा अवाॅर्ड
सातारा: पोलीस महासंचालकांकडून सातारा जिल्हा पोलीस दलाचा गौरव करण्यात आला असून बेस्ट युनिट इन कम्युनिटी पोलिसिंग सन्मानित करण्यात आले आहे. सातारा पोलीस दलाचा राज्यात यामुळे नाव लाैकिक झाला असून पोलीस अधीक्षक अजयकुमार बन्सल यांच्या मार्गदर्शनाखाली मिळालेल्या या पुरस्काराबद्दल सर्वत्र कौतुक होत आहे.
पोलीस व पोलीस ठाण्याची पायरी म्हटले की आजही भल्याभल्यांची भंबेरी उडते. पोलीस नीट बोलत नाहीत. पोलिसांशी बोलायला नकोच. एखादी महत्त्वाची माहिती असेल तर आपण स्वतः सांगून तर कशाला अडकायचे, असे गैरसमज आजही लहानांपासून वृद्धापर्यंत सर्वांचे आहेत. पोलिसाबाबतचा हा चुकीचा गैरसमज दूर करण्यासाठी सातारा पोलीस गेल्या अनेक वर्षांपासून प्रयत्न करत आहेत. समाजात पोलिसांबद्दल विश्वास निर्माण करणे आणि त्यांना पोलीस हा जवळचा मित्र वाटला पाहिजे. यालाच कम्युनिटी पोलिसिंग म्हणून ओळखले जाते. ही संकल्पना राबविताना व प्रत्यक्षात साकारताना सातारा पोलिसांनी अनेक उपक्रम राबवले. यातूनच पोलीस व सर्वसामान्य यांचे घट्ट नाते झाले. बेस्ट कम्युनिटी पोलिसिंग सोबतच सीसीटीएनएस यासह विविध तंत्रज्ञानाचा रास्त वापर व गुन्ह्यांचा छडा यामध्ये सातारा पोलीस दलाला यश आले असून त्याबद्दल राज्य शासनाने दखल घेऊन सातारा पोलिसांचा गौरव केला आहे.
जानेवारी २०२० ते डिसेंबर २०२० या कालावधीसाठी विविध स्तरावर पोलीस महासंचालकांकडून श्रेणी तयार करून त्याची ए.बी.सी अशी विभागणी केली गेली. या तीन स्तरातून सर्वोत्कृष्ट पोलीस घटक निवडले गेले. सातारा जिल्हा पोलीस दल आणि बीड जिल्हा पोलीस दलाला संयुक्तरीत्या ‘बेस्ट युनिट इन कम्युनिटी पोलिसिंग इनिशिएटिव्ह’ने सन्मानित करण्यात आले आहे. सातारा पोलिसांच्या वतीने अप्पर जिल्हा पोलीस अधीक्षक धीरज पाटील यांनी याबाबत सर्व प्रस्ताव तयार करून पोलीस महासंचालकांकडे पाठवला होता.
कोट : शासनाकडून सातारा पोलीस दलासाठी दिलेला हा पुरस्कार आम्हा सर्वांना प्रेरणादायी आहे. विविध स्तरावर हा पुरस्कार दिला जात असून सातारा पोलीस दलाच्या कम्युनिटी पोलिसिंग बेस्ट डिटेक्शन व उत्कृष्ट तंत्रज्ञानाच्या वापरासाठी हा गौरव करण्यात आला आहे.
अजयकुमार बन्सल, पोलीस अधीक्षक, सातारा