राष्ट्रवादी राज्य सरचिटणीसपदी अविनाश मोहिते

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 13, 2016 00:15 IST2016-05-12T22:18:57+5:302016-05-13T00:15:23+5:30

नियुक्तीपत्र प्रदान : कऱ्हाड-दक्षिणेत पक्षाची ताकद वाढविणार; शरद पवार

Avinash Mohite as National Secretary State Secretary | राष्ट्रवादी राज्य सरचिटणीसपदी अविनाश मोहिते

राष्ट्रवादी राज्य सरचिटणीसपदी अविनाश मोहिते

कऱ्हाड : राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्या उपस्थितीत प्रदेशाध्यक्ष आमदार सुनील तटकरे यांनी कृष्णा कारखान्याचे माजी अध्यक्ष अविनाश मोहिते यांची पक्षाच्या राज्य सरचिटणीसपदी नियुक्ती केली. यावेळी विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंढे, माजी मंत्री जयंत पाटील, माजी मंत्री शशिकांत शिंदे, आमदार बाळासाहेब पाटील, आमदार दिलीप वळसे-पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती.
पक्षाच्या प्रदेश कार्यालयात हा समारंभ आयोजित करण्यात आला होता. राज्य स्तरावरील पदाधिकाऱ्यांच्या निवडी व नियुक्तीच्या वेळी कधीही पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष सहसा उपस्थित राहत नाहीत. परंतु या कार्यक्रमाला स्वत: अध्यक्ष खासदार शरद पवार उपस्थित राहिले.
अध्यक्ष शरद पवार म्हणाले, ‘दोनच महिन्यांपूर्वी अविनाश मोहिते व त्यांच्या सहकाऱ्यांनी माझ्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये प्रवेश केला. त्यांचा प्रवेश झाल्यानंतर त्यांच्यासारख्या तरुण व सुसंवाद साधणाऱ्या कार्यकर्त्यांशी सातारा जिल्ह्यात व राज्यात पक्षाच्या वाढीसाठी व विस्तारासाठी त्यांच्यावर काही जबाबदारी द्यावी, असे पक्षाच्या प्रदेश स्तरावरील नेतृत्वाला वाटत होते. त्यानुसार ही नियुक्ती करण्यात येत आहे. गेल्या ६० ते ६५ वर्षांत कऱ्हाड दक्षिण या मतदारसंघातून केवळ तीनच व्यक्ती आमदार झाल्या. राज्यातील इतर मतदारसंघामध्ये ही संख्या जास्त आहे.
अविनाश मोहितेंना कऱ्हाड दक्षिण मतदारसंघात लक्ष द्यावे लागेल. त्याशिवाय पक्षाने त्यांना काम करण्यासाठी संधी आणि ताकद देण्याचे ठरविले आहे. त्यांना सातारा जिल्ह्यामध्ये पक्ष कार्यासाठी वेळ द्यावा लागेल. याशिवाय
राज्यात पक्षाने काही कामाची जबाबदारी दिल्यास तीही पार पाडावी लागेल.’
यावेळी अविनाश मोहिते म्हणाले, ‘शरद पवार यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून आणि पक्षाच्या राज्यातील नेतृत्वाबद्दल खात्री असल्याने आम्ही सहकारी या पक्षात कार्यरत झालो आहोत.
दिवसेंदिवस सामान्य माणसांचे प्रश्न अतिशय तीव्र होत असताना पक्षाने जी जबाबदारी दिली आहे. ती पार पाडण्यासाठी यथाशक्ती प्रयत्न केले जातील. पक्षाला यश मिळवून देताना कुठेही कमी पडणार नाही.’ जिल्हाध्यक्ष सुनील माने यांनी आभार मानले. (प्रतिनिधी)


खासदार शरद पवार यांच्या उपस्थितीत अविनाश मोहिते यांना आमदार सुनील तटकरे यांनी नियुक्ती पत्र दिले. आमदार जयंत पाटील, शशिकांत शिंदे, धनंजय मुंढे आदी उपस्थित होते.

Web Title: Avinash Mohite as National Secretary State Secretary

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.