सहायक सरकारी वकील जाळ्यात
By Admin | Updated: August 8, 2014 00:33 IST2014-08-08T00:27:59+5:302014-08-08T00:33:03+5:30
जामिनावर म्हणणे मांडण्यासाठी पाच हजारांची मागणी

सहायक सरकारी वकील जाळ्यात
वडूज : आरोपीच्या जामिनावर म्हणणे मांडण्यासाठी पाच हजारांची मागणी
वडूज : वडूज येथील आरोपीच्या जामिनावर म्हणणे मांडण्यासाठी येथील अतिरिक्तजिल्हा व सत्र न्यायालयातील सहायक सरकारी वकील चंद्रशेखर कुलकर्णी यांना त्यांच्याच कार्यालयात पाच हजार रुपये लाच स्वीकारताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहात पकडले.
याबाबत सविस्तर माहिती अशी की, तक्रारदार युवराज लोखंडे (रा. म्हसवड, ता. माण) यांच्या जामीन अर्जावर म्हणणे मांडण्यासाठी सहायक सरकारी वकील चंद्रशेखर प्रभाकर कुलकर्णी यांनी पाच हजारांची मागणी केली होती. याबाबत लोखंडे यांचे मित्र व ‘मनसे’चे खटाव तालुकाप्रमुख दिगंबर शिंगाडे यांनी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे तक्रार दिली होती. तक्रारीनुसार आज, गुरुवारी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी पडताळणी केली असता वडूज येथील अतिरिक्त व सत्र न्यायालयातील सहायक सरकारी वकील चंद्रशेखर कुलकर्णी (वय ४२, रा. चैतन्यकुंज, दहिवडी, ता. माण) यांना पाच हजार रुपये लाच स्वीकारताना त्यांच्या कार्यालयात रंगेहात पकडले. त्याप्रमाणे लाच प्रतिबंधक कायद्यानुसार त्यांच्यावर वडूज पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची कारवाई रात्री उशिरापर्यंत सुरू होती.
दरम्यान, कुलकर्णी यांच्या दहिवडी येथील ‘चैतन्यकुंज’ या घराची तपासणी करण्यासाठी पोलीस रवाना झाले आहेत. (प्रतिनिधी)