पाण्यावरून ‘प्राधिकरण’चे अधिकारी धारेवर

By Admin | Updated: July 30, 2014 23:18 IST2014-07-30T23:10:53+5:302014-07-30T23:18:10+5:30

सातारा : कार्यालयाच्या आवारात आंदोलनाचा नगरसेवकांचा इशारा

Authorities official said on the water | पाण्यावरून ‘प्राधिकरण’चे अधिकारी धारेवर

पाण्यावरून ‘प्राधिकरण’चे अधिकारी धारेवर

सातारा : सातारा शहरातील विविध भागांत अनेकदा पाणीपुरवठा विस्कळीत होत आहे. याला प्राधिकरण आणि वीजवितरण कंपनीचा भोंगळ कारभार जबाबदार आहे. मात्र, याबाबत नागरिक नगरसेवकांना जाब विचारतात. तुमच्या चुकांसाठी आम्ही का शिव्या खायच्या?, अशा कानपिचक्या नगरसेवकांनी महाराष्ट्र जीवन प्राधिकरण आणि वीजवितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांना दिल्या.
दरम्यान, शहरातील पाणीपुरवठा सुरळीत न ठेवल्यास प्राधिकरण कार्यालयासमोर आंदोलन करू, असा इशारा नगरसेवकांनी दिला. दरम्यान, शहरातील पाणी पुरवठ्याच्या समस्या सोडविण्यासाठी प्राधिकरणाच्या सर्व संबंधित अधिकारी व कर्मचाऱ्यांसोबत गुरुवारी (उद्या) दुपारी ४ वाजता नगराध्यक्षांच्या दालनात बैठक होणार असून, या बैठकीला सर्व नगरसेवक उपस्थित राहणार आहेत.
सातारा शहरातील करंजे, सदर बझार, कामाठीपुरा यासह इतर भागांत पाणीपुरवठा सातत्याने विस्कळीत होत आहे. याबाबत विचारणा केली असता प्राधिकरण व वीजवितरण कंपनी टोलवाटोलवी करत होते. नेमकी काय समस्या आहे आणि ही समस्या तातडीने सुटावी, यासाठी सातारा पालिकेत नगराध्यक्ष सचिन सारस यांच्या अध्यक्षतेखाली पाणीप्रश्नासंबंधी महत्त्वाची बैठक झाली. या बैठकीस उपनगराध्यक्षा दिनाज शेख, पाणीपुरवठा सभापती लीना गोरे, नगरसेवक अविनाश कदम, जयेंद्र चव्हाण, अमोल मोहिते, भालचंद्र निकम, महेश जगताप, विजय बडेकर, प्रवीण पाटील, वैशाली राऊत, भाग्यवंत कुंभार, संदीप साखरे यांच्यासह पाणी पुरवठा विभागाचे अभियंता पंढरीनाथ साठे, जीवन प्राधिकरणाचे कार्यकारी अभियंता बी. एस. अहिरे, वीजवितरण कंपनीचे सातारा शाखा अभियंता बारटक्के व दोघांचे सहकारी उपस्थित होते.
शहरातील पाणीप्रश्न गंभीर झाला असून, ऐन पावसाळ्यात नागरिकांना पाण्यासाठी वणवण करावी लागत आहे. अनेकदा लोक रस्त्यावर उतरतात, आंदोलने करतात आणि आम्हाला जाब विचारतात.
प्राधिकरणाच्या भोंगळ कारभारामुळे नागरिकांना पाण्यासाठी टाहो फोडावा लागत आहे. प्राधिकरणाच्या अधिकाऱ्यांना विचारणा केली असता, लाईट नसल्याचे कारण ते पुढे करतात. वीजवितरण कंपनी आणि प्राधिकरणाच्या भोंगळ कारभारामुळे नागरिकांच्या रोषाला आम्हाला सामोरे जावे लागत आहे.
यावेळी नगरसेवक अविनाश कदम, जयेंद्र चव्हाण, अमोल मोहिते, महेश जगताप, प्रवीण पाटील यांच्यासह सर्वच नगरसेवकांनी प्राधिकरण आणि वीजवितरण कंपनीच्या अधिकाऱ्यांना चांगलेच धारेवर धरले. (प्रतिनिधी)

Web Title: Authorities official said on the water

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.