औंधची दीपमाळ यंदा पेटली; मात्र भाविकांच्या अनुपस्थितीत!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 09:08 IST2021-02-05T09:08:38+5:302021-02-05T09:08:38+5:30
औंध : लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या औंधच्या श्री यमाईदेवीचा छबिना व दीपप्रज्वलन सोहळा गुरुवारी सायंकाळी श्री यमाईदेवी देवस्थानच्या मुख्य ...

औंधची दीपमाळ यंदा पेटली; मात्र भाविकांच्या अनुपस्थितीत!
औंध : लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या औंधच्या श्री यमाईदेवीचा छबिना व दीपप्रज्वलन सोहळा गुरुवारी सायंकाळी श्री यमाईदेवी देवस्थानच्या मुख्य विश्वस्त गायत्रीदेवी पंतप्रतिनिधी यांच्या व मोजक्याच लोकांच्या उपस्थितीत झाला आहे. महाराष्ट्र राज्यातील सर्वांत उंच पुरातन औंध येथील काळ्या पाषाणातील ऐतिहासिक दीपमाळ यंदा भाविकांच्या अनुपस्थितीत पहिल्यांदाच प्रज्वलित झाली.
मागील अनेक दशकांपासून औंधची दीपमाळ प्रतिवर्षी पौष शाकंभरी पौर्णिमेला प्रज्वलित केली जाते. या दीपमाळेची रचना अतिशय देखणी व कल्पकतेने करण्यात आली आहे. पाच स्तरांमध्ये उभी असलेली ही दीपमाळ मोठ्या दिमाखात उभी आहे. गुरुवारी सायंकाळी गायत्रीदेवी पंतप्रतिनिधी यांच्या हस्ते श्रीयमाईदेवीचे पूजन करून आरती, मंत्र पठणानंतर हा दीपप्रज्वलन सोहळा झाला. त्यानंतर श्रीयमाईदेवीची औंध गावातून पालखी मिरवणूक पोलीस बंदोबस्तात मोजक्या मानकऱ्यांच्या उपस्थितीत काढण्यात आली.
औंधचे राजघराणे, ग्रामस्थ, भाविकांचे अतूट नाते या दीपमाळेशी असल्याने तसेच प्रतिवर्षी शाकंभरी पौर्णिमेला या दीपमाळेचे नेत्रदीपक दीपप्रज्वलन पाहण्यासाठी महाराष्ट्र, कर्नाटक तसेच देशाच्या विविध भागांतून भाविक हजारोंच्या संख्येने येत असतात. मात्र, यंदा कोरोनामुळे मोजक्याच लोकांच्या उपस्थितीत हा धार्मिक सोहळा झाला.
२८औंध दीपमाळ
फोटो : औंध येथील ऐतिहासिक दीपमाळ मोजक्याच लोकांच्या उपस्थितीत प्रज्वलित करण्यात आली. (छाया-रशिद शेख)