कोरोना रुग्णाच्या बेहिशोबी बिलाचे ऑडिट करा : बाबर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 4, 2021 04:29 IST2021-06-04T04:29:56+5:302021-06-04T04:29:56+5:30
दहिवडी : कोरोना महामारीमध्ये उपचारासाठी रुग्णालयात दाखल केलेल्या रुग्णांची अक्षरश: लूट केली जात आहे. त्यामुळे आकारलेल्या बेहिशोबी बिलाचे ...

कोरोना रुग्णाच्या बेहिशोबी बिलाचे ऑडिट करा : बाबर
दहिवडी : कोरोना महामारीमध्ये उपचारासाठी रुग्णालयात दाखल केलेल्या रुग्णांची अक्षरश: लूट केली जात आहे. त्यामुळे आकारलेल्या बेहिशोबी बिलाचे आॅडिट करावे,’ अशी मागणी राष्ट्रीय काँग्रेसचे जिल्हा सरचिटणीस प्रा. विश्वंभर बाबर यांनी केली आहे.
याबाबत जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन देण्यात आले आहे. या निवेदनात प्रा. बाबर यांनी म्हटले आहे की, ‘कोरोना साथीमध्ये जिल्ह्यातील अनेक खासगी रुग्णालयांत उपचाराच्या नावाखाली रुग्णांची अक्षरश: लूट केली जात आहे. अनेक ठिकाणी पाच ते दहा लाख रुपयांपर्यंत बिल आकारणी होऊनही रुग्ण दगावलेत. दगावलेल्या रुग्णांच्या कुटुंबीयांबाबत थोडीसुद्धा माणुसकी दाखवली जात नाही. याबाबतच्या अनेक घटना जिल्ह्यात घडलेल्या आहेत.
महात्मा ज्योतिबा फुले जनआरोग्य योजनेत सहभागी असणाऱ्या काही रुग्णालयांची अवस्था अत्यंत दयनीय आहे. मात्र, काही रुग्णालये जनसेवेच्या दृष्टीने उत्तम चालली आहेत. काही रुग्णालयांत रुग्ण केवळ नावाला दाखवून त्यांच्या अज्ञानाचा गैरफायदा घेतला जात आहे. अशा रुग्णालयात रुग्णांकडून रोख बिल आकारणी करणे व पुन्हा सदर बिल मिळविण्यासाठी योजनेत बसविणे हा प्रकार सुरू आहे. यावर उपाय म्हणून मोफत रुग्णसेवा असा फलक रुग्णालयाच्या दर्शनी भागात लावणे बंधनकारक करावे.
सध्यस्थितीत गरीब रुग्णांना दिलासा देण्याची वेळ आहे. त्यामुळे सामान्य जनतेला न्याय देण्यासाठी वादातीत असणाऱ्या रुग्णालयाचे जिल्हास्तरावरून तज्ज्ञांमार्फत आॅडिट करावे. तसेच अडचणीत सापडलेल्या जनतेला न्याय द्यावा, अशी मागणीही प्रा. विश्वंभर बाबर यांनी केली आहे.
..............................................................................