दीडशे झाडांचा लिलाव तडकाफडकी रद्द
By Admin | Updated: May 7, 2015 00:19 IST2015-05-06T23:34:08+5:302015-05-07T00:19:06+5:30
वनराई बचावली : शामगावला तलावाचा परिसर राहणार हिरवागार--लोकमतचा दणका

दीडशे झाडांचा लिलाव तडकाफडकी रद्द
कऱ्हाड/शामगाव : शामगाव, ता. कऱ्हाड येथील पाझर तलावाच्या बांधाचे मजबुतीकरण करण्याच्या नावाखाली सुमारे दीडशे झाडांची कत्तल केली जाणार होती. त्याचा लिलावही ग्रामपंचायतीने जाहीर केला होता. मात्र, ‘लोकमत’ने पर्यावरणाला हानी पोहोचविणाऱ्या या धक्कादायक प्रकाराला वाचा फोडल्यानंतर प्रशासन खडबडून जागे झाले. बुधवारी होणारा हा झाडांचा लिलाव अखेर तडकाफडकी रद्द करण्यात आला.शामगाव येथे १९७२ च्या दुष्काळी कालावधीत रोजगार हमी योजनेतून तीन बंधारे बांधण्यात आले आहेत. या तिन्ही बंधाऱ्यांच्या बांधावर सध्या गर्द वनराई निर्माण झाली आहे. मात्र, पाझर तलाव क्र. ३ च्या मजबुतीकरणाचे कारण समोर करून ग्रामपंचायतीने बांधावरील सुमारे दीडशे झाडे तोडण्याचा घाट घातला होता.
त्याबाबत वनविभागाशी ग्रामपंचायतीने पत्रव्यवहार केल्याचेही सांगितले जाते. वनविभागाने त्या झाडांचे मूल्यांकनही केले होते. त्यामुळे लिलाव प्रक्रियेत या झाडांची कत्तल होणार, हे जवळपास निश्चित झाले होते.
पुणे येथील निसर्ग जागर या संस्थेला याबाबतची माहिती मिळाल्यानंतर संबंधित संस्थेच्या पदाधिकाऱ्यांनीही याठिकाणी भेट देऊन वृक्षतोडीस विरोध केला होता.
दरम्यान, शामगाव ग्रामपंचायतीचा हा अजब कारभार ‘लोकमत’ने चव्हाट्यावर आणला. सोमवारी, दि. ४ ‘लोकमत’ने ‘पाण्यासाठी बांधावरील वृक्षांवर कुऱ्हाड’ या मथळ्याखाली सचित्र वृत्त प्रसिद्ध केले. त्यानंतर प्रशासनालाही खडबडून जाग आली. अखेर बुधवारी होणारा हा झाडांचा लिलाव रद्द करण्यात आला. त्यामुळे पाझर तलावावरील वनराई बचावली असून, पर्यावरणप्रेमींमध्ये समाधानाचे वातावरण निर्माण झाले आहे. (प्रतिनिधी)
म्हणे.. ‘रिस्क’ कुणी घ्यायची?
प्रक्रियेत कोणीही सहभागी न झाल्याने लिलाव रद्द केल्याचे शामगावचे उपसरपंच धोंडिराम पोळ यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले. मात्र, सोमवारी ‘लोकमत’मध्ये वृत्त प्रसिद्ध झाल्यानंतर शामगावला ग्रामपंचायत सदस्यांची तातडीची बैठक झाल्याचे समजते. लिलाव करून ‘रिस्क’ कुणी घ्यायची ? असा प्रश्न त्यावेळी सदस्यांनी उपस्थित केला होता. त्यामुळे या भीतीनेच हा लिलाव रद्द करण्यात आल्याचे समजते.