अबब.. उन्हाळ्यातला पाऊस 1148 मिमी

By Admin | Updated: May 14, 2015 23:56 IST2015-05-14T22:45:32+5:302015-05-14T23:56:31+5:30

जिल्ह्याचा ऋतू बदलला : नोव्हेंबर ते मे दरम्यान अवकाळी पावसाने नोंदवला विक्रम--- लोकमत विशेष

Aub .. Rainfall in the rain is 1148 mm | अबब.. उन्हाळ्यातला पाऊस 1148 मिमी

अबब.. उन्हाळ्यातला पाऊस 1148 मिमी

जगदीश कोष्टी - सातारा -सातारा शहरासह महाबळेश्वर, कोरेगाव, फलटण, वाई, खंडाळा, पाटण तालुक्यात सर्वदूर ढगांचा गडगडाट, विजांच्या कडकडाटात बुधवारी मुसळधार पाऊस पडला होता. त्यामुळे मे महिना आहे की जून असा प्रश्न सर्वांनाच पडला. १ नोव्हेंबर ते १३ मे या कालावधीत जिल्ह्यात १, १४८.४ मिलीमिटर पावसाची नोंद झाली आहे. याची सरासरी १०४.४ मिलीमिटर होते. ही बाब सातारकरांसाठी शुभ वर्तमानच आहे.
सातारा जिल्ह्याला निसर्गानं भरभरुन दिलं आहे. याच जिल्ह्यात सह्याद्रीच्या उंचच उंच घाटमाथा तर दुसरीकडे माण-खटावसारखा सपाट भूभाग लाभला आहे. महाबळेश्वर, पाचगणी, नवजा, तापोळा येथे सतत पाऊस पडत असतो. नवजा येथे चोवीस तासांत सरासरी चारशे ते पाचशे मिलीमिटर पावसाची नोंद होते. त्यामुळेच नवजाला महाराष्ट्राची चेरापुंजी म्हटले जाते. तर माण-खटाव तालुक्यात खूपच कमी प्रमाणात पाऊस पडतो.
जिल्ह्यात जून ते सप्टेंबर हे महिने पावसाळी म्हणून ओळखले जातात. या काळात सरासरी १० हजार मिलीमीटर पाऊस असतो. इतर वेळेला या पावसाचा काही भरवसा नसतो. पडला तर पडला नाही तर नाही, अशी अवस्था असते. मात्र, यावेळी वरुणराजा भलताच प्रसन्न झाला आहे. मे महिन्यात बुधवार, दि. १३ रोजी फलटण तालुक्यात चक्क ओढ्यांना पाणी आले होते.
यंदा १ नोव्हेंबरपासून आजअखेर साडेसहा महिन्यांत तब्बल १,१४८ मिलिमीटर पाऊस झाला आहे. प्रत्येक महिन्यात सरासरी १९१.३३ मिलिमीटर पाऊस झाल्याने उन्हाळा की पावसाळा हेच समजेना झाले आहे. गेल्या वर्षी जून ते आॅक्टोबर या कालावधीतही सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडला होता. २०१३ मध्ये जिल्ह्यात १२,४२३ मिलीमिटर पाऊस झाला होता. तर २०१४ मध्ये १३,३७७ मिलीमिटर पावसाची नोंद झाली होती.
जिल्ह्यातील पर्जन्यमान चांगले असणे दुष्काळी भागासाठी हिताचेच आहे. तीन वर्षांपूर्वी माण-खटावमधील शेकडो कुटुंबीयांना पाण्याअभावी स्थलांंतर करावे लागले होते. तसेच बाराही महिने चारा छावण्या सुरू होत्या. परंतु, गेल्या दोन वर्षांत चांगला पाऊस झाल्याने ही वेळ आली नाही. केवळ माण, खटाव व वाई तालुक्यात टँकर सुरू होते.
पाऊस पडल्यानंतर दुष्काळी भागातील जनता सुखावते. मात्र, मार्च, एप्रिलमध्ये पडलेल्या पावसाने जेरीस आणले होते. गारपिटीमुळे शेतकरी मेटाकुटीला आला होता. शेतात गारांचे खच साठले होते. त्यातून सावरतो न सावरतो तोच एप्रिलमध्ये पाऊस झाला.


बुधवारी राज्यातील चौथ्या क्रमांकाचा पाऊस साताऱ्यात
सातारा शहरासह जिल्ह्याच्या विविध भागात बुधवार, दि. १३ रोजी मुसळधार पाऊस झाला होता. गुरुवारी सकाळी आठ वाजता पडलेला तालुकानिहाय पाऊस मिलीमिटरमध्ये असा : सातारा ३१.५, कोरेगाव २३.८, खंडाळा १४.४८, वाई १३.७, महाबळेश्वर ७.०३. बुधवारी पडलेल्या एकूण पावसाचा सातारचा राज्यात चौथा क्रमांक लागतो. पुण्याचा पहिला क्रमांक आहे.


१ नोव्हेंबर ते १३ मे कालावधीत पाऊस (मिमी)
तालुकापाऊस
सातारा७९.७
जावळी११५.२
कोरेगाव५६.७
कऱ्हाड१११.४
पाटण११३.४
वाई१२२.८
महाबळेश्वर१९१.४
खंडाळा८५.४
फलटण६८.४
माण९४.९
खटाव१०९.१
एकूण१,१४८.४
सरासरी१०४.४


१ नोव्हेंबर ते १३ मे कालावधीत पाऊस (मिमी)
तालुकापाऊस
सातारा७९.७
जावळी११५.२
कोरेगाव५६.७
कऱ्हाड१११.४
पाटण११३.४
वाई१२२.८
महाबळेश्वर१९१.४
खंडाळा८५.४
फलटण६८.४
माण९४.९
खटाव१०९.१
एकूण१,१४८.४
सरासरी१०४.४


कावळेदादा... पाऊस पडेल काय?
घरटी सांगताहेत मान्सून : पक्ष्यांच्या हालचालींवरून शेतकऱ्यांनी वर्तविला अंदाज
जावेद खान ल्ल सातारा
वातावरणात होणाऱ्या बदलाची पूर्वसूचना सर्वांत अगोदर पशुपक्ष्यांना कळते, असे मानले जाते. सध्या झाडांवर कावळे आपली घरटी बांधू लागले आहेत. घर बांधण्याच्या त्यांच्या पद्धतीवरून यंदाचा मान्सून हा वेळेत येणार असून तो समाधानकारक असेल, असा अंदाज शेतकऱ्यांमधून व्यक्त होत आहे.
कावळा हा लोकवस्तीत वावरणारा पक्षी आहे. हा पक्षी संपूर्ण भारतभर आढळतो. म्हणूनच त्याच्या हालचालींवरून वातावरणातील बदलाचे अंदाज वर्तविण्याची पद्धत फार प्राचीन आहे. साधारणत: पावसाळा सुरू होण्याआधी कावळे घरटी बांधण्यास सुरुवात करतात. घरटे बांधत असताना कावळे वातावरणातील बदलानुसार झाडाची व जागेची निवड करतात. आंबा, निंब, पिंपळ, करंज यासारख्या झाडांवर घरटी बांधली तर पाऊस जास्त प्रमाणात पडतो आणि जर बाभूळ, बोर, खैर, हिवर, सावर यासारख्या काटेरी झाडांवर घरटी बांधली तर पाऊस कमी पडतो. याशिवाय झाडांच्या पूर्व किंवा उत्तर दिशांना घरटे असेल तर पाऊस चांगला पडतो तर पश्चिम व दक्षिण दिशेकडे असेल तर पावसाचे प्रमाण कमी असते. त्याचबरोबर पावसाचे प्रमाण ओळखण्याची तिसरी पद्धत म्हणजे, घरट्यात तीनपेक्षा जास्त अंडी असल्यास पावसाचे प्रमाण जास्त असते तर एकच अंडे असेल तर पाऊस कमी पडणार असे त्यातून सूचित होत असल्याचा अंदाज शेतकरी निरीक्षणातून वर्तवितात.
सध्या सदर बझार परिसरात उंच झाडांवर कावळ्यांनी घरटी बांधण्यास सुरुवात केली आहे. त्यामुळे यंदा जास्त पाऊस पडणार, असे ज्येष्ठ नागरिक सांगत आहेत.



मान्सूची चाहूल
कशी ओळखावी?
४सह्याद्रीच्या घाटावर कोका पक्षी आढळतो. मे महिन्यात रात्रीच्या वेळी हा पक्षी ‘कॉक-कॉक’ असा आवाज करत कोकण किनारपट्टीपर्यंत जातो. या पक्ष्याच्या डोक्यावर खोलगट भाग आहे. त्यात मीठ भरून तो पक्षी पुन्हा २१ दिवसांनी आपल्या जागी येतो. हा पक्षी जाताना पश्चिमेला जातो व येताना मात्र तो पूर्वेच्या दिशेने येतो. यानंतर साधारणपणे चार-पाच दिवसांनी पावसाला सुरुवात होते. बामणोली येथील भागाबाई शिंदे या वृद्ध महिलेने हा पक्षी आठ दिवसांपूर्वी आवाज करत गेला असल्याचे सांगितले तर बामणोली परिसरात काजव्याची जाळी म्हणजेच लखलखाट पाहायला मिळत आहे. त्यामुळे लवकर मान्सून सुरू होण्याची ही चिन्हे असल्याचे येथील शेतकरी सांगत आहेत.

Web Title: Aub .. Rainfall in the rain is 1148 mm

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.