अतुल भोसलेंना ‘कमळ’ खुणावतंय !

By Admin | Updated: September 11, 2014 23:18 IST2014-09-11T22:09:19+5:302014-09-11T23:18:00+5:30

कऱ्हाड दक्षिण मतदारसंघ : वैयक्तिक महत्त्वाकांक्षेमुळे ज्येष्ठांची चुळबूळ; पण युवा मोर्चाचा उघड पाठिंबा

Atul Bhosaleena signs 'lotus'! | अतुल भोसलेंना ‘कमळ’ खुणावतंय !

अतुल भोसलेंना ‘कमळ’ खुणावतंय !

कऱ्हाड : गत काही महिने ‘कोणता झेंडा घेऊ हाती,’ अशा द्विधा मन:स्थितीत असणाऱ्या डॉ़ अतुल भोसलेंना कमळ खुणवायला लागलंय़ त्यांच्या भाजप प्रवेशाच्या चर्चेनं पक्षातील काही ज्येष्ठ अस्वस्थ झाले. त्यांनी एका पत्रकार परिषदेत आपली अस्वस्थताही व्यक्त केली; पण भाजप युवा मोर्चाच्या कार्यकर्त्यांनीच भोसलेंच्या उमेदवारीची मागणी केल्याने भोसलेंच्या हातात कमळ केव्हा दिसणार? याचीच उत्सुकता साऱ्यांना लागली आहे़
आगामी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कऱ्हाड दक्षिणमधून उभे राहण्याचा मानस डॉ़ अतुल भोसलेंचा आहे़ त्यासाठी गत दोन वर्षांपासून त्यांचे प्रयत्न सुरू आहेत़ सुरुवातीला ते काँग्रेसमधून लढतील, असे वाटत होते; पण आता त्यांनी महायुतीत सहभागी व्हावे अन् कऱ्हाड दक्षिणची जागा ज्या पक्षाकडे जाईल, त्या पक्षाच्या चिन्हावर लढावे, असा सूर आहे़ दोन महिन्यांपासून मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यापासून चार हात दूरच राहणाऱ्या अतुल भोसलेंनी काँग्रेस पक्षाकडे साधी उमेदवारीही मागितलेली नाही; पण निवडणूक लढण्याचा त्यांचा निर्धार कायम आहे़ साहजिकच मोदी लाटेवर स्वार होऊन त्यांनी भाजपात प्रवेश करावा, असा आग्रह वाढत आहे़
अतुल भोसलेंच्या भाजप प्रवेशाची चर्चा सुरू होताच तालुक्यातील काही जुन्या भाजप पदाधिकाऱ्यांनी अगोदरच त्याला विरोध करीत भावना व्यक्त केली; पण दोन दिवसांपूर्वी भाजप युवा मोर्चाच्या पदाधिकाऱ्यांनी अतुल भोसलेंची भेट घेऊन त्यांच्या उमेदवारीचीच चक्क मागणी केली आहे़ त्यामुळे भोसलेंच्या भाजप प्रवेशाची चर्चा पुन्हा जोरात सुरू झाली आहे़
अतुल भोसलेंच्या उमेदवारीची मागणी करणारा युवकवर्ग आहे़ आज राष्ट्राचे भविष्य युवकांच्याच हातात आहे़ भाजपच्या ज्येष्ठांकडून आजवर पश्चिम महाराष्ट्रात प्रभावीपणे पक्ष वाढलेला दिसत नाही़
आज मोदी लाटेत तरुणांच्या नवसंकल्पांना वाव दिला तर पक्ष वाढू शकतो, असंच कदाचित या तरुणांना वाटत असावे; पण त्यांच्या पक्ष प्रवेशाला विरोध करणारे वैयक्तिक महत्त्वाकांक्षेला बाधा येऊ नये म्हणून तर हा विरोध करत नसतील ना ? याचीही जोरदार चर्चा सुरू
आहे़ (प्रतिनिधी)

Web Title: Atul Bhosaleena signs 'lotus'!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.