डेंग्यू रोखण्यासाठी सदर बझारवर लक्ष
By Admin | Updated: November 11, 2014 23:26 IST2014-11-11T21:05:59+5:302014-11-11T23:26:29+5:30
सातारा पालिका : कोरडा दिवस पाळण्याचे आरोग्य सभापतींचे आवाहन

डेंग्यू रोखण्यासाठी सदर बझारवर लक्ष
सातारा : सातारा शहरात आतापर्यंत डेंग्यूचे अनेक रुग्ण सदर बझार परिसरात आढळले आहे. यासाठी पालिकेने या रोगराईवर नियंत्रण आणण्यासाठी सदर बझार परिसरावर लक्ष केंद्रीत केले असून आठवड्यातून एक कोरडा दिवस पाळावा, असे आवाहन आरोग्य सभापती रवींद्र झुटींग यांनी केले आहे.
गेल्या १५ दिवसांपासून डेंग्यूवर नियंत्रणासाठी पालिकेने फॉगींग मशिनद्वारे औषध फवारणी सुरू केली आहे. तसेच साठून राहिलेले पाणी, तुंबलेले नाले तसेच झाडी-झुडपांची सफाई केली आहे. यासाठी पालिकेचे आरोग्य कर्मचारी दिवस-रात्र कार्यरत आहेत. सदर बझार येथील भिमाबाई आंबेडकर झोपडपट्टी व म्हाडा कॉलनी येथे डेंग्युची लागण झालेले दोन रुग्ण आढळले होते. त्यानंतर पालिकेने अंग झाकून हा परिसर पिंजून काढला व औषध फवारणी केली.
दरम्यान ज्या वस्तीत डेंग्युची लागण झालेले रुग्ण आढळले त्या ठिकाणी आरोग्य सभापती झुटींग यांनी पाहणी केली. तसेच या वस्तीतील पाण्याची पाहणी करून साठलेल्या पाण्याचा निचरा करण्याच्या सूचना देवून साठवण टाक्या स्वच्छ धुऊन वाळवावी व नंतर पाणी भरावे, असे आवाहन केले. तसेच आठवड्यातून एक कोरडा दिवस पाळावा, असे आवाहनही यावेळी झुटींग यांनी केले.
डेंग्यूपासून बचावासाठी पालिकेला नागरिकांनीही साथ द्यावी. घरात साठवून ठेवलेले पाणी शक्यता वापरू नये, डबकी मुजवावी तसेच घराची व परिसरात स्वच्छता ठेवावी. अशा सूचनाही आरोग्य सभापती यांनी केल्या. सध्या डेंग्युचा एकही डास आढळला नसला तरी आरोग्य कर्मचारी संपूर्ण शहरात स्वच्छता मोहीम राबवून औषध फवारणी करणार असल्याचे झुटिंग यांनी यावेळी
सांगितले. (प्रतिनिधी)