अतिक्रमण काढले म्हणून आत्महत्येचा प्रयत्न
By Admin | Updated: November 16, 2014 00:03 IST2014-11-16T00:03:13+5:302014-11-16T00:03:13+5:30
सातारा नगरपालिका : भरपावसातही मोहीम सुरूच

अतिक्रमण काढले म्हणून आत्महत्येचा प्रयत्न
सातारा : अतिक्रमण नसतानाही अतिक्रमण असल्याचे सांगत सातारा नगरपालिकेने शेड काढले म्हणून मल्हार पेठेतील एका युवकाने शुक्रवारी रात्री आपल्या राहत्या घरी आत्महत्येचा प्रयत्न केला. दरम्यान, या घटनेमुळे सातारा शहरात एकच खळबळ उडाली आहे.
याबाबतची अधिक माहिती अशी की, सातारा नगरपालिकेच्या वतीने गेले चार दिवस झाले अतिक्रमण मोहीम सुरू आहे. मात्र, सातारा पालिका ही धनदांडग्यांची अतिक्रमणे तशीच ठेवून सर्वसामान्यांना त्रास देत असल्याचा आरोप काहीजण करू लागले आहेत. दरम्यान, पालिकेची अतिक्रमण आणि अवैध बांधकाम हटाव मोहीम गुरुवार, दि. १३ रोजी सुरू होती.
यादरम्यान, गिरिजा हॉस्पिटलनजीक असणारे एक शेड पालिकेने काढले. दुपारी अडीच वाजण्याच्या सुमारास हे शेड अजिंक्य प्रकाश भोईटे (वय २४, रा. मल्हार पेठ, सातारा) याचे असून, ते काढण्यात आले. मात्र, हे शेड अतिक्रमणात नसल्याचा भोईटे याचा दावा असतानाही ते पाडल्यामुळे भोईटेला टेन्शन आले. शुक्रवारी दिवसभर तो तणावाखालीच होता.
याच तणावाखाली त्याने शुक्रवारी, दि. १४ रोजी रात्री साडेदहाच्या सुमारास आपल्या घरातील काचेच्या खिडकीवर स्वत:च्या हाताने मारून घेत दुखापत करून घेतली. यात तो जखमी झाला असून, त्याच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत. (प्रतिनिधी)
शहरातील कट्टे, फूटपाथ हटविले
सातारा : शहरात सहाव्या दिवशीही अतिक्रमण हटाव मोहीम सुरू होती. शहरातील काही ठिकाणी रस्त्यामध्ये आलेले फूटपाथ आणि कट्टे हटविण्यात आली. शनिवार पेठेतील किराणा मालाच्या दुकानदाराने स्वत:हून दुकानातील साहित्य काढून घेतले.पाचशेएक पाटीजवळील किराणा मालाच्या दुकानदाराने शनिवारी सर्व साहित्य काढून घेतले. हे साहित्य काढत असताना पालिकेचे कर्मचारी तेथे जातीने हजर होते. त्या दुकानाची रस्त्यामध्ये आलेली भिंत सोमवारी पाडण्यात येणार आहे. दरम्यान, राजलक्ष्मी टॉकीजसमोरील फूटपाथ आणि काही कट्टेही अतिक्रमण हटाव मोहिमेने काढले. दरम्यान, दुपारी शहरात पाऊस पडल्याने अतिक्रमण मोहिमेवरही त्याचा परिणाम झाला. पावसामुळे ही मोहीम थांबविण्यात आली. सोमवारी पुन्हा अतिक्रमण काढले जातील, असे भाग निरीक्षक अनिल भोसले यांनी सांगितले. (प्रतिनिधी)