जिल्हाधिकारी कार्यालयासमोर दहा जणांचा आत्मदहनाचा प्रयत्न
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 17, 2021 04:44 IST2021-08-17T04:44:53+5:302021-08-17T04:44:53+5:30
सातारा : स्वातंत्र्यदिनी पोलिसांची नजर चुकवत जिल्हाधिकारी कार्यालयासमोर दहा जणांनी आत्मदहनाचा प्रयत्न केला. या सर्वांच्या विरोधात सातारा शहर पोलीस ...

जिल्हाधिकारी कार्यालयासमोर दहा जणांचा आत्मदहनाचा प्रयत्न
सातारा : स्वातंत्र्यदिनी पोलिसांची नजर चुकवत जिल्हाधिकारी कार्यालयासमोर दहा जणांनी आत्मदहनाचा प्रयत्न केला. या सर्वांच्या विरोधात सातारा शहर पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद झाला आहे. यामधील ९ जण हे कोरेगाव तालुक्यातील आसरे येथील असून, एकजण पाटण तालुक्यातील निसरे येथील आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, स्वातंत्र्यदिनी रविवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अंगावर डिझेल ओतून आसरे, ता. कोरेगाव येथील ९ जणांनी आत्मदहनचा प्रयत्न केला. विठ्ठल सहदेव सणस, रमेश महादेव चव्हाण, महेंद्र आनंदा सणस, लक्ष्मण सीताराम सणस, रामचंद्र मारुती सणस, मंदा संजय सणस, धमेंद्र चिमाजी सणस, अनिल गेनबा सणस आणि रुपेश सीताराम सपकाळ अशी त्यांची नावे आहेत. या सर्वांविरोधात आत्मदहनाचा प्रयत्न केल्याने गुन्हा नोंद झाला आहे.
धोम पुनर्वसन प्रकल्पाच्या अनुषंगाने तुकाराम जगन्नाथ सणस (रा. आसरे) व इतरांनी शासनाची फसवणूक करून जमिनी बळकावल्या आहेत. त्यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल करावेत. तसेच सातबारावरील चुकीची नोंद दुरुस्त करून मिळावी या मागणीसाठी नऊ जणांनी अंगावर डिझेल ओतून आत्मदहनाचा प्रयत्न केला होता, असे पोलिसांनी सांगितले.
पाटण तालुक्यातील निसरे येथील युवराज सिंगआप्पा चव्हाण यांनीही आत्मदहनाचा प्रयत्न केला. पाटण येथील सहायक निबंधकांच्या भ्रष्ट कारभाराची सखोल चौकशी करावी. सेवा व दफ्तर दिरंगाई कायद्याप्रमाणे कारवाई करावी. तसेच दत्तकृपा ग्रामीण बिगर शेतकरी सहकारी पतसंस्थेची चौकशी करावी, या मागणीसाठी आत्मदहनाचा प्रयत्न चव्हाण यांनी केल्याचे पोलिसांनी सांगितले.
फोटो दि.१६सातारा आत्मदहन फोटो...
फोटो ओळ : सातारा येथे रविवारी स्वातंत्र्यदिनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर १० जणांनी आत्मदहनाचा प्रयत्न केला. यावेळी पोलिसांनी संबंधितांना पकडून ताब्यात घेतले. (छाया : जावेद खान)
.............................................................