आरोपींवर झाले वारंवार हल्ले!

By Admin | Updated: October 18, 2014 23:25 IST2014-10-18T23:25:37+5:302014-10-18T23:25:37+5:30

प्रत्येक वळणावर नवी कलाटणी : जादा तपासात धक्कादायक घडामोडी

Attacks on the accused repeatedly! | आरोपींवर झाले वारंवार हल्ले!

आरोपींवर झाले वारंवार हल्ले!

कऱ्हाड : महाराष्ट्र केसरी संजय पाटील खून प्रकरणाला वेळोवेळी कलाटणी मिळत गेली. प्रत्येक वळण, या प्रकरणात जादा मुद्दे आणि आणखी तपास घेऊनच समाविष्ट झाले. मूळ प्रकरणाचा जादा तपास केला गेला. त्यामध्ये आरोपी वाढले आणि त्याबरोबरच या प्रकरणाची संवेदनशीलताही. मध्यंतरीच्या कालावधीत अटकेत असणाऱ्या आरोपींवर जीवघेणा हल्लाही झाला. त्यामुळे प्रकरण अधिकच गंभीर बनले.
मलकापूर येथील डीएमएस कॉम्प्लेक्ससमोर दि. १५ जानेवारी २००९ रोजी संजय पाटील यांचा गोळ्या घालून खून करण्यात आला. या प्रकरणात मार्च २००९ अखेर सागर परमार, सलीम महंमद शेख ऊर्फ सल्या चेप्या, बाबासाहेब मोरे, लाजम होडेकर, हमीद शेख, मुदस्सर मोमीन, सचिन चव्हाण, संभाजी खाशाबा पाटील ऊर्फ एस. के. या सातजणांना अटक केली. आरोपींविरोधात न्यायालयामध्ये दोषारोपपत्र सादर झाले. त्यानंतर अटकेत असणाऱ्या सल्या चेप्या याच्यावर सातारा येथील शासकीय रुग्णालयात पहिला जीवघेणा हल्ला झाला. त्याच्यावर गोळीबार करण्यात आला. प्रकरणाचे गांभीर्य वाढल्यामुळे सल्यासह इतर आरोपींना न्यायालयात हजर करताना पोलिसांकडून कडक बंदोबस्त तैनात करण्यात येऊ लागला. आॅक्टोबर २००९ मध्ये कऱ्हाडच्या जिल्हा सत्र न्यायालयाच्या आवारात सल्यावर पुन्हा गोळीबार झाला. त्यातून सल्या बचावला. मात्र, दोन पोलीस अधिकारी जखमी झाले. सल्यावर झालेल्या गोळीबारप्रकरणी पोलिसांनी दीपक पाटील, अभिनंदन झेंडे, जावेद सुतार, जयकर रसाळ, प्रवीण पाटील ऊर्फ पी. के., बबलू माने, संभाजी थोरात, प्रमोद जगदाळे या आठ जणांना अटक केली. सल्याशी असलेल्या मतभेदाच्या कारणावरून हे कृत्य केल्याची कबुली त्यावेळी आरोपींनी पोलिसांना दिली होती. संजय पाटील खून खटल्याची सुनावणी सुरू झाल्यानंतरही अनेक घडामोडी घडल्या. नोव्हेंबर २०१२ मध्ये याचा जादा तपास करण्याची मागणी सरकार पक्षातर्फे करण्यात आली. त्यानुसार डिसेंबर २०१२ मध्ये प्रकरणाच्या जादा तपासाचे आदेश उच्च न्यायालयाने दिले. अप्पर पोलीस अधीक्षक अमोल तांबे या प्रकरणाच्या जादा तपासात सुरुवातीला शंकर शेवाळे व त्यानंतर आमदारपुत्र उदयसिंह पाटील यांना अटक केली. त्यानंतर तपासात कमतरता ठेवल्याच्या आरोपावरून तत्कालीन तपासी अधिकारी पोलीस निरीक्षक संभाजी पाटील यांनाही अटक करण्यात आली. त्यामुळे हे प्रकरण वेगळ्या वळणावर येऊन ठेपले. (प्रतिनिधी)
वर्चस्ववादातून सल्यावर तिसरा हल्ला
न्यायालयात खटल्याची सुनावणी सुरू असतानाच सल्या चेप्या याच्यावर कऱ्हाडच्या न्यायालयात तिसऱ्यांदा हल्ला झाला. त्यावेळी झालेल्या गोळीबारात सल्या गंभीर जखमी झाला. खासगी रुग्णालयात त्याच्यावर उपचार केले. मात्र, सल्या अद्यापही त्यातून पूर्णपणे बरा झालेला नाही.
उंडाळकर समर्थक साताऱ्याकडे रवाना
महाराष्ट्र केसरी संजय पाटील खून प्रकरणाचा निकाल शनिवारी लागणार असल्याने शहरासह तालुक्यात तर्कवितर्क लढविले जात होते. अखेर उदयसिंह पाटील यांच्यासह इतरांची निर्दाेष मुक्तता झाल्याची माहिती दुपारी १२.३० वाजण्याच्या सुमारास उंडाळकर समर्थकांना समजली. त्यामुळे समर्थकांनी जल्लोष केला. शहरातील दत्त चौकात समर्थकांकडून फटाके फोडण्यात आले. अनेक कार्यकर्ते उदयसिंह पाटील यांना भेटण्यासाठी सातारला रवाना झाले.

Web Title: Attacks on the accused repeatedly!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.