एटीएम घोटाळा कोरेगावात
By Admin | Updated: August 7, 2015 23:20 IST2015-08-07T23:20:35+5:302015-08-07T23:20:35+5:30
पंधराजणांवर गुन्हा : ८० लाख हडप केल्याचा अंदाज

एटीएम घोटाळा कोरेगावात
कोरेगाव : सातारा शहर आणि तालुक्यापाठोपाठ कोरेगाव आणि खटाव तालुक्यातील पाच एटीएम यंत्रांमध्ये पैशांचा भरणा न करता सुमारे ७९ लाख ९६ हजार ८०० रुपयांचा अपहार केल्याप्रकरणी १५ जणांच्या विरोधात कोरेगाव पोलीस ठाण्यात शुक्रवारी गुन्हा नोंद करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सातारा शहर आणि परिसरातील एटीएम यंत्रांमध्ये पैशांचा भरणा न करता कोट्यवधी रुपयांचा अपहार केल्याप्रकरणी सायंटिफिक सिक्युरिटी मॅनेजमेंट सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड, लि. मुंबईचा सातारा येथील शाखाधिकारी अजय दिलीप हगवणे (रा. पांडेवाडी, पो. भोगाव, ता. वाई) याच्यासह ९ कर्मचारी आणि ६ साथीदारांवर सातारा शहर पोलीस ठाण्यात यापूर्वीच गुन्हा नोंद करण्यात आला आहे. रहिमतपूर शाखेतील एटीएम केंद्रावर १३ लाख २० हजार ५०० रुपये, चिमणगाव शाखेतील केंद्रावर २६ लाख १९ हजार रुपये, पेठ किन्हई शाखेतील केंद्रावर ४ लाख ५० हजार ६०० रुपये, पुसेगाव शाखेतील केंद्रावर १८ लाख १४ हजार ४०० रुपये, पुसेगाव येथील केंद्रावर १७ लाख ९२ हजार ३०० रुपये असे एकूण ७९ लाख ९६ हजार ८०० रुपयांचा अपहार झाल्याचे निदर्शनास आल्यानंतर कंपनीचे व्यवस्थापक (ग्राहक सेवा वितरण) अशोक प्रभू, रा. डोंबिवली-कल्याण यांनी कोरेगाव पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे. सातारारोड पोलीस दूरक्षेत्राचे सहायक पोलीस निरीक्षक जर्नादन धुमाळ तपास करत आहेत. (प्रतिनिधी)
गुन्हा दाखल झालेले असे
पोलिसांनी कंपनीचा सातारा शाखेचा व्यवस्थापक अजय हगवणे याच्यासह कंपनी कर्मचारी नामदेव नवघणे (रा. वासोळ)े, वैभव साळुंखे (रा. बोरगाव), अभिजित बोरस्कर (रा. वडगाव), शेखर गायकवाड (रा. पांडेवाडी), शशांक यादव (रा. करंजे-सातारा), जितेंद्र शेडगे (रा. बोरगाव), सागर खरात (रा. आसरे), निखिल नावडकर (रा. सोनगाव) व त्यांचे सहकारी तुषार चंद्रकांत साळुंखे (रा. बोरगाव), सचिन जाधव (रा. काशिळ), अमित जाधव (रा. अतित), अतुल साळुंखे (रा. बोरगाव), कुमार उर्फ बबलू सकटे (रा. बोरगाव, हल्ली नागठाणे), विराज ऊर्फ अमोल प्रताप कुंदप (रा. बोरगाव) यांच्या विरोधात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.