पेट्री : जगातल्या सर्वांत मोठ्या फुलपाखरांपैकी एक असलेले ‘ॲटलास मॉथ’ या जातीचे फुलपाखरू जागतिक वारसास्थळ असलेल्या कास पुष्प पठार परिसरात आढळून आले. दक्षिण पूर्व आशियामध्ये आढळणारे हे फुलपाखरू सह्याद्रीमध्ये आढळल्याने पश्चिम घाटातील समृद्ध जैवविविधतेचा पैलू उजेडात आला आहे.निसर्गप्रेमी रवी चिखले यांनी कास-बामणोली मार्गावर अंधारी फाटा परिसरात हे फुलपाखरू मोबाइल कॅमेऱ्यात कैद केले. ॲटलॉस मॉथ रायगड जिल्ह्यातील माणगाव, सांगली जिल्ह्यातील शिराळा या ठिकाणीही पूर्वी आढळून आला आहे.ही आहेत वैशिष्ट्ये..पंखांच्या टोकाला नागाच्या तोंडाचा आकार असल्याने ॲटलास मॉथ दुर्मीळ आणि जगातील सर्वांत मोठ्या पतंगापैकी एक असल्याचे अभ्यासकांनी सांगितले. हा एक अत्यंत मोठा आणि दुर्मीळ पतंग आहे. तो सहसा आशियातील जंगलांमध्ये आढळतो. त्याची रंगसंगती व नक्षीकाम नागाच्या डोक्यासारखे दिसते. ज्यामुळे त्याला एक नैसर्गिक संरक्षण मिळते.
पंखांचा विस्तार १० इंज..हा पतंग खूप मोठा असतो आणि त्याच्या पंखांचा विस्तार सुमारे १० इंच (२५ सेमी) असू शकतो. त्याच्या पंखांवर आकर्षक बदामी तपकिरी व किंचित लालसर रंग असतो. पंखांच्या टोकांवर नागाच्या डोक्यासारखी दिसणारी नक्षी असते, जी भक्षकांना घाबरवण्यासाठी वापरली जाते.
आयुष्यमान सात दिवसांचेया पतंगाचे आयुष्य साधारणपणे पाच ते सात दिवसांचे असते. या काळात ते वीण करण्यासाठी आणि प्रजनन करण्यासाठी ऊर्जा वाचवतात. प्रौढ पतंग अन्न खात नाहीत. सुरवंट अवस्थेत असताना दालचिनी, लिंबूवर्गीय आणि पेरूच्या झाडांची पाने खाऊन ते ऊर्जा साठवतात.
निसर्ग फोटोग्राफीची आवड असल्याने गेल्या आठवड्यात अशाच प्रकारच्या एका दुर्मीळ फुलपाखराचा फोटो काढला होता. उंबरी परिसरात अशा प्रकारच्या शेकडो फुलपाखरांच्या व पतंगांच्या प्रजाती आढळतात. मात्र, त्याचा अभ्यास आणि शोध घेणारी यंत्रणा येथे उपलब्ध नसल्याने ही सर्व संपदा दुर्लक्षित आहे. - रवी चिखले, निसर्गप्रेमी