सहायक पोलीस निरीक्षक निलंबित
By Admin | Updated: May 29, 2014 00:27 IST2014-05-29T00:26:58+5:302014-05-29T00:27:58+5:30
लाच प्रकरण : पुण्यातील घर सील; शोधार्थ पथके रवाना

सहायक पोलीस निरीक्षक निलंबित
सातारा : तक्रारदाराच्या वडिलांवर लैंगिक अत्याचाराचा गुन्हा नोंदविण्याची धमकी देत हस्तकामार्फत ७० हजारांंची लाच स्वीकारल्याप्रकरणी गुन्हा दाखल असलेला सहायक पोलीस निरीक्षक गोरख दरेकर याला पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांनी तडकाफडकी निलंबित केले. दरम्यान, दरेकर याचे पुण्यातील घर लाचलुचपत विभागाने सील केले आहे. एका तक्रारदाराला दरेकर ब्लॅकमेलिंग करत होता; गुन्हा दाखल करण्याची भीती दाखवत त्याने हस्तकामार्फत ७० हजार रुपये उकळले. मात्र, ‘एसीबी’च्या जाळ्यात तो अलगद अडकला. सातार्यात ट्रॅप यशस्वी झाल्यानंतर दरेकर याच्या पुण्यामधील फुरसुंगी पापडेवस्ती येथील घरावर ‘एसीबी’ने छापा टाकला; परंतु त्यावेळी घराला कुलूप होते. त्यामुळे ‘एसीबी’ने दरेकरचे घर सील केले. त्याच्या कुटुंबाचाही अद्याप पोलिसांना थांगपत्ता लागला नाही. दरेकरने मोबाइल बंद केल्यामुळे त्याचे लोकेशनही पोलिसांना मिळत नाही. दरेकरने स्वत: लाचेची रक्कम स्वीकारली नसली तरी त्याने लाचेची मागणी केल्याचे निष्पन्न झाले. त्यामुळेच त्याच्यावर गुन्हा दाखल झाला. सध्या तो फरार असून, पोलीस त्याचा शोध घेत आहेत. दरेकरचा अन्य एक साथीदार दिगंबर घवरे हाही अद्याप फरार आहे. या दोघांना पकडल्यानंतर आणखी बरीच माहिती समोर येण्याची शक्यता ‘एसीबी’च्या टीमने वर्तवली आहे. (प्रतिनिधी)