सहायक फौजदाराची मुलगी देणार देशाच्या सीमेवर पहारा!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 25, 2021 04:38 IST2021-04-25T04:38:54+5:302021-04-25T04:38:54+5:30

जगन्नाथ कुंभार मसूर : क्रांतिकारक, शूर वीरांची भूमी म्हणून साताऱ्याची ओळख आहे. देशावर संकट आले त्यावेळी साताऱ्याने मराठी बाणा ...

Assistant Faujdar's daughter to guard the country's borders! | सहायक फौजदाराची मुलगी देणार देशाच्या सीमेवर पहारा!

सहायक फौजदाराची मुलगी देणार देशाच्या सीमेवर पहारा!

जगन्नाथ कुंभार

मसूर : क्रांतिकारक, शूर वीरांची भूमी म्हणून साताऱ्याची ओळख आहे. देशावर संकट आले त्यावेळी साताऱ्याने मराठी बाणा जपत वेगळा ठसा उमटवला आहे. जिल्ह्याने अनेक जवान दिले. पण आता तरुणीही लष्करात दाखल होऊ लागल्या आहेत. हेळगावमधील अंकिता नलवडे सीमा सुरक्षा दलात भरती झाली आहे.

स्वातंत्र्योत्तर काळात यशवंतराव चव्हाण यांच्यासारखे कणखर आणि खंबीर नेतृत्व जिल्ह्याने देशाला दिले. स्वातंत्र्यानंतर भारतभूमीच्या रक्षणासाठी अनेक ध्येयवेडे जवान या जिल्ह्याने दिले. अशाच प्रकारे जिद्द व चिकाटीच्या जोरावर कऱ्हाड तालुक्यातील हेळगाव येथील अंकिता रघुनाथ नलवडे हिने सैन्यात भरती होऊन आजच्या मुलींसमोर एक वेगळा आदर्श ठेवला आहे.

हेळगाव परिसरात शेती मुख्य व्यवसाय असला तरी २००० नंतर येथील शेतीला योग्य सिंचन व्यवस्था मिळाली. मात्र त्यापूर्वी शेती हा व्यवसाय निसर्गाच्या लहरीपणावर अवलंबून होता. त्यामुळे गावातील अनेक जण नोकरी-व्यवसायानिमित्त बाहेरगावी पडले असल्याचे दिसून येते. त्यामुळेच हेळगाव येथील रघुनाथ नलवडे यांनी शिक्षण पूर्ण केल्यावर पोलीस भरतीचा निर्णय घेतला. शिपाई म्हणून पोलीस भरती झालेल्या रघुनाथ नलवडे यांनी सहायक फौजदार पदापर्यंत मजल मारली होती. आपल्या मुलांनाही उच्चशिक्षित करताना त्यांनी कन्या अंकिताला सैन्यात आणि पोलीस भरती होण्यासाठी प्रोत्साहन दिले. अंकितानेही वडिलांची इच्छा पूर्ण करण्याची जिद्द बाळगली होती. नववीपासूनच तिने पोलीस व सैन्य भरतीसाठी तयारी करण्याची सुरुवात केली होती. तिचे प्राथमिक शिक्षण लोणंद येथील प्राथमिक शाळेत झाले, तर माध्यमिक शिक्षण कन्या महा माध्यमिक विद्यालयात झाले.

त्यानंतर वडिलांची बदली खंडाळा येथे झाल्यानंतर राजेंद्र विद्यालय खंडाळा येथे बारावीपर्यंतचे शिक्षण पूर्ण केले. बारावीनंतर पदवीपर्यंतचे शिक्षण घेत असतानाच तिने पोलीस भरती व सैन्यभरतीसाठी प्रयत्न केले. त्यानंतर तिने भोर येथील आनंदराव थोपटे महाविद्यालयात पदवीच्या दुसऱ्या वर्षाला प्रवेश घेतला. पदवीच्या अंतिम वर्षात असतानाच तिची सैन्यात सशस्त्र सीमा बलसाठी निवड झाली. तिने २०१८ मध्ये लेखी परीक्षा दिली होती. २०१९ मध्ये रायगड येथे शारीरिक चाचणी पूर्ण केली. २०२०ला पुणे येथे मेडिकल टेस्ट पूर्ण झाल्यानंतर एप्रिल २०२१ मध्ये तिची सशस्त्र सीमा दलात निवड झाली. भोपाळ येथील सेंटरवर प्रशिक्षणासाठी अंकिता रवाना झाली आहे.

कोट

कऱ्हाड तालुक्यातील पहिली मुलगी

अंकिता ही कऱ्हाड तालुक्यातील सैन्यात भरती होणारी पहिली सुकन्या ठरली आहे. ही बाब गावासाठी अभिमानाची आहे. गावातील अनेक युवक सैन्यात विविध पदांवर कार्यरत आहेत. मात्र जिद्द आणि चिकाटीच्या जोरावर अंकिताने मिळवलेले यश कौतुकास्पद आहे.

फोटो जगन्नाथ कुंभार यांनी मेल केला आहे.

Web Title: Assistant Faujdar's daughter to guard the country's borders!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.