विधानसभेचा पडला खडा; मनोमिलनाला गेला तडा !
By Admin | Updated: November 11, 2014 00:04 IST2014-11-10T20:40:54+5:302014-11-11T00:04:28+5:30
कृष्णाकाठचे राजकारण : भाऊ-आप्पांच्या वारसदारांमध्ये पुन्हा अंतर

विधानसभेचा पडला खडा; मनोमिलनाला गेला तडा !
प्रमोद सुकरे - कऱ्हाड --गेल्या पाच वर्षांत कृष्णाकाठावर ‘यशवंत हो, जयवंत हो’ हे गाणं ऐकायला मिळत होतं; पण विधानसभा निवडणुकीत पुन्हा एकदा ‘खडा’ पडला अन् कृष्णाकाठच्या बहुचर्चित मोहिते-भोसले मनोमिलनाला तडा गेला. दिवंगत यशवंतराव मोहिते यांच्या जयंतीनिमित्त नुकत्याच आयोजित केलेल्या कार्यक्रमातून याची प्रचीती आली.
यशवंतराव मोहिते आणि जयवंतराव भोसले हे दोघे सख्खे भाऊ! जणू राम लक्ष्मणाची जोडी; पण कालांतराने त्या दोघांमध्ये ती ‘गोडी’ राहिली नाही अन् पुढं काय ‘रामायण’ घडलं, हे कृष्णाकाठालाच नव्हे तर अवघ्या महाराष्ट्राला माहीत आहे. दोन भावांतला संघर्ष साऱ्यांनी पाहिला आहे. या संघार्षाने कृष्णाकाठाचं, कृष्णा उद्योग समूहाचं अपरिमित नुकसान होत होतं. दोघांच्या भांडणात तिसरेच राजकीय लाभ उठवत होते; पण कोणी काही बोलायला तयार नव्हते. भाऊ, आप्पांवर प्रेम करणारे लोकही अस्वस्थ झाले होते.
दरम्यान, हा संघर्षरूपी आजार बरा व्हावा म्हणून एका घाटावरच्या डॉक्टरने पुढाकार घेतला. मोहिते-भोसले कुटुंबातील दोन डॉक्टरही बरोबर घेतले अन् ‘मनोमिलन’ नावाचा उपचार झाला. दोन परिवार जोडले गेले म्हणे! २२ डिसेंबर २००७ ला ट्रस्टवर ‘मनोमिलना’ला अनुसरून पहिला कार्यक्रम झाला खरा; पण एका ‘दादा’ सदस्याने त्याला दांडी मारली. त्यामुळे मनोमिलनाचे वारे ‘वाऱ्यावरची वरात’ ठरणार की काय, अशी चर्चा सुरू झाली. त्यानंतर येणके येथे एक छोटेखानी कार्यक्रम झाला. त्यात मदनदादा, इंद्रजितबाबा अन् अतुलबाबांच्या गळ्यात कार्यकर्त्यांनी एकत्रित पुष्पहार घातला. मग हे मनोमिलन घट्ट झाल्याची चर्चा झाली.
मोहिते-भोसले मनोमिलनाने ‘कृष्णे’ची निवडणूक एकत्रित लढविली. त्यात मनोमिलन पार्टीचा पराभव झाला. हा पराभव मदनराव मोहिते व डॉ. इंद्रजित मोहिते यांच्या जिव्हारी लागला. ‘तुमचं मनोमिलन नक्की झालंय का,’ असे ‘चिमटे’ कार्यकर्ते मोहितेंना काढू लागले. मग ते चिमटे स्वकीयांकडून, घरच्यांकडून, मार्गदर्शकांकडून अन् विरोधकांकडूनही सुरू झाले.
दोन वर्षांपूर्वी या मनोमिलनाचा एक चिंतन मेळावा कऱ्हाडच्या मंगल कार्यालयात झाला. यात एका मोठ्या डॉक्टरबाबांनी छोट्या डॉक्टरबाबांना चिमटे काढले. मदनराव मोहितेंनी ज्येष्ठत्वाच्या भूमिकेतून दटावले तर मनोमिलनातील मुख्य सूत्रधार असणारे घाटावरचे डॉक्टर तर वेळोवेळी या मनोमिलनाला डोस देतच राहिले.
गेल्या विधानसभा निवडणुकीत अतुल भोसलेंनी उत्तरेवर केलेली स्वारी मदनराव मोहितेंना रूचली नव्हती. तरीही तालुक्यातील महाआघाडी एकसंध ठेवण्यासाठी त्यांनी प्रयत्न सुरूच ठेवले. नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीतही डॉ. अतुल भोसलेंनी भाजपचे कमळ हातात धरण्याचा निर्णय घेतला अन् मनोमिलनात खऱ्या अर्थाने मिठाचा खडा पडला. मदनराव मोहिते चक्क पृथ्वीराज चव्हाणांचे प्रचारप्रमुख बनले तर डॉ. इंद्रजित मोहितेही चव्हाणांच्या प्रचारातच दिसले. त्यामुळे आता या मनोमिलनाला खऱ्या अर्थाने तडा गेल्याचे कार्यकर्त्यांनी जाणले.
नुकतीच ७ नोव्हेंबरला दिवंगत यशवंतराव मोहिते यांची जयंती झाली; पण या दिवशी भाऊंच्या निवासस्थानी आदरांजली वाहण्यासाठी उपस्थित न राहता डॉ. सुरेश भोसलेंनी रेठऱ्यातच स्वतंत्र कार्यक्रम घेत आदरांजली वाहिली. या कार्यक्रमात बोलताना त्यांनी ‘संघर्ष करीत बसण्यापेक्षा चांगल्या कामासाठी एकमेकांना मदत केली पाहिजे,’ अशा शब्दांत भावनांना वाट मोकळी करून दिली. दुसरीकडे डॉ. इंद्रजित मोहितेंनी आयोजित केलेल्या मेळाव्यात डॉ. पतंगराव कदम यांनीही ‘मनोमिलन सारखं का बिघडतंय हे समजायला मार्ग नाही. खरंतर आता सगळेच सुज्ञ आहेत. यांनी एकमेकाला समाजावून घेतले पाहिजे,’ असा सूर लावला. त्यामुळे तडकलेल्या मनोमिलनाची सध्या तालुक्याच्या राजकारणात जोरदार चर्चा आहे.
नजीकच्या काळात यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्याची निवडणूक होऊ घातली आहे. या निवडणुकीत हे मनोमिलन एकत्र दिसणार की फक्त सोपस्कारच मनोमिलन पार पाडणार, हे नजीकच्या काळात स्पष्ट होईल.
इंद्रजित, अतुलबाबांनी टीका टाळली
विधानसभा निवडणुकीत मोहितेंनी कमळ हातात धरलेल्या पुतण्याचा प्रचार केला नाही. उलट यादरम्यान ते काँग्रेसचे उमेदवार पृथ्वीराज चव्हाण यांच्या प्रचारात दिसले; पण प्रचारात टीकाटिपण्णी होत असताना मदनराव मोहिते वगळता डॉ. इंद्रजित मोहिते व डॉ. अतुल भोसलेंनी परस्परांवर टीका केलेली पाहायला मिळाली नाही.
उंडाळकर म्हणतात, हे तर ‘मनी’मिलन
बहुचर्चित मनोमिलनावर अनेकांनी टीका केली. त्याला विलासराव पाटील-उंडाळकरही अपवाद नाहीत. निवडणुकीपूर्वी झालेल्या अनेक सभांमधून उंडाळकरांनी या मनोमिलनाचा ‘मनी’मिलन असा उल्लेख केला होता.