कऱ्हाड उत्तरच्या आमदारांना घरी बसवा

By Admin | Updated: August 3, 2014 01:53 IST2014-08-03T01:14:53+5:302014-08-03T01:53:09+5:30

उंब्रज : स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या मेळाव्यात बाळासाहेब पाटील यांच्यावर खरमरीत टीका

Assemble the MLAs of the Karhad North | कऱ्हाड उत्तरच्या आमदारांना घरी बसवा

कऱ्हाड उत्तरच्या आमदारांना घरी बसवा

उंब्रज : ‘कऱ्हाड उत्तरचे आमदार विधानसभेत बोलताना कधीही दिसले नाहीत. तेव्हा अशा मुक्या-बहिऱ्या लोकप्रतिनिधीला घरी बसविणेच योग्य आहे,’ अशी खरमरीत टीका आमदार बाळासाहेब पाटील यांचे नाव न घेता स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या मेळाव्यात करण्यात आली.
उंब्रज येथे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचा मेळावा झाला. यावेळी संघटनेचे खासदार राजू शेट्टी, प्रदेशाध्यक्ष सदाभाऊ खोत, मनोज घोरपडे, जिल्हाध्यक्ष पंजाबराव पाटील, कऱ्हाड तालुकाध्यक्ष सचिन नलवडे यांची प्रमुख उपस्थिती होती.
खासदार शेट्टी म्हणाले, ‘साखरसम्राट हे राक्षस आहेत. त्यांना संपविण्यासाठी लोकशाहीमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी मताचे ब्रह्मास्त्र दिले आहे. त्याचा वापर शेतकऱ्यांनी करून सर्वसामान्यांच्या मानगुटीवर गेली पंधरा वर्षे बसलेले आघाडीचे सरकार पाडावे. साखर कारखान्याच्या माध्यमातून बांडगुळे तयार झाली आहेत. त्यांनी शेतकऱ्यांना अज्ञानात ठेवण्याचे काम केले आहे. येथील शेतकरी साखर कारखान्याकडून मिळणारी साखर व चेअरमनकडून मिळणारे चहा व बिस्कीट या पुरताच मर्यादित होता; परंतु आता शेतकरी जागे झाले आहेत.’
प्रदेशाध्यक्ष खोत म्हणाले, ‘लोकशाहीत झोपडपट्टीत राहणारा माणूस देशाचा राजा ठरवू शकतो. येथे शेतकरी विरोधात गेला की त्याला अडवले जातेय. वाळूमाफिया, गुंडांना हाताशी धरले आहे. घोटाळे करणाऱ्या सगळ्यांना येरवड्याच्या तुरुंगात घालण्यासाठी व आरपारची लढाई करण्यासाठी शेतकऱ्यांनी सज्ज झाले पाहिजे.’
मनोज घोरपडे म्हणाले, ‘कोल्हापूर, सांगली जिल्ह्यांतील साखर कारखाने उसाला दर देत आहेत. परंतु सातारा जिल्ह्यातील कारखाने दर जाहीर करत नाहीत. आम्ही येथील संघटित दहशतवाद मोडून काढणार आहे. शेतकऱ्यावर अन्याय करू दिला जाणार नाही. खपवूनही घेतला जाणार नाही. शेतकऱ्यांसाठी आम्ही रस्त्यावर उतरलो आहोत. आम्ही विरोधकांचा दबाव घेत नाही. वेळ पडल्यास दबाव टाकू शकतो. स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडून भविष्यात दिलेली जबाबदारी आम्ही पार पाडणार आहोत.’
दीपक साबळे यांनी प्रास्ताविक केले. अंजन घाडगे यांनी आभार मानले. (प्रतिनिधी)

Web Title: Assemble the MLAs of the Karhad North

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.