हक्काचे पाणी बारामतीला विकणाऱ्यांना जाब विचारा : हिंदुराव नाईक-निंबाळकर
By Admin | Updated: June 20, 2017 16:26 IST2017-06-20T16:26:18+5:302017-06-20T16:26:18+5:30
निरा, देवघरच्या पाण्यासाठी संघर्ष करण्याची वेळ; फलटण तालुक्यात बैठकांमध्या ग्रामस्थांना आवाहन

हक्काचे पाणी बारामतीला विकणाऱ्यांना जाब विचारा : हिंदुराव नाईक-निंबाळकर
आॅनलाईन लोकमत
फलटण , दि. २0 : लाभ क्षेत्रात नसलेल्या किंबहुना निरा देवघरचा काडी मात्र संबध नसताना फलटण, खंडाळा तालुक्यांचे हक्काचे पाणी बारामती तालुक्याला विकणाऱ्या तथाकथित भगीराथाला तालुक्यातील जनतेने जाब विचारण्याची व आपल्या हक्काच्या पाण्यासाठी संर्घष करण्याची वेळ आली आहे. असे मत माजी खासदार हिंदुराव नाईक-निंबाळकर यांनी केले.
निरा देवघर धरणाच्या वस्तुस्थिती मांडण्याबाबत फलटण तालुक्यातील ५१ गावाच्या दौऱ्यात काळज, सासवड, चव्हाणवाडी येथे आयोजित करण्यात आलेल्या बैठकीत ते बोलत होते. यावेळी निरादेवघर कृती समितीचे अध्यक्ष अॅड. नरसिंह निकम, जयकुमार शिंदे, बाळासाहेब कदम, सिराज शेख, राजेंद्र काकडे, विलास झणझणे, वसंत ठोबरे, मंज्जाबा खताळ, नंदु गाढवे आदी उपस्थीत होते.
हिंदुराव नाईक-निंबाळकर पुढे म्हणाले, नियोजित वेळेत कालव्याची कामे झाली असती तर लाभक्षेत्रात असुनही आपल्या तालुक्याना सिंचनापासुन वंचीत रहावे लागले नसते. निरा देवघर प्रकल्प सीडब्ल्यूसी (केंद्रीय जल आयोग) मधुन मंजुर होवुन एआयबीपी मधुन भरीव मदत मिळाण्यासाठी शासनाने प्रयत्न करणे गरजेचे होते. निरा देवघर प्रकल्प गेली १३ वर्ष जवळपास शंभर टक्के भरत आहे. असे असुनही केंद्रीय जल आयोगाची मान्यता नाही व त्यामुळे निधी उपलब्ध होत नाही. यासाठी प्रयत्न केले जात नाहीत का? का जाणीवपुर्वक हे घडविले जात आहे, यांचा विचार करणेची वेळ आता आली आहे.
लाभ क्षेत्रात असूनही ग्रामस्थांना पाणी नाही. लाभ क्षेत्रात नाहीत ते मात्र अमर्याद व अनिर्बंधपणे पाणी वापर करित आहे हे दुदैर्वी चित्र बदलणे गरजेचे आहे. कालव्याची कामे झाली नाही तर लाभक्षेत्रात नसुनही आपले हक्काचे पाणी कायमस्वरूपी बारामतीला मिळेल व फलटण, माळशिरस हे दुष्काळी तालुके हक्काच्या पाण्यापासून वंचीत राहतील असे हिंदुराव नाईक-निंबाळकर म्हणाले.
सत्तेचा गैरवापर : नरसिंह निकम
अॅड. नरसिंह निकम म्हणाले की, निरा देवघर प्रकल्पासाठी हिंदुराव यांनी सुरूवातीपासून प्रयत्न केले आहेत. ज्यांच्यासाठी हा प्रकल्प तयार केला त्यांना आद्याप पाणी मिळालेले नाही. त्यांच्या जमीनी गेल्या त्यांना शासनाने आश्वासने दिली पण ती पूर्ण केली गेली नाहीत. आपल्या हक्काचे पाणी मिळविण्यासाठी जनआंदोलन उभे करून लढा उभारणे गरजेचे आहे. आपल्या तालुक्यातील काही स्वार्थी राजकीय प्रतिनिधी यांनी सत्तेचा गैरवापर करून आपल्या हक्काचे पाणी बारामती, इंदापुरकडे पळविले आहे. पाणीसाठ्यापैकी ६० टक्के पाणी नीरा डावा कालव्यासाठी घेतले. म्हणजे दहा वर्ष ज्यांचा पाण्याशी संबध नाही ते पाणी वापरत आहेत, असेही ते म्हणाले.