आसलेचे भवानीमाता मंदिर फोडले
By Admin | Updated: January 19, 2015 00:21 IST2015-01-18T22:33:13+5:302015-01-19T00:21:47+5:30
तिसऱ्यांदा घटना : चांदीच्या प्रभावळीसह मूर्तीच्या नाकातील नथ लांबविली

आसलेचे भवानीमाता मंदिर फोडले
भुर्इंज : आसले (ता. वाई) येथील भवानीमाता मंदिरातून रविवारी पहाटे चोरट्यांनी मूर्ती लगत असलेली चार किलो चांदीच्या प्रभावळीसह चक्क मूर्तीच्या नाकातील नथ हिसकावून घेण्यापर्यंत मजल मारली. आदल्याच दिवशी भरदिवसा मंदिराच्या पुजाऱ्यांचे घर फोडून सुमारे ७० हजारांची चोरी झाल्याची घटना ताजी असताना चोरट्यांनी थेट मंदिर फोडून चोरी केल्याने परिसरात खळबळ उडाली आहे. वाई-पाचवड मार्गावर भवानीमातेचे पुरातन मंदिर आहे. आठ वर्षांपूर्वी हुमगाव येथील भाविक शिवनाथ वाघ यांनी देवीला यांनी देवीला चार किलो चांदीची प्रभावळ अर्पण केली होती. पहाटेच्या सुमारास चोरट्यांनी मंदिराच्या दरवाजाचा कडी-कोयंडा तोडून ही चोरी केली. चोरट्यांनी अगदी सराईतपणे संपूर्ण प्रभावळ उचकटून नेली. तसेच देवीच्या मूर्तीच्या नाकात असणारी नथही काढून घेण्यास चोरटे कचरले नाहीत. प्रभावळ ज्या लाकडी चौकटीवर बसविली होती, ती चौकट मंदिराच्या पाठीमागे टाकून चोरट्यांनी पोबारा केला. पहाटे पुजारी मंदिरात आल्यानंतर हा प्रकार उघडकीस आला. भुईंज पोलिसांनी या घटनेच्या तपासासाठी साताऱ्याहून श्वानपथक मागविले. मात्र, नेहमीप्रमाणे श्वान परिसरातच घुटमळले.
दरम्यान, घटनास्थळी सातारा येथील गुन्हे अन्वेषण विभागाचे पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट, भुईंज पोलीस ठाण्याचे सहायक निरीक्षक नारायण पवार यांनी भेट देऊन पाहणी केली. (प्रतिनिधी)
वाई तालुक्यातील मंदिरे असुरक्षित
भुर्इंज : आसले येथील भवानीदेवी मंदिरात यापूर्वीही दोनदा चोरी झाली होती. त्यावेळी चोरट्यांच्या हाताला फारसे काही लागले नव्हते. मात्र, रविवारी पहाटे झालेल्या चोरीत चोरट्यांनी चार किलो चांदीच्या प्रभावळीसह चक्क मूर्तीच्या नाकातील नथ हिसकावून घेण्यापर्यंत मजल मारल्याने भाविकांमध्ये अस्वस्थता आहे. चोरट्यांना या कृत्याची शिक्षा देवीच देईल, अशीच प्रतिक्रिया व्यक्त होत आहे. वाई तालुक्यात यापूर्वीही अशा प्रकारच्या घटना घडल्याने मंदिरे किती असुरक्षित असल्याचे दिसून येत आहे. मंदिरात पहाटेची काकड आरतीही झाली नाही. पोलिसांचा पंचनामा झाल्यानंतर दुपारी बाराच्या सुमारास देवीच्या नावाचा गजर होऊन पूजा करण्यात आली. ज्या मंदिरात जाऊन आपलं भलं व्हावं, अशी प्रार्थना केली जाते, त्या मंदिरातील देवच असुरक्षित असल्याच्या घटना वारंवार घडत आहेत. आसले येथील भवानीदेवी मंदिरातील घटनेमुळे मांढरदेव, बावधन, ओझर्डे, भुर्इंज, बोपेगाव येथील मंदिरातील चोरीच्या घटना ताज्या आहेत. मांढरदेव, बावधन व भुर्इंज येथील मंदिर चोरीतील घटनांमधील बहुतेक चोऱ्यांचा तपास अधांतरीच राहिला. भवानीदेवी मंदिरात तर यापूर्वीही दोनदा चोरीच्या घटना घडल्या. वीस वर्षांपूर्वी आणि आठ वर्षांपूर्वी झालेल्या चोऱ्यांमध्ये चोरट्यांनी घंटा नेली होती. मंदिर काहीसे आडबाजूला असल्याने आणि काही वर्षांत मंदिरातील ऐश्वर्य वाढल्याने चोरट्यांनी लक्ष ठेवून चोरी केल्याचा संशय व्यक्त होत आहे.
‘त्या’ संशयास्पद व्यक्ती कोण?मंदिराचे पुजारी दत्तात्रय गुरव मंदिराशेजारीच राहतात. शनिवारी दुपारी त्यांची भावजय संगीता गुरव यांचे घर भरदिवसा फोडून चोरट्यांनी सत्तर हजारांचा ऐवज लंपास केला होता. अवघ्या काही तासांतच चोरट्यांनी थेट मंदिर फोडले. एक महिन्यापूर्वी काही संशयास्पद व्यक्ती मंदिर परिसरात फिरत असताना अनेकांनी पाहिले आहे. त्यांनी ही चोरी केली असावी, असा संशय व्यक्त होत आहे.